

Education Psychology
esakal
अ मेरिकन मानसशास्त्रज्ञ मॅस्लोने मांडलेल्या पंचस्तरीय मानवी गरजा आपण समजून घेतल्या. या लेखातून पहिल्या दोन स्तरांबद्दल आणि त्याच्या शैक्षणिक संबंधांबद्दल अधिक जाणून घेऊ या. शिक्षण मानसिक–बौद्धिक प्रक्रिया असली, तरी तिची सुरवात शारीरिक आणि भावनिक सुरक्षिततेच्या गरजांपासूनच होते. अन्न, पाणी, झोप आणि आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नसतील, तर शिकण्याची प्रक्रिया प्रभावी ठरू शकत नाही. आजच्या सामाजिक परिस्थितीत अनेक मुलांसाठी घरात या मूलभूत गरजा पुरेशा प्रमाणात पूर्ण होतीलच असे नाही. त्यामुळे शाळेत असताना तरी या गरजा भागल्या गेल्या पाहिजेत, तरच ‘शिकण्या’ची अपेक्षा करता येईल. याच संदर्भात शाळेतील माध्यान्ह भोजन योजनेचे महत्त्व अधोरेखित होते. भारतासारख्या देशात ही योजना केवळ कल्याणकारी उपक्रम नसून, शिकण्यासाठीची आवश्यक अट आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ३ ते ६ वयोगटातील मुलेही शालेय शिक्षणात आणली हे या अर्थानेही चांगलेच झाले. मात्र येथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो; या व्यवस्थापनाची जबाबदारी शिक्षकांवर असावी का आणि त्यासाठी किती वेळ द्यावा? शिक्षकांचे मुख्य कार्य ‘शिकवण्याचे’ आहे. म्हणूनच भोजनाची व्यवस्था सक्षम व स्वतंत्र यंत्रणेद्वारे केली गेली पाहिजे, जेणेकरून शिक्षकांचा शिकवण्याचा मौल्यवान वेळ वाया जाणार नाही.