
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करा
कोल्हापूर : राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न हा २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी आज कॉंग्रेसतर्फे सायबर चौकात आंदोलन करण्यात आले. नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करून परीक्षार्थींच्या कष्टाला न्याय द्यावा, अशा मागणीचे फलक हाती घेत आंदोलन केले.
यानंतर प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे-पाटील, शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष उदय पोवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील म्हटले आहे, आयोगाने परीक्षा पद्धतीत बदल करताना केवळ यूपीएससीमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला पाहिजे हाच विचार केलेला दिसतो. परंतु, हा बदललेला परीक्षा पॅटर्न २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेताना ४ ते ५ वर्षे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धतीनुसार अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील परीक्षार्थींचा सर्वांगीण विचार त्या निर्णयात केलेला दिसत नाही.
या बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे पुढील २ ते ३ वर्षे यूपीएससी करणारी मुले सहजपणे एमपीएससीतील पदे घेऊन जातील. महाराष्ट्रातील एमपीएससी करणारी मुले परीक्षेच्या तयारीतच गुंतून पडतील. मागील दोन वर्षे कोरोनाच्या वातावरणामध्ये गेली. वाढते वय, वेळेवर परीक्षा होऊ शकल्या नाहीत, अशा काळातही विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला.
आत्ता कुठे परिस्थिती सुरळीत झाली. आयोगामार्फत परीक्षा होऊ लागल्या, मात्र परीक्षा पद्धतीमध्ये होऊ घातलेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांना आपले राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि दोनचे अधिकारी बनण्याचे स्वप्न सोडून दिल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
निवेदन देताना ऋषिकेश पाटील, वैभव तहसीलदार, मयूर पाटील, शुभम पाटील, अंजली जाधव, मुझफ्फर टिनवाले, आदित्य कांबळे, मकरंद कवठेकर, अमेय निकम, आकाश माने यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.