
स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवरील अतूट विश्वास... कर्तव्याप्रती असलेली एकनिष्ठता व स्वतःवरील दुर्दम आत्मविश्वासाच्या जोरावर कुठलेही यश सहज प्राप्त करता येते.
MPSC Exam : सेल्फ स्टडीच्या मदतीने यशाला गवसणी; कैलास रिंढे बनला उद्योग निरीक्षक
हिवरा आश्रम - स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवरील अतूट विश्वास... कर्तव्याप्रती असलेली एकनिष्ठता व स्वतःवरील दुर्दम आत्मविश्वासाच्या जोरावर कुठलेही यश सहज प्राप्त करता येते. याचा प्रत्यय नुकताच सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी येथील कैलास नारायण रिंढे या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उद्योग निरीक्षक परीक्षेत मिळविलेल्या यशाच्या रूपाने दिसून आला. कैलास रिंढे या महाराष्ट्र राज्यातून आणि मागासवर्गवारीतून प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे. विद्यार्थ्यांने जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम व अभ्यासाचे योग्य नियोजनाच्या जोरावर उद्योग निरीक्षक या परिक्षेत यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा व्दारे महाराष्ट्र उद्योग निरीक्षक पदाकरीता १०३ जागाकरीता ३ एप्रिल २०२२ करीता पुर्व परिक्षा घेण्यात आली होती. मुख्य परिक्षा १७ सप्टेंबर २०२२ झाली. या परिक्षेचा अंतिम निकाल २८ डिसेंबर २०२२ रोजी जाहिर झाला. या परिक्षेमध्ये कैलास नारायण रिंढे महाराष्ट्र राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी या छोटयाशा गावातील कैलास रिंढे याने मिळालेल्या या यशामुळे विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कैलास हा लहानपणापासून अभ्यासात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. महाविद्यालय जीवनापासून एम.पी.एस.सी. परीक्षेत आपल्याला यश प्राप्त करण्याचे ठरविले असल्यामुळे महाविद्यालयापासून एम.पी.एस.सी. परीक्षेच्या तयारीला लागल्याचे कैलास रिंढे यांने दैनिक सकाळशी बोलतांना सांगितले. सेल्फी स्टडी च्या जोरावर एम.पी.एस.सी. परिक्षेत यश मिळाले. अभ्यासाचे योग्य नियोजन व परिश्रमाच्या जोरावर आपल्याला घवघवीत यश प्राप्त करता आल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
प्रतिक्रीया -
आर्थिक अडचणी प्रत्येकालाच असतात. मात्र त्यान अडचणींना आपण कवटाळून ठेवायचं की त्यात अडचणींवर मात करून पुढे जायचं हे आपल्या हातात असतं. मला सुध्दा अनेक अडचणी होत्यां. मात्र मी त्यांचा काही बाऊ केला नाही. आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहत कठोर परिश्रम घेत यश संपादन केले.
- कैलास रिंढे, मोहाडी, सिंदखेड राजा