
गणित विषय शिकण्याच्या बाबतीत अचूक आकडेमोड हा एक महत्त्वाचा भाग आहे. बरोब्बर उत्तर यावे यासाठी एक मानसिक प्रक्रिया तत्पूर्वी घडत असते.
अशी करा गणिताशी दोस्ती!
- मृदुला अडावदकर
गणित विषय शिकण्याच्या बाबतीत अचूक आकडेमोड हा एक महत्त्वाचा भाग आहे. बरोब्बर उत्तर यावे यासाठी एक मानसिक प्रक्रिया तत्पूर्वी घडत असते. कोणत्या संख्या विचारात घ्यायच्या? आणि त्यावर गणितातील बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार इत्यादी नेमकी कोणती गणिती क्रिया करून उत्तराकडे जायचं? ही एक मोठी विचार प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असते. त्यानंतर मेंदू टप्प्याटप्प्याने योग्य तो निर्णय घेऊन उत्तराकडे प्रवास करतो. योग्य ती आकडेमोड करतानाही मेंदूला टप्प्याटप्प्याने एका योग्य पायरीवरून दुसऱ्या योग्य पायरीकडे जाण्याची निर्णयप्रक्रिया पार पडावी लागते. म्हणून गणित चुकते तेव्हा एकच पायरी चुकली असे होत नाही तर धडाधड पुढच्या सगळ्या पायऱ्या कोसळतात. ही पडझड पाहून विद्यार्थी बिचकतात. हा एक प्रकारे निराश करणारा आणि नकोसा अनुभव असतो. वाचताना हे किचकट, क्लिष्ट वाटले तरी सायकल चालवताना किंवा झाडावर चढून पेरू काढताना याहून अधिक गुंतागुंतीच्या प्रक्रिया आपला मेंदू अगदी सहज पार पाडत असतो. परंतु ‘झाडावर चढताना धडपडलं’ म्हणून तितकेसे नैराश्य येत नाही हेही तितकेच खरे!
गणिताची भाषा : गणितातील वेगवेगळे आकडे आणि चिन्हे ही एक चित्रलिपी आहे. त्यामुळेच गणिताला स्वतःची भाषा आहे. गणित शिकायचं तर ही भाषा अचूकपणे वापरायला आधी शिकलं पाहिजे. ही चिन्हं नुसतीच वापरली जात नाहीत, तर त्यांच्या जागा बदलल्या तरी निराळा अर्थ निर्माण होतो. गणिती भाषा वापरून एकाच वेळी अनेक भाषांमध्ये वाचता येईल अशा ग्रंथांची निर्मितीही प्राचीन काळात झालेली आहे. आजच्या संदर्भात त्याला युनिकोड असं नाव देता येईल. प्रत्येक चिन्हाचा अर्थ समजून घेतला तर ‘ट्रेझर हंट’च्या खेळामध्ये क्लू घेऊन आपण पुढच्या पायरीवर जातो तशाच रीतीने हा पायऱ्यांनी गणित सोडविण्याचा खेळ रंगतो. एकदा या खेळातील गम्मत लक्षात आली की हळूहळू अचूकता वाढू लागते आणि त्यानंतर मग आपोआपच गणित सोडविण्याचा वेग वाढू लागतो. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेग वाढविण्याच्या उद्देशाने आपण काहीच करायचं नाही. पाहिले तीन टप्पे साधले की गणित सोडविण्याचा वेग आपोआप वाढतोच!
कण्हत की गाणं म्हणत? : गणित खरंच कसं शिकायचं? याबद्दल अधिक सोपं करून सांगायचं म्हटलं तर एखाद्या गाण्याप्रमाणे! गाणं शिकताना आपण काय करावे लागते? गाण्याच्या स्वराकडे लक्ष द्यायचं, त्याचे लगाव, आरोह अवरोह, खटके- मुरकी, शब्दोच्चार उच्चार आणि शब्दार्थ नीट समजून घ्यायचे. आपल्याला जमतच नसेल तर जाणकार गुरूंची मदत घेतो. न सुटणारे गणित सोडवताना तुम्हाला अगदी हेच करायचं आहे. गाण्याची एक ओळ म्हणताना या इतक्या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी एका वेळी आपला मेंदू करत असतो; तसाच तो गणित शिकण्याच्या वेळीही करू शकतो. फक्त गणित विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. एक नावडता, रटाळ विषय या चष्म्यातून न बघता त्यातली गम्मत शोधली पाहिजे. यश तुमचंच आहे!
Web Title: Mrudula Adavadkar Writes How To Deal With Mathematics Subject
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..