

वेल्हे : राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात पुणे विभागस्तरीय 21 लाखाचे प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वेल्हे तालुक्यातील उपक्रमांनी भरलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाबे या शाळेने पटकाविले.
सन २०१३-१४ पासून येथील विद्यार्थी काव्यलेखन उपक्रम अंतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सांगेल त्या विषयांवर स्वरचित कविता तयार करतात. यंदा पाबे शाळेचे स्पेशल ७५ हा उपक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (७५) पूर्ण, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवाला (७५) प्रारंभ, पाबे शाळेचा पट (७५) आणि पाबे शाळेत सुरु असलेले उपक्रम (७५), यालाच पाबे स्पेशल ७५ असे म्हटले जाते. या ७५ उपक्रमांपैकी लिंकस्टोरी, गणिती ट्रिक्स,
घटकराज्यांचा ब्लाईंड गेम, मला व्हायचंय ग्रांडमास्टर : खेळ बुद्धिबळाचा, ओळख माझी नवी : माझ्यातील वेगळेपण, ज्ञानकण, चला प्रेरणा घेऊया, यशवंतराव चव्हाण चिल्ड्रेन्स मिनी बँक, लोकशाही शिक्षण, बेस्ट स्टुडंट ऑफ द इअर, हुशारबाबा आला रे!, स्केटिंग, तायक्वांदो, स्वप्न ऑलिम्पिकचे यासारखे ७५ नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु आहेत.
या उपक्रमांची यशस्विता म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्यवाचनासाठी निवड, तायक्वांदो स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर ११ वर्षे वयोगटाखाली सुवर्ण पदक विजेते, गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत निवड, लोकनृत्य स्पर्धेत जिल्हास्तरावर सलग दोन वर्षे क्रमांक पटकाविले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशामुळे पुणे जिल्हा परिषदेने पाबे शाळेच्या विद्यार्थांना २१ हजार व १५ हजार रुपयांचे बक्षीस देवून गौरविले आहे.
या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कोळी, पदवीधर शिक्षिका मनीषा आजबे, उपशिक्षिका कविता साळुंके, सरपंच ज्योती रेणुसे, उपसरपंच संगीता रेणुसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत रेणुसे, उपाध्यक्षा मोनाली मरळ, माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष अशोक ऊर्फ लाला रेणुसे, विष्णू तामकर, विद्या पवार, मीराबाई पवार यांचे मोलाचे योगदान ठरले.
या यशाबद्दल तहसीलदार निवास ढाणे ,शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत उगले, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक नलावडे, केंद्रप्रमुख प्रवीण इंदलकर यांनी अभिनंदन केले. पुणे जिल्हा व विभागातील सर्व स्तरातून पाबे शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वेल्हे तालुक्यातून 3 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावून पुणे जिल्ह्याच्या शर्यतीत उतरल्यावर कोट्यवधींच्या भौतिक सुविधा असलेल्या शाळेच्या तुलनेत अतिवृष्टी आणि अतिदुर्गम भागातील पत्र्याची पाबे शाळा कशी टिकेल अशी भीती मनात होती. परंतु मागील दहा वर्षांपासून सुरु असलेल्या उपक्रमामुळे पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे 11 लाखाचे बक्षीस मिळविण्यात यश आले. त्याचबरोबर पुणे विभागातूनही 21 लाखाचे बक्षीस मिळवून राज्यस्तरावर नामांकन मिळाले. यात केवळ पाबे शाळेचा अभिमान नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचा अभिमान आहे.
- सुरेश कोळी, मुख्याध्यापक, पाबे शाळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.