ncert now in syllabus instead of India use Bharat education marathi
ncert now in syllabus instead of India use Bharat education marathisakal

NCERT : आता अभ्यासक्रमातही ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

विविध शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असेच नाव वापरले जाण्याची शक्यता

नवी दिल्ली : विविध शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असेच नाव वापरले जाण्याची शक्यता आहे. ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’च्या (एनसीईआरटी) सामाजिक शास्त्रांसाठी स्थापन केलेल्या एका उच्चस्तरीय समितीनेच तशा प्रकारची शिफारस केली आहे. विविध शालेय अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती.

या समितीचे अध्यक्ष सी.आय.इसाक यांनी याबाबत सांगितले, ‘‘ ‘इंडिया’ या नावाऐवजी आता थेट ‘भारत’ असा शब्दप्रयोग करण्याची शिफारस करण्यात आली असून ‘प्राचीन इतिहासा’ऐवजी ‘अभिजात इतिहास’ असा उल्लेख करावा असेही सूचविण्यात आले आहे.

आता सर्व विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय ज्ञान व्यवस्थेचा (आयकेएस) समावेश करण्यात येईल.’’ दुसरीकडे ‘एनसीईआरटी’च्या अधिकाऱ्यांनी मात्र या शिफारशींबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे म्हटले आहे.

धोरणाला सुसंगत अभ्यासक्रम

राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० ला अनुसरून एनसीईआरटी शालेय अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करत आहे. या परिषदेने अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि विविध वर्गांचे अभ्यास साहित्य निश्चित करण्यासाठी १९ सदस्यांचा समावेश असलेली राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन अध्ययन साहित्य समिती स्थापन केली होती.

या समितीच्या अन्य सदस्यांमध्ये ‘आयसीएचआर’चे अध्यक्ष रघुवेंद्र तन्वर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक वंदना मिश्रा, डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत शिंदे आणि हरियानातील सरकारी शाळेत समाजशास्त्र हा विषय शिकविणाऱ्या ममता यादव यांचा समावेश आहे.

केवळ पराभवच दाखविले

इसाक म्हणाले, ‘‘ या समितीने सर्व वर्गांच्या अभ्यासक्रमात ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ या नावाचा वापर करण्यात यावी अशी एकमुखाने शिफारस केली आहे. विविध पाठ्यपुस्तकांतील हिंदूंचा गौरवशाली इतिहास आणि विविध युद्धांतील त्यांचे विजय देखील ठळकपणे अधोरेखित करण्यात येतील.

विद्यमान पाठ्यपुस्तकांमध्ये केवळ आमचे अपयशच दाखविण्यात आले आहे पण मुघल आणि अन्य सुलतानांवरील विजयाचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला दिसत नाही.’’ इसाक हे भारतीय इतिहास संशोधन परिषेदेचे (आयसीएचआरचे) सदस्य आहेत.

केंद्र सरकार राज्यघटनेचा अवमान करत असून त्यात स्पष्टपणे ‘इंडिया दॅट ईज भारत’ असे स्पष्टपणे लिहिण्यात आलेले आहे. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ हे दोन्ही शब्द परस्परांना पर्यायी आहेत.

- जिग्नेश मेवानी, काँग्रेसचे नेते

देशात विरोधकांची आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपचे लोक बिथरले असून आताचे त्यांचे कृत्य हे उन्मादी स्वरूपाचे आहे. आता आम्ही आमचे नाव बदलले तर ते पुन्हा देशाचे नाव बदलणार आहेत का?

- मनोज झा, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार

ही मंडळी आता अनेक गोष्टी सुचवू पाहत आहेत. पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम आदींच्या माध्यमातून कशापद्धतीने इतिहासाची मोडतोड केली जात आहे हे आपण पाहत आहोत. आमच्यासाठी ‘भारत’ आणि ‘इंडिया’ सारखाच आहे.

- के.सी.वेणुगोपाल, काँग्रेसचे सरचिटणीस

गैरकृत्ये आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप नामबदलाचे राजकारण करतो आहे.

- एस. अण्णादुराई, ‘द्रमुक’चे प्रवक्ते

पंतप्रधान मोदी यांना ‘इंडिया’ आघाडीची भीती वाटत असल्याचे दिसून येते. त्यांचे मित्र देखील साथ सोडत चालले असून केवळ नावे बदलण्याऐवजी बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर लक्ष द्यायला हवे.

- प्रियांका कक्कर, ‘आप’च्या नेत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com