NCERT Report : तमिळनाडू, गुजरातच्या विद्यार्थ्यांचे गणित कच्चे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCERT report Tamil Nadu Gujarat Students Mathematics Raw delhi

NCERT Report : तमिळनाडू, गुजरातच्या विद्यार्थ्यांचे गणित कच्चे

नवी दिल्ली : देशात तमिळनाडूच्या शालेय विद्यार्थ्यांचे मूलभूत अंकगणित सर्वांत कच्चे असून त्यानंतर जम्मू आणि काश्मीर, आसाम, गुजरात या राज्यातील विद्यार्थ्यांचा क्रमांक लागतो. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) यासंदर्भातील राष्ट्रीय अहवाल जारी केला आहे. देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती तपासण्यात आली. इयत्ता तिसरीतील सुमारे ३७ टक्के विद्यार्थी गणिताच्या अभ्यासात मागे असून त्यांना गणितातील मूलभूत गोष्टीही क्वचितच पूर्ण करता आल्या. मात्र, या नाण्याची दुसरी चांगली बाजू म्हणजे प.बंगाल, उत्तराखंड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि बिहारमधील विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य समाधानकारक आहे. या राज्यांतील विद्यार्थ्यांनी अवघड श्रेणीतील गोष्टीही यशस्वीपणे पूर्ण केल्या.

गणितविषयक आकलन तपासण्यासाठी त्यांना अंक ओळखणे, बेरीज, वजाबाकी आदी करण्यास सांगण्यात आले. देशातील तिसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये २०२६-२०२७ मध्ये वाचन व गणितविषयक मूलभूत कौशल्ये विकसित होण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने जुलै २०२१ मध्ये ‘निपुण भारत’ उपक्रम सुरू केला. त्यानंतर, यावर्षी मार्चमध्ये याच हेतूने शिक्षण मंत्रालय व एनसीईआरटीने संयुक्तपणे पायाभूत शिक्षणाचे व्यापक सर्वेक्षण सुरू केले. या अहवालानुसार सुमारे ५२ टक्के विद्यार्थी ७० किंवा त्यापेक्षा अधिकची गुणश्रेणी मिळविण्यात अपयशी ठरले. त्याचप्रमाणे, ४० टक्के विद्यार्थी ७० ते ८३ दरम्यान गुण मिळवू शकले. केवळ दहा टक्के विद्यार्थ्यांनी ८४पेक्षा अधिक गुण मिळविले.

एनसीईआरटीने ‘मौखिक वाचन, आकलन व गणित क्षमता २०२२’ या नावाने राष्ट्रीय अहवाल तयार केला आहे. देशातील तिसरीतील विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता, गणित तसेच अध्ययन क्षमतेची तपासणी करण्याचा यामागील उद्देश होता. देशातील आठ भाषांमधील इयत्ता तिसरीच्या एक तृतीयांशपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची मौखिक वाचन क्षमता जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले. तमिळनाडूतील विद्यार्थी इतर राज्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे असून ४२ टक्के विद्यार्थ्यांत मूलभूत वाचन कौशल्याचा अभाव असून मुले सरासरी प्रतिमिनिट १६ तर मुली प्रतिमिनिट १८ शब्द वाचू शकतात. मात्र, बंगाली, खासी, मिझो, पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील विद्यार्थ्यांची वाचन क्षमता सर्वाधिक आहे.

भारताला गणिताचा समृद्ध वारसा

अनेक शालेय विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड वाटतो. आपल्या देशाला गणिताचा समृद्ध वारसा लाभला आहे. शून्याचा शोध ही भारतानेच जगाला दिलेली देणगी आहे. तमिळनाडूतीलच महान गणितज्ञ रामानुजन यांनी जागतिक पातळीवर ठसा उमटविला. त्यांनी ‘जर्नल ऑफ इंडियन मॅथेमेटिकल सोसायटी’ हे शोधपत्रकाचे प्रकाशित केले. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातील प्रा. हार्डी यांनी त्यांची असामान्य प्रतिभा ओळखून ब्रिटनला बोलाविले. तिथे त्यांनी गणितात बीएससीची पदवी मिळविली. अल्पायुष्यात त्यांनी ३५०० पेक्षा अधिक प्रमेये लिहिली. विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावण्यासाठी हा वारसा सांगायला हवा.

विद्यार्थ्यांना सांगितलेल्या गणितातील क्रिया

  • अंक व अंकातील फरक ओळखणे

  • बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार करणे

  • संख्या व आकारांचा समावेश असलेले नमुने ओळखणे

Web Title: Ncert Report Tamil Nadu Gujarat Students Mathematics Raw Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..