NDA अंतर्गत होणाऱ्या SSB च्या मुलाखती पुढील महिन्यापासून सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSB

NDA अंतर्गत होणाऱ्या SSB च्या मुलाखती पुढील महिन्यापासून सुरु

पुणे : भारतीय सैन्यदलाच्या इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (आयएमए), तसेच तिन्ही दलांना अधिकारी पुरविणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या प्रशिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखती पुढील महिन्यापासून सुरू होणार आहेत. एसएसबीची तयारी, कालावधी असे अनेक प्रश्‍न सध्या पात्र असलेल्या उमेदवारांमध्ये निर्माण होत आहेत. यासाठी उमेदवारांनी घाबरून न जाता स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकास, नैतिक जबाबदारी, बौद्धिक क्षमता, सामाजिक ज्ञान आदी गोष्टींवर काम केल्यास नक्कीच एसएसबी उत्तीर्ण केली जाऊ शकते, असे मत एसएसबी क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे. (Service Selection Board Interview Updates)

सशस्त्र दलांमध्ये दाखल होण्यासाठी एनडीए, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस), एफकॅट अशा विविध प्रकारच्या १८ हून अधिक प्रवेश प्रक्रिया आहेत. या प्रशिक्षण संस्थांमध्ये योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखती अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. एसएसबीद्वारे उमेदवारांचे मूल्यांकन करण्यात येते. परंतु यासाठी कशी तयारी करावी, यासंबंधात माहितीच्या अभावामुळे अनेक उमेदवार या प्रक्रियेतून बाहेर पडतात. दरवर्षी मोठ्या संख्येने या प्रक्रियेत उमेदवार सहभाग घेतात. मात्र यात सुमारे ४ टक्के उमेदवारांचीच निवड होते. त्यामुळे उमेदवारांना या प्रक्रियेशी संबंधित योग्य मार्गदर्शन, माहिती देणे आवश्‍यक असल्याचे तज्ञांनी सांगितले.

विविध एसएसबी केंद्रामध्ये निवड प्रक्रियेतील ग्रुप टास्क ऑफिसर (जीटीओ) म्हणून अनुभव असलेल्या कर्नल गणेश बाबू (निवृत्त) यांनी सांगितले की, ‘‘एसएसबीमध्ये येणाऱ्या प्रत्येक उमेदवारांत अधिकाऱ्यांप्रमाणे कोणत्याही प्रसंगी नेतृत्व करण्याची क्षमता, अडचणीच्या प्रसंगी मार्ग शोधणे अशा सर्व गुणांची पाहणी केली जाते. एसएसबीसाठी साधारणपणे १२०० ते १५०० उमेदवार येतात, पण त्यातील केवळ २० टक्के उमेदवारांचीच निवड कली जाते. या वर्षापासून एनडीएमध्ये मुलींना ही प्रशिक्षण घेता येणार असून सुमारे १ हजार मुलींनी एनडीएची प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण केली आहे. परंतु एनडीएमध्ये सध्या मुलींसाठी केवळ १९ जागा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसएसबीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.’’

काय आहे एसएसबी ?

सशस्त्र दलांच्या प्रशिक्षण संस्थांसाठी उमेदवारांचे मूल्यांकन करणारे निवड मंडळ म्हणजेच एसएसबी. या मंडळाद्वारे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता चाचण्या आणि मुलाखती यांचा समावेश असलेल्या मूल्यमापन प्रणालीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाते. यामध्ये लेखी आणि प्रत्यक्ष कार्य अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. ही प्रक्रिया ५ दिवसांची असते.

‘‘एसएसबीच्या पहिल्याच टप्प्यात ५० ते ६० टक्के उमेदवार बाहेर होतात. उमेदवारांना ही प्रक्रिया यशस्वीपणे कशी पार पाडावी याचा ताण येतो. याचा परिणाम त्यांच्या निवड प्रक्रियेवर ही होतो. त्यामुळे एसएसबी दरम्यान उमेदवारांना तणावमुक्त आणि संयम बाळगणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर व्यव्कतिमत्त्व विकासावर भर दिला पाहिजे. जगातील घडामोडींचा अभ्यास सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.’’

- लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर

एसएसबीची प्रक्रिया ः

- दोन टप्प्यात पार पडते

- पहिला टप्प्यात स्क्रिनींग प्रक्रिया

- दुसऱ्या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचणी, ग्रुप टास्क ऑफिसर चाचणी आणि मुलाखत

का होतात उमेदवार प्रक्रियेतून बाहेर ?

- क्षमतेबरोबर उमेदवारांची जागृकता कमी

- एसएसबी प्रक्रियेबाबतची सबंध माहिती नसणे

- केवळ पाठांतरावरच भर दिला जातो

- व्यक्तिमत्त्व विकासावर दुर्लक्ष

- संवाद कौशल्याची कमतरता

- सामान्य ज्ञानाचा अभाव

- एसएसबीची तयारी ऐनवेळेवर किंवा कॉल लेटर आल्यावर करणे

अधिकाऱ्यां सारखे गुण

- योग्य नियोजन, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता

- जबाबदारीची जाण व एकत्रितपणे कार्य पार पाडणे

- सामाजिक परिणामकारकता व समायोजना

- धैर्य, सहनशक्ती, दृढनिश्चय

या शहरांमध्ये एसएसबीचे केंद्र

गांधी नगर, भोपाळ, अलाहाबाद, बंगळूर, कपूरथळा, कोईम्बतूर, विशाखापट्टणम, कोलकता, डेहराडून, मैसूर, वाराणसी.

Web Title: Nda Ssb Exam Interview Updates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :exameducationNDA