‘स्वॉट’ तंत्राची गरज

‘स्वॉट’ (SWOT) विश्लेषण तंत्र हे आपले जीवनकार्य ठरविण्यासाठी अत्यंत उपयोगी असे तंत्र आहे.
SWOT
SWOTsakal

‘स्वॉट’ (SWOT) विश्लेषण तंत्र हे आपले जीवनकार्य ठरविण्यासाठी अत्यंत उपयोगी असे तंत्र आहे. व्यवसाय अथवा उद्योग जगतात ही याचा उपयोग पुढील नियोजन करण्यासाठी वापरतात. SWOT हा लघुशब्द आहे. यातील S म्हणजेच Strengths, W म्हणजे Weaknesses, O म्हणजे Opportunities आणि T म्हणजे Threats होय. प्रत्येक व्यक्तीची काही बलस्थाने (strengths) असतात.

जसे कुणी शारीरिकदृष्ट्या सक्षम असतो, तर कुणी मानसिकदृष्ट्या. कुणी गणितात चांगला असतो, तर कुणी भाषेमध्ये. याच्या अगदी विरुद्ध म्हणजे मर्मस्थाने (weaknesses) - आपली दुर्बलस्थानेही असतात. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या चांगल्या नाहीत किंवा आपल्याला फारशा चांगल्या जमत नाहीत त्या गोष्टी. आपण सारखे आजारी पडत असू, तर ते आपले मर्मस्थान आहे. कुणाला गणित जमत नाही, तर कुणाला इंग्रजी! चांगले किंवा वाईट असणे कसे ठरवता येईल? कारण चांगले-वाईट नेहमीच सापेक्ष असते. कशाशी तरी तुलना करूनच ते ठरवावे लागते.

आत्मपरीक्षण

यातील पहिला निकष म्हणजे स्वतःच्याच गुणांची तुलना आहे. कोणत्या गोष्टी इतर गोष्टींच्यापेक्षा चांगल्या जमतात, ती झाली आपली बलस्थाने. तबला वाजविण्यापेक्षा पेटी वाजवणे आपल्याला अधिक सहज जमत असेल तर ते झाले आपले अंतर्गत बलस्थान, पण एवढीच तुलना निर्णय घ्यायला पुरत नाही. आपले पेटी वाजवणे इतर पेटी वाजवणाऱ्यांपेक्षा उजवे आहे का? इतरांच्या तुलनेत आपण पुढे आहोत का? हेही बघावे लागते.

आपली बलस्थाने अथवा मर्मस्थाने यांचा विचार करताना कोणकोणत्या पैलूंचा विचार करायचा हे समजावे म्हणूनच आतापर्यंतचे अनेक लेख झाले आहेत. ते सर्व पुन्हा वाचून त्या पैलूंची उजळणी करा. शारीरिक, भावानिक, मनोकायिक, बौद्धिक अशा अनेक पैलूंचे तपशील आपण यापूर्वीच पाहिले आहेत, त्या सर्वांचा उपयोग आत्मपरीक्षण करण्यासाठी करा.

संधी

ज्या गोष्टी करणे आपल्याला आनंदाचे वाटते व सहज करणे जमेल असे वाटते त्या गोष्टी म्हणजे संधी (opportunities) होय. सोसायटीत अथवा शाळेत एखादा कार्यक्रम आहे आणि त्यात गायनाची संधी मिळणे हे आनंदाचे वाटत असेल, तर ती आपल्यासाठी संधी असते. आपण अशा गोष्टींची वाटच बघत असतो. कधी एकदा संधी मिळते आणि आपण आपले कौशल्य पणाला लावून स्वतःला सिद्ध करून दाखवतो असे मनात वाटत असते.

आता असे केवळ वाटून चालत नाही येणाऱ्या काळात त्या संधी मिळत राहणार आहेत का? त्यात वाढ होणार आहे की त्या कमीच होत जातील? याचाही विचार करायला हवा. यासाठी थोडे जागरूक राहावे लागते. आजूबाजूला कोणते बदल होत आहेत? समाज कशा प्रकारे बदलत आहे? कोणते नवीन तंत्रज्ञान येत आहे? त्याने कोणत्या संधी नाहीशा होणार आहेत? कोणत्या संधी नव्याने निर्माण होणार आहेत? याचा अभ्यास करत राहायला हवा. याबाबतचे विपुल लेखन व करिअर समुपदेशन उपलब्ध आहे. त्याचाही उपयोग अवश्य करून घ्यावा.

सजगता

येणाऱ्या काळात कोणत्या प्रकारच्या नवीन नोकऱ्या तयार होणार आहेत, त्यासाठीचे शिक्षण कुठल्या कॉलेजमध्ये? कुठल्या विद्यापीठात? कोणत्या देशात उपलब्ध आहे? याबाबतचे मार्गदर्शन यातून मिळत असते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जर संगणकासाठीचा प्रोग्राम लिहिण्याची गरज कमी होत जाणार असेल, तर ती आपल्यासाठी धोका (threat) आहे. जीवनकार्य ठरवण्यापूर्वी या गोष्टी ओळखायला हव्या, तरच आपले निर्णय योग्य ठरतील.

आपली बलस्थाने व मर्मस्थाने ओळखणे ही अंतर्गत बाब झाली. त्यासाठी आत्मपरीक्षण करत राहावे लागेल, तर कोणत्या संधी उपलब्ध होतील? व कोणते संभाव्य धोके आहेत? हे समजण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान करून घ्यावे लागेल, जागरूक रहावे लागेल. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करत राहिलो तर आपले योग्य जीवनकार्य निवडता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com