नीट २०२० - देशपातळीवरील प्रवेश प्रक्रिया...

Neet-2020
Neet-2020

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
देशभरातील सर्व प्रमुख परीक्षा एकाच छत्राखाली घेण्यासाठी NTA - नॅशनल टेस्टिंग एजन्सी- राष्ट्रीय चाचणी संस्थेची स्थापना केली आहे. तिच्यावर ‘नीट २०२०’ परीक्षा घेण्याची व परीक्षेच्या निकालानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसार रँक देण्याची जबाबदारी आहे. त्यापुढील प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी NTA कडे नसून देशपातळीवरील प्रवेशप्रक्रिया मेडिकल कौन्सिल कमिटी व देशातील अनेक राज्यांतील प्रवेशप्रक्रिया संबंधित राज्य शासनातर्फे पार पाडली जाते. 

ऑल इंडिया १५ टक्के कोटा
देशभरातील शासकीय, एमबीबीएस शाखेच्या सुमारे २३६ महाविद्यालयांतील ५ हजार जागा व बीडीएस शाखेच्या सुमारे ४२ संस्थांमधील ४५० जागा नीट २०२० परीक्षेतून प्राप्त होणाऱ्या AIQ - ऑल इंडिया कोटा रँकनुसार १५ टक्के कोट्यातून उपलब्ध होतात. नीट निकालानंतर संपूर्ण प्रवेशप्रक्रिया एमसीसी- मेडिकल कौन्सिलिंग कमिटीतर्फे www.mcc.nic.in  या संकेतस्थळावरून दोन फेऱ्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. महाराष्ट्रातील विद्यार्थी या प्रवेशप्रक्रियेत सामील होऊन देशभरातील महाविद्यालयांबरोबरच राज्यातील शासकीय महाविद्यालयांतही १५ टक्के कोट्यातून प्रवेश घेऊ शकतो. प्रवेश फेऱ्या संपल्यानंतर शिल्लक जागा संबंधित राज्याकडे परत केल्या जातात. 

अभिमत महाविद्यालयातील प्रवेश
देशभरातील सर्व अभिमत म्हणजेच डीम्ड विद्यापीठांतील एमबीबीएस शाखेच्या सुमारे ४५ संस्थांतील ७३०० जागा व बी.डी.एस. शाखेच्या सुमारे ३५ संस्थांमधील ३३०० जागांवरील प्रवेश नीट परीक्षेच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या AIR- ऑल इंडिया रँकनुसार होतात. संपूर्ण प्रवेशप्रक्रिया एमसीसीतर्फे राबविण्यात येते. सर्वसाधारणपणे प्रवेशाच्या तीन फेऱ्या राबविण्यात येतात. प्रत्येक फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरावे लागतात. तीन फेऱ्यांनंतर शिल्लक राहिलेल्या जागा संबंधित संस्थांकडे वर्ग केल्या जातात. 

आयुष – ऑल इंडिया प्रवेशप्रक्रिया
AYUSH : (आयुर्वेद, योगा अँड नॅचरोपॅथी, युनानी सिद्ध अँड होमिओपॅथी) मंत्रालयातर्फे २०१९ मध्ये प्रथमच देशभरातील शासकीय, शासन अनुदानित महाविद्यालयांतील १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील तसचे १५ टक्के खासगी महाविद्यालयातील आणि अभिमत विद्यापीठातील १०० टक्के जागांवरील बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस व बीएसएमएस (बॅचलर ऑफ सिद्ध मेडीसिन अँड सर्जरी) शाखांची प्रवेशप्रक्रिया आयुष ॲडमिशन सेंट्रल कौन्सिलिंग कमिटी तर्फे www.aaccc.gov.in या संकेतस्थळावरून राबविण्यात आली. शासकीय व खासगी १५ टक्के कोट्यासाठी दोन फेऱ्या व अभिमत प्रवेशासाठी तीन फेऱ्या राबविण्यात आल्यानंतर उर्वरित शासकीय जागा संबंधित राज्याकडे वर्ग केल्या व अभिमतच्या संबंधित संस्थांकडे वर्ग करण्यात आल्या. प्रत्येक फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम नोंदविण्याची सोय होती. 

इतर महाविद्यालयांतील प्रवेश
AFMC : सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय पुणे येथील एमबीबीएसच्या १४५ जागांवरील प्रवेशांसाठी एमसीसीकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर गुणवत्तेनुसार सुमारे १७५० विद्यार्थ्यांची निवड यादी AFMC कडे पाठविली जाते व त्यानंतर AFMC तर्फे एक स्वतंत्र परीक्षा व मुलाखत घेऊन अंतिम निवड केली जाते. 

MGIMS स्पर्धा सेवाग्राममधील १०० पैकी ५० जागा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असून ते प्रवेश राज्याच्या प्रवेशप्रक्रियेतून होतात. उर्वरित ५० जागा देशपातळीवरील कोट्यातून एमसीसीतर्फे भरल्या जातात. 

जेआयबीएमआरमधील २०० जागा आणि एआयआयएमएसच्या (एम्स) १५ संस्थांमधील सुमारे १२०० जागांवरील प्रवेशांसाठी यंदा स्वतंत्र परीक्षा होणार नसून सर्व प्रवेश ‘नीट २०२०’मधून होणार आहेत. एकंदरीत वरील सर्व देशपातळीवरील प्रवेशप्रक्रियेसाठी देशपातळीवरील आरक्षण, SC १५ टक्के, ST ७.५ टक्के, OBC-NCL- २७ टक्के व जनरल- EWS- १० टक्के आरक्षण असून त्यासाठी भविष्यात उपलब्ध होणारी कागदपत्रे पाहूनच आरक्षणाची अचूक नोंदणी अर्ज भरताना करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com