नीट २०२० - राज्यातील प्रवेशप्रक्रिया

NEET
NEET

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
देशभरातील आरोग्यविज्ञान शाखेतील एमबीबीएस, बीडीएससह बीएएमएस, बीएचएमएस व उर्वरित शाखातील प्रवेशासाठी फक्त ‘नीट २०२०’ ही एकच परीक्षा घेण्यात येणार असून, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.nta.ac.in संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१९पर्यंत उपलब्ध आहेत. ३ मे २०२० रोजी देशपातळीवर परीक्षा एकाच दिवशी पेन अँड पेपर पद्धतीने घेण्यात येणार असून, परीक्षेचा निकाल ४ जून २०२० रोजी लागेल. निकालानंतर देशपातळीवरील एमबीबीएस व बीडीएस शाखांची प्रवेशप्रक्रिया एमसीसी-मेडिकल कौन्सिलिंग कमिटीतर्फे व उर्वरित ‘आयुष’ मंत्रालयातर्फे राबविण्यात येणार आहे. देशभरातील प्रत्येक राज्यातील प्रवेशप्रक्रिया संबंधित राज्यातर्फे पार पाडण्यात येते. 

राज्यस्तरीय कोटा
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विज्ञान शाखेतील शासकीय, शासनअनुदानित एमबीबीएस शाखेच्या सुमारे २४ संस्थांमधून ४२८० जागा, खासगी महाविद्यालयातील १७ संस्थांमधून २१२० जागा उपलब्ध होतात. बीडीएस शाखेतील शासकीय चार संस्थांमधून २९४ जागा, खासगी २६ महाविद्यालयातून २३५० जागा, तसेच बीएएमएस शासकीय २१ संस्थांतून १६६२ जागा, खासगी ५४ संस्थांतून ३४७० जागा उपलब्ध होतात. बीएचएमएस शाखेच्या खासगी ५४ संस्थांतून ४१८० जागा तसेच उर्वरित शाखांतील प्रवेशासाठी सीईटी सेल- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यातर्फे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. ‘नीट’ परीक्षेच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेचे माहितीपत्रक व संपूर्ण वेळापत्रक सीईटी सेलच्या www.mahacet.org संकेतस्थळावर जून २०२०मध्ये उपलब्ध होते. 

महत्त्वाचे टप्पे
नीट २०२०मधून प्रवेशासाठी पात्रता प्राप्त केलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रथम रजिस्ट्रेशन म्हणजेच नावनोंदणी केली जाते. मागील वर्षी  राज्यातून सुमारे २ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तरी प्रत्यक्षात सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. 

नावनोंदणीनंतर कागदपत्रांची तपासणी पार पाडली जाते. कागदपत्रांची पडताळणीवेळी ज्यांच्याकडे आरक्षण वगैरेंबाबत कागदपत्रे नसतील त्यांना खुल्या गटात समाविष्ट केले जाते. तपासणीनंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी म्हणजेच मेरीट क्रमांक जाहीर होतो. 

संकेतस्थळावरून पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पसंतीक्रम भरून घेतले जातात. एकदाच भरलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेशासाठीच्या आवश्यक फेऱ्या राबविल्या जातात. त्यानुसार जागांचे वाटप झाल्यानंतर प्रत्यक्ष संस्थेत प्रवेश घेणे व पुढील फेरीत चांगल्या प्रवेशाची प्रतीक्षा करणे किंवा प्रवेश आवडला असल्यास तो निश्चित करणे, असे महत्त्वाचे टप्पे असतात. 

राज्यस्तरीय आरक्षणाबाबत
राज्यातील आरक्षण व देशपातळीवरील आरक्षण यात मोठा फरक असून, त्यांचे नियमही वेगळे असतात. सद्यःस्थितीत ‘नीट २०२०’ परीक्षेचा फॉर्म भरताना आपण देशपातळीवरील आरक्षणातून नोंदणी करतो म्हणजेच जनरल, ईडब्ल्यूएस जनरल, ओबीसी एनसीएल, एससी, एसटी याममधून नोंदणी करतो. ‘नीट २०२०’च्या निकालानंतर राज्यशासनाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यातील आपल्याला मिळणाऱ्या आरक्षणातून मागणी करावी लागते. आरक्षण नोंदविल्यानंतर कागदपत्रे तपासणीनंतरच आपली मागणी मान्य होते. कागदपत्रांत कमतरता असल्यास आपली मागणी रद्द होऊन सर्वसाधारण (जनरल) गटामधून अंतिम नोंदणी केली जाते. 

महाराष्ट्र राज्यस्तरावर अनुसूचित जाती एससी- १३ टक्के, अनुसूचित जमाती एसटी- ७ टक्के, विमुक्त जाती- अ-व्हीजे- ३ टक्के, भटक्या जमाती- ब- एनटीबी अडीच टक्के, भटक्या जमाती- क- एनटीसीसाठी साडेतीन टक्के व भटक्या जमाती- ड- एनटीडीसाठी दोन टक्के, ओबीसी- इतर मागासवर्ग- १९ टक्के, एसईबीसी- मराठा आरक्षण १२ टक्के व ईडब्ल्यू एस- आर्थिक दुर्बल घटकासाठी १० टक्के आरक्षण असून इतरही विशिष्ट आरक्षण असते. जूनमध्ये प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना त्याची नोंदणी करावी लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com