‘नीट २०२०’ आरक्षण नोंदणीबाबत

NEET
NEET

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
देशभरातील शासकीय, खासगी व अभिमत विद्यापीठामधील एमबीबीएस शाखेच्या सुमारे ५३९ संस्थांमधील ८० हजार जागांसाठी तसेच बी. डी. एस. शाखेतील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट २०२०’ परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.nta.ac.in या संकेतस्थळावर २ डिसेंबर २०१९ पासून उपलब्ध होत आहेत.

‘नीट २०२०’ स्कोअरचा उपयोग
‘नीट २०२०’ परीक्षेतील गुणांच्या आधारे देण्यात येणाऱ्या SIQ- ऑल इंडिया कोटा रँकच्या आधारे देशपातळीवरील शासकीय एमबीबीएस व बीडीएस शाखेच्या १५ टक्के जागेवरील प्रवेश दिले जातात.

याच परीक्षेतील गुणांच्या आधारे देण्यात येणाऱ्या AIR - ऑल इंडिया रँकच्या आधारे देशभरातील सर्व शासकीय, खासगी व अभिमत विद्यापीठामधील एमबीबीएस, बीडीएस शाखांच्या जागेवरील प्रवेश दिले जातात.

देशभरातील ‘आयुष’- अंतर्गत बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस शाखेतील प्रत्येकी १५ टक्के शासकीय आणि खासगी व अभिमत विद्यापीठामधील १०० टक्के प्रवेश दिले जातात. 

देशभरातील सर्व राज्यांतील प्रवेशासाठी नीटचा स्कोअर वापरतात. 

‘नीट २०२०’ परीक्षेचा स्कोअर जरी देशभरातील प्रत्येक राज्यातील प्रवेशासाठी वापरण्यात येत असला, तरीही देशपातळीवरील प्रवेशाचे व प्रत्येक राज्याच्या प्रवेशाचे आरक्षण व जागावाटप, नियम वेगवेगळे असतात. थोडक्यात, ‘नीट’ परीक्षेचा आपण भरणार आहोत तो अर्ज देशपातळीवरील प्रवेश प्रक्रियेसाठी आहे. त्यामुळे फॉर्ममधील सध्या नोंदविले जाणारे आरक्षण व इतर माहिती ही देशपातळीवरील प्रवेशासाठी आहे, हे प्रथम ध्यानात घ्यावे. नीट परीक्षेच्या जूनमधील निकालानंतर प्रत्येक राज्याची प्रवेश प्रक्रिया प्रथम ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून व त्यानंतर राज्यातील मेरिट क्रमांकाचे वाटप करून राज्यातर्फे पार पाडली जाते.

आरक्षण नोंदणी 
अनुसूचित जाती : (SC) : १५ टक्के, अनुसूचित जमाती : (ST) : ७.५ टक्के आरक्षण लागू. त्यासाठी उत्पन्नाची अट नाही. इतर मागासवर्ग : (OBC) २७ टक्के आरक्षण असून, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS यासाठी १० टक्के आरक्षण असून, कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ८ लाखांहून कमी, शेतजमीन पाच एकरपेक्षा कमी, रहिवासी फ्लॅट १ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त नसावा, नगरपालिका हद्दीत १०० चौरस यार्ड व इतर ठिकाणी २०० चौरस यार्ड एवढ्या आकारापेक्षा अधिक प्लॉट नसावा. 

अर्ज भरताना कोणताही दाखला लागत नाही. ‘नीट’च्या निकालानंतर देशपातळीवरील प्रवेश प्रिक्रया ऑल इंडिया रँकनुसार थेट सुरू होते. सदर ठिकाणी राज्यातील प्रवेश प्रक्रियेसारखी पसंतीक्रम भरण्यापूर्वी कागदपत्रे तपासण्याची पद्धत नसते. राज्यात अंतिम मेरिट कागदपत्र तपासणीनंतर जाहीर केले जाते. देशपातळीवर मात्र कागदपत्र तपासणी पसंतीक्रम भरण्यापूर्वी नसते. कागदपत्रांची जबाबदारी संपूर्णपणे पालक, विद्यार्थी यांची असते. देशपातळीवरील प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस सदरचे दाखले सादर करू न शकल्यास मिळालेला प्रवेश रद्द होतो, याची नोंद घ्यावी.

थोडक्यात, ओबीसी एनसीएलमधून नोंदणी करताना भविष्यात नॉन-क्रिमीलेअर मिळणार नसेल, तसेच ओबीसी सेंट्रल लिस्टमध्ये आपला समावेश नसेल तर नोंदणी करू नये. अपंग प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाचे चालत नसून मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकता या चार ठिकाणीच ते प्राप्त करावे लागते. BWD - अपंग प्रवर्गातून नोंदणी करताना दक्षता घ्यावी. 

अत्यंत महत्त्वाचे -
SEBC - मराठा आरक्षण १२ टक्के हे फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये लागू असल्याने ‘नीट २०२०’मध्ये ते नोंदविण्याची सोय नसते. MKB - महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमाक्षेत्र, HA - हिली एरिया म्हणजेच डोंगरी प्रदेश आरक्षण- डिफेन्स- लष्कर सेवा या साठीचे आरक्षण ‘नीट’ अर्जात नसते. ‘नीट’ निकालानंतर जूनमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य शासनाचे CET सेलतर्फे ऑनलाइन नोंदणी करताना सदरचे राज्यातील आरक्षण नोंदविण्याची सोय असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com