नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे नई तालीम

महात्मा गांधी हे केवळ एका माणसाचे नाव नाही, तर भारतीय मातीत बेमालूमपणे मिसळून गेलेल्या फेनॉमेनॉचं नाव आहे.
new educational policy means new training gandhi jayanti 2023
new educational policy means new training gandhi jayanti 2023 esakal
Updated on

महात्मा गांधी हे केवळ एका माणसाचे नाव नाही, तर भारतीय मातीत बेमालूमपणे मिसळून गेलेल्या फेनॉमेनॉचं नाव आहे. या नम्र जाणिवेतून त्यांच्या विराट रूपाचे एखादे तरी कवडसे पकडणे दिवसेंदिवस गरजेचे झाले आहे.

आज गांधी विचार जुने झाले आहेत की, अजूनही औचित्यपूर्ण आहेत; हा चर्चेचा मुद्दा असूच शकत नाही. कारण गांधी विचार हे वाहते पाणी आहे. विशिष्ट रंग, रूप, आकार यांच्या साच्यात त्यांना बसवण्याचा अट्टहास म्हणूनच निरर्थक आहे. गांधी विचारांच्या लवचीक, प्रवाही असण्यातच त्यांची ताकद आणि सौंदर्य दडलेले आहे.

‘माझ्या दोन विचारांमध्ये विसंगती दिसत असेल तर मी शेवटच्या वेळी त्यासंदर्भात नवे काय बोललो होतो; ते तुम्ही गृहीत धरा’, हे खुद्ध गांधीजींनी सांगून ठेवलंय. तेव्हाच्या आणि आताच्या तंत्रज्ञानाने व्यापून उरलेल्या, स्त्री-पुरुष आणि एकूणच मानवी नातेसंबंधाचा चेहरा प्रचंड बदललेल्या ग्लोबल काळात गांधी कसे वागले असते?

आजच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणात गांधी नावाच्या माणसाने कसा विचार केला असता? हे सगळं गुंतागुंतीचं आहे. आज देशात अनेक क्षेत्रात स्थित्यंतरे घडत आहेत. सामाजिक, राजकीय, परकीय नीतीसोबतच सध्या देशात नवीन शैक्षणिक धोरणाचाही बोलबाला चालू आहे. हे धोरण राबविण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.

हे सरकार कितीही या शैक्षणिक धोरणासंदर्भात स्वतःची टिमकी वाजवत असले, तरी जेव्हा तुम्ही वर्ध्याच्या आश्रमात जाता आणि तिथल्या 'नई तालीम'च्या विद्यार्थ्यांना भेटता, तेव्हा तुम्हाला समजेल आज आपण नवीन शैक्षणिक धोरण म्हणतो ना; ते तर आपल्या महाराष्ट्रातील वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात १९३७ मध्येच सुरू झाले आहे. सेवाग्राम आश्रमाला भेट देणाऱ्यांनी जरूर तिथल्या ‘नई तालीम’च्या आनंद निकेतन शाळेला भेट द्यावी.

गांधीजींच्या मूलभूत शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना हस्तकलेचे शिक्षण देणे हे होते, ज्यामुळे ते त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडवू शकतील आणि त्याच वेळी चांगले नागरिकत्वाचे गुण विकसित करू शकतील. गांधीजींच्या मते, ‘संस्कार आणि नैतिक मूल्यांच्या माध्यमातून सुदृढ शिक्षण रुजले पाहिजे.’

गांधीजी म्हणाले होते की, ‘नई तालीम हे माझ्याकडून देशाला सर्वोत्तम भेट आहे.’ व्यक्ती ज्या समाजात राहतो अशा अहिंसात्मक समाजात व्यक्तीचा सर्वांगीण विकास म्हणजेच ‘नई तालीम’. मन, बुद्धी आणि शरीर यावर आधारित ही आनंद निकेतन शाळा आजही तितक्याच पारंपरिक पद्धतीने शिक्षण देत आहे.

गांधी म्हणायचे, ‘बुद्धीसोबत जेव्हा तुम्ही श्रम करता आणि बुद्धी, श्रम यातून जी निर्मिती होते त्या निर्मितीचा आनंद कितीतरी पट जास्त असतो.’ इथल्या शाळेतील मुलांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मुले म्हणाली आम्ही रोज सूतकताई करतो.

रोजचा स्वयंपाक जो शाळेतल्या सर्व मुलांसाठी लागतो तो आम्हीच बनवितो. सूतकताई म्हणून आम्हाला फक्त कताईच नाही, तर शेतीमधून कापूस कसा पिकतो, पीक येण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात, याचीही आम्हाला जाणीव आहे, मुलं शेतीतील अनेक कामे करतात.

शेतातल्या पालेभाज्या रोजच्या स्वयंपाकघरात येतात, त्यापासून जेवण कसे तयार करायचे ते इथे विद्यार्थी शिकतात. शाळेच्या स्वच्छतागृहांपासून ते त्यांच्या वर्गखोल्यांची स्वच्छता रोज विद्यार्थी आणि शिक्षकच करतात. इथे शिपाई ही संकल्पनाच नाही. शिक्षक आणि विद्यार्थी शाळेतील सर्व कामे करून शेती, स्वयंपाक, सूतकताई हीदेखील कामे करतात यातूनच स्वयंपूर्ण शाळा आजही सुरू आहे.

आजही गांधींनी सुरू केलेल्या या प्रयोगशील शिक्षण पद्धतीसाठी शासन संवेदनशील नाही. त्यांच्या शाळेला अनुदान नाही. ही शाळा स्वयंपूर्ण पद्धतीने चालवली जाते. जवळजवळ ८० वर्षांपूर्वी म्हणजेच १९४२ च्या ऑगस्ट महिन्यात बापूंनी बेसिक टीचर ट्रेनिंग या शाळेच्या परिसरात सुरू केले होते.

या कॅम्पसमध्येच पहिली जागतिक शांतता परिषद झाली होती. १९४७ साली खरतर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यासोबत शिक्षण हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे साधन आहे, याचा वेगळा विचार करणे म्हणजे एक असाधारण विचार होता. गांधीजी म्हणायचे, ‘नई तालीम हा विचार गावागावात पोहोचला पाहिजे.’

त्यांचे म्हणणे असे की, ‘नुसती वर्णमाला शिकवली तर त्या विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ खुंटते. जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, कताई, कला, अंकगणित येत नाही, तोपर्यंत त्याला वर्णमाला समजणार नाही, असे त्यांचे नम्र मत होते.’

गांधींच्या मते, ‘मन आणि आत्म्याचा सर्वोच्च विकास शक्य असेल तरच त्याला शिक्षण म्हणता येईल. विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कृती करण्याचा अनुभव दिला तर कदाचित ही शिक्षण पद्धती यशस्वी ठरू शकते.’ ३१ जून १९३७ मध्ये 'हरिजन' मध्ये गांधीजींनी ‘नई तालीम’चा विचार मांडला होता. २३ ऑक्टोबर १९३७ मध्ये वर्धा येथे शिक्षण परिषद झाली. आणि शिक्षणाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.

गांधीजींच्या ‘नई तालीम’चे शिक्षण समानता आणि लोकशाहीच्या स्वरूपात होते. ते एक तत्त्वज्ञान आहे आणि याच तत्त्वज्ञानाची बीजे सेवाग्राम येथे १९३७ मध्येच या प्रयोगातून रुजली. या शाळेचे पहिले आचार्य होते डब्ल्यू आर्यनायकम, ते श्रीलंकेचे होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनच्या तालमीत ते घडले. त्यांच्या पत्नी आशादेवी यांनीदेखील अनेक वर्षे या प्रयोगाला बळ दिले. चार-पाच विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही शाळा अल्पावधीतच राष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र बनली.

‘वयाच्या चौदा वर्षांपर्यंत मुलांना सक्तीचे आणि विनामूल्य शिक्षण द्यावे, भारतीय पारंपरिक संस्कृतीचा प्रसार झाला पाहिजे, शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले जावे. ‘नई तालीम’ ही समग्र प्रक्रिया हवी.

मन, मेंदू शरीर यांचा योग्य वापर करून दिलेले शिक्षण बालकाला स्वयंपूर्ण बनवू शकते’, असा गांधींना विश्वास होता. स्थानिक गरजेनुसार ‘नई तालीम’चा अभ्यासक्रम निवडण्यात आला. हस्तकला, विणकाम, सुतारकाम, शेती, फलोत्पादन, चामड्याचे काम,

मासे संवर्धन, मातीची भांडी, गवंडी काम, शेतीमधील छोटी-मोठी कामे आणि स्वयंपाक असा परिपूर्ण अभ्यासक्रम आखला गेला. आज गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत ‘नई तालीम’च्या जवळपास साडेतीनशे शाळा आहेत आणि इथे अभ्यासासोबत अशा अनेक कला शिकवल्या जातात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणसुद्धा गांधी यांच्या ‘नई तालीम’वर आधारले आहे.

आजचे आपले नवे शैक्षणिक धोरण म्हणते की. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण द्या, कौशल्ये आधारित शिक्षण द्या, इंडियन नॉलेज सिस्टीम शिकवा. गांधीजींनी १९३७ मध्ये केलेला हा प्रयोग पुन्हा नव्याने या धोरणाच्या माध्यमातून अजमावत आहोत. शिक्षण हे केंद्रस्थानी ठेवून मुलांच्या सर्जनशीलतेला महत्त्व दिले पाहिजे. कोणतेही काम जे कठोर परिश्रमाची शक्ती दर्शवते तेच खरे शिक्षण.

शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दिष्ट ‘भारताला जागतिक ज्ञान महासत्ता’ बनविणे असले, तरी नवीन शैक्षणिक धोरणाची आवश्यकता १९८५च्या राजीव गांधींच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर शैक्षणिक धोरणावर व्यापक बदल करणारे काम झालेले नव्हते.

जग मात्र झपाट्याने बदलत आहे. जागतिकीकरण, शीतयुद्धाचा शेवट, मोबाईल, इंटरनेटसह सर्वच क्षेत्रांत झपाट्याने बदल होत आहे. हा बदल म्हणावा तसा आपल्याकडे शिक्षण क्षेत्रात दिसून येत नव्हता. तो व्हावा म्हणून या नवीन शिक्षण पद्धतीची गरज होती.

या दृष्टीने ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. ११ जून २०१७ पासून या समितीचे काम सुरू होते. शेवटी १९ जुलै २०२० रोजी भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने या समितीने मांडलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली.

या समितीने नवीन शैक्षणिक धोरण मांडताना एकविसाव्या शतकातील सर्व समस्यांचा विचार केलेला दिसून येतो. नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट ‘ज्ञानावर व सर्व प्रकारच्या समानतेवर आधारित समाज निर्माण करणे हे आहे.’ नवीन शिक्षण प्रणालीच्या आधारे भारत जागतिक महासत्ता होऊ शकेल, असे अनेक शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

आपली मानवी प्रवृत्ती नेमकी कुठे कच खाते ते अजूनही निश्चित कळत नाही. म्हणून म्हणावेसे वाटते की, गांधीजींची मूलोद्योगी शिक्षा (नई तालीम) प्रणाली किंवा कोठारी आयोगाच्या तरतुदी या देशाला प्रगतीकडे घेऊन जायला अतिशय सक्षम होत्या. स्वातंत्र्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना आपण १०० टक्के साक्षर नाहीत. हे कटू सत्य स्वीकारणे कठीण जात आहे. यापूर्वीच्या योजनाही आपल्याकडे खूप चांगली धोरणे आली; परंतु ती राबविण्यात यश आले नाही. आज हे धोरण खाजगी आणि क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये यशस्वी होऊ शकेल; परंतु ग्रामीण भागात हे धोरण राबविणे एक आव्हान असेल.

- प्राचार्य रेखा शेळके एमजीएम विदयापीठ, छत्रपती संभाजीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com