आधी संकल्पना समजून घ्या!

सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील सनपाणे नावाच्या छोट्या गावातून मी आलो आहे. माझे आजोबा हमाल माथाडी कामगार संघटनेशी संबंधित होते आणि मुंबईला त्यांनी आयुष्यभर हमाली केली.
Onkar Pawar
Onkar Pawarsakal

- ओंकार पवार, आयएएस-सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली

सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील सनपाणे नावाच्या छोट्या गावातून मी आलो आहे. माझे आजोबा हमाल माथाडी कामगार संघटनेशी संबंधित होते आणि मुंबईला त्यांनी आयुष्यभर हमाली केली. बाकी सर्व कुटुंबीय गावाला आणि आजोबा एकटेच मुंबईला राहत होते. माझे आई-वडील दोघंही शेतकरी.

माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण गावाजवळच्या रयत शिक्षण संस्थेच्या एका विद्यालयात झालं. त्यानंतर कराडला डिप्लोमा केला आणि मग पुण्यात डी. वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.

आमच्या घरात तसं थोडं सामाजिक, राजकीय वातावरण आहे. आजी सरपंच होती. त्यामुळे माझे वडील आणि काका यांची इच्छा होती की, मीही प्रशासनात जावं, अधिकारी व्हावं. त्यामुळे मला हुरूप आला. याच काळात म्हणजे साधारण २०१५ मध्ये मी श्रीकर परदेशी यांचं एक व्याख्यान ऐकलं. ते तेव्हा पुण्याचे महापालिका आयुक्त होते.

त्यांच्या बोलण्यातून मला प्रेरणा मिळाली आणि मी अभ्यास सुरू केला. टीसीएस कंपनीत माझी निवड झाली होती. मात्र, ती संधी सोडून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पुण्यात ज्ञानप्रबोधिनीच्या अभ्यासिकेत मी अभ्यास सुरू केला.

अभ्यास सुरू केल्यावर माझे यूपीएससीचे पहिले तीन प्रयत्न अपयशी ठरले. अनुभव सोडून हाती फार काही लागलं नाही. त्यानंतर कोरोना आला. त्यामुळे मी गावाला गेलो आणि तेथे आमच्या एका काकांकडे राहू लागलो. त्यांच्या घरी पुरेशी शांतता असल्याने मी तिथेच राहून अभ्यास सुरू केला. प्रयत्न सुरू ठेवले. २०२० मध्ये मी आयपीएस झालो. त्यानंतर पुन्हा २०२१ मध्ये मी आयएएस झालो आणि मला महाराष्ट्र केडर मिळाले.

या प्रवासात मला जाणवलेल्या काही गोष्टी आता परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना सांगायला आवडतील. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, पहिल्या दिवसापासूनच ‘इनोवेटिव्ह’ काही तरी करण्याचा विचार करू नका. आधी ‘बेसिक्स’ समजावून घ्या. सर्व संकल्पना स्वतः पूर्णपणे कळल्या आहेत का, याची खात्री करून घ्या आणि मग त्यात काय नवं काही करता येईल का? याचा विचार करा.

मी गावाकडे तयारी करत असताना माझ्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्यामुळे सतत नवीन काही तरी करू अशा चर्चाही नव्हत्या. माझे पहिले तीन प्रयत्न अपयशी ठरल्याने मी पूर्णतः नव्याने आणि वेगळ्या पद्धतीने तयारी करायची असं ठरवलं. त्यासाठी जे बेसिक आहे ते समजून घेतलं आणि तसंच परीक्षेत लिहिलं. त्यामुळे चुका होण्याची शक्यता खूप कमी झाली.

‘प्रीलिम’साठी आवृत्ती करणं खूप महत्त्वाचं असतं. कमीत कमी १०० प्रश्‍नपत्रिका, विविध प्रश्‍नसंच सोडवा. तेच ते वाचा. गणित, इंग्रजीसारख्या अवघड विषयांचा बाऊ न करता त्यांना अधिक सोपे कसे करता येईल? याचा विचार करा. कोणताही प्रश्‍न सोडवल्यावर तो डोक्यात फिट्ट बसवा आणि मग आत्मविश्‍वासाने परीक्षेला जा. यश नक्कीच मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com