कृत्रिम बुद्धिमत्तेचे अद्‌भुत विश्‍व

आशिष तेंडुलकर 
Thursday, 16 January 2020

Artificial Intelligence क्षेत्रातील संधींविषयी माहिती घेणार आहोत. हे क्षेत्र तुलनेने नवीन असल्यामुळे, सुरुवातीला आपण या क्षेत्राविषयी जाणून घेऊयात. 

या  लेखमालेत आपण कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence क्षेत्रातील संधींविषयी माहिती घेणार आहोत. हे क्षेत्र तुलनेने नवीन असल्यामुळे, सुरुवातीला आपण या क्षेत्राविषयी जाणून घेऊयात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्राची (Computer Science) एक उपशाखा असून, त्यात संगणकाला मानवाप्रमाणे बुद्धिमान करता येईल का आणि कसे, या विषयी संशोधन केले जाते. संगणकाला मुळात स्वतःची बुद्धी नसते. त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी आपल्याला विशिष्ट आज्ञावली (Program) लिहावी लागते. समजा आपणास संगणकाकडून दोन अंकाची बेरीज करून घ्यायची असल्यास त्या विषयीची आज्ञावली आपणास लिहावी लागते. ही आज्ञावली आपल्याला संगणकाला समजणाऱ्या भाषेत लिहावी लागते. उदाहरणार्थ ‘जावा’, ‘सी’, ‘सी++’, ‘पायथॉन’ आदी संगणकीय भाषांमध्ये ही आज्ञावली लिहावी लागते. म्हणजेच, प्रत्येक नवीन कामासाठी आपल्याला स्वतंत्र आज्ञावलीचा गरज पडते. 

आज्ञावली लिहिल्याशिवाय संगणकाकडून काम करून घेता येईल का, असा प्रश्न शास्त्रज्ञांच्या मनात उपस्थित झाला आणि त्या विषयीचे संशोधन कृत्रिम बुद्धिमत्ता या ज्ञान शाखेत करण्यात येत आहे. मागील काही वर्षांमध्ये यातील काही संशोधन ॲण्ड्रॉइड ॲप्सच्या मदतीने नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहे. उदाहरणार्थ गुगल फोटो या ॲण्ड्रॉइड ॲपमध्ये आपण आपले फोटो भाषेच्या माध्यमातून सहज शोधू शकतो. ‘आशिषचे समुद्रकिनाऱ्यावरील फोटो,’ असे भाषेच्या माध्यमातून आपण फोटो शोधू शकतो. यू-ट्यूबवरील यासारखे अजून काही व्हिडिओ किंवा ऑनलाइन शॉपिंगमधील (ऍमेझॉन/फ्लिपकार्ट) वस्तू हेही कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार आहे. 

या प्रणाली कशा बनविल्या जातात ते आता आपण थोडक्यात पाहूया : एखादी गोष्ट संगणकाकडून करून घेण्यासाठी आपल्याला तशी आज्ञावली लिहावी लागते, हे पाहिले. या आज्ञावलीमध्ये आपल्याला नियम लिहावे लागतात. उदा. बेरजेच्या आज्ञावलीमध्ये बेरजेच्या नियम लिहावा लागतो. एकदा आज्ञावली तयार झाल्यावर आपणास दिलेल्या संख्यांची बेरीज करून मिळते. आता हेच काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने करायचे झाल्यास आपल्याला संख्या आणि त्यांची बेरीज या स्वरूपात अनेक उदाहरणे द्यावी लागतात. या उदाहरणांचा वापर करून संगणक बेरजेचे तंत्र शिकतो. थोडक्यात, पारंपरिक पद्धतीत एखादे काम संगणकाकडून करून घ्यायचे असल्यास त्या कामाचे नियम आज्ञावलीच्या माध्यमातून मांडावे लागतात. आणि तेच काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने करायचे असल्यास त्या कामाची उदाहरणे संगणकाला उपलब्ध करून द्यावी लागतात. या उदाहरणांच्या साह्याने संगणक ते विशिष्ट काम आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो.

पुढील भागात आपण काही विशिष्ट उदाहरणांच्या साह्याने या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू. या सर्व प्रवासात त्याची आपल्याला फार मोठी मदत होणार आहे, त्या संगणकाला स्मरून हा लेख इथे संपवूयात...

तळटीप : या लेखमालेमध्ये लेखकाने जाणीवपूर्वक मराठी शब्दांचा वापर केला आहे. वाचकांच्या माहितीसाठी प्रत्येक अशा शब्दाच्या प्रथम वापरासोबत त्याचा इंग्लिश भाषेतील पर्यायी शब्द दिला आहे. 

(लेखक कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांना या क्षेत्रात काम करण्याचा मोठा अनुभव असून, त्यांनी आयआयटी (मुंबई) येथून संगणक शास्त्रातील डॉक्टरेट संपादन केली आहे.)

एज्युकेशन जाॅब्स

करिअर शिक्षण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opportunities in the Artificial Intelligence field