मायक्रोबायोलॉजीतील संधी

पीसीबी ग्रुपसह बारावी सायन्स करणारे विद्यार्थी ‘नीट’ परीक्षेची तयारी करून डॉक्टर होण्याचे प्रयत्न करत असतात.
microbiology
microbiologysakal

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

पीसीबी ग्रुपसह बारावी सायन्स करणारे विद्यार्थी ‘नीट’ परीक्षेची तयारी करून डॉक्टर होण्याचे प्रयत्न करत असतात. मात्र, विद्यार्थ्यांची मोठी संख्या आणि उपलब्ध अल्प जागा पाहता अनेकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी आपल्या अभ्यासक्रमाला अनुसरून अन्य पर्याय शोधत असतात. ज्यांना बायोलॉजी हा विषय आवडत असतो, त्यांना बायोलॉजीवर आधारित करिअर करणे आवडते. त्यांच्यासाठी ‘बीएससी मायक्रोबायोलॉजी’ हा पर्याय उपलब्ध आहे.

क्षमता

बायोलॉजीमधील खासकरून ‘सेल बायोलॉजी’ हा भाग आवडीचा असावा. यामध्ये सर्व अभ्यास आणि नंतर करिअरमधील कामकाज हे मायक्रो स्वरूपाचे असल्याने एकूणच मायक्रो विषयांबद्दल नावड, राग, तिरस्कार नको. अचूक निरीक्षण, एका जागेवर बसून काम करण्याची तयारी, प्रयोगशील मन, कुतूहल, वाचनाची आवड, एकाग्रता, तार्किक शक्ती, संयम या क्षमता अपेक्षित आहेत.

कोर्सचे स्वरूप

बीएससी मायक्रोबायोलॉजी हा कोर्स बारावी सायन्सनंतर तीन वर्षांचा आहे. आता नव्या धोरणाप्रमाणे काही विद्यापीठांमध्ये चार वर्षांचा आहे. थेअरी हा लेक्चर्स सोबतच प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट, इंटर्नशिप या स्वरूपाचा हा अभ्यासक्रम असतो.

प्रवेश प्रक्रिया

प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा नसते. शक्यतो बारावीच्या गुणांवर आधारित मेरिटप्रमाणे प्रवेश मिळतो. तरीही काही संस्था त्यांची प्रवेशपरीक्षा घेऊ शकतात. अशा परीक्षा बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेनंतर असतात. पीसीबी सीईटीचा स्कोअर लक्षात घेऊनही प्रवेश देणाऱ्या काही संस्था असतात.

काय शिकायला मिळते?

सेल स्ट्रक्चर, ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक्स, इम्युनॉलॉजी, टिश्यू कल्चर, बायोइन्फॉर्मेटिक्स, टॅक्सॉनॉमी, मेडिकल मायक्रोबायोलॉजी, फर्मेंटेशन, बायोकेमिस्ट्री, एन्झाइम्स, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, पॅरासायटॉलॉजी, डीएनए, मॅक्रोबायल बायोटेक्नॉलॉजी आदी विषय अभ्यासता येतात. प्रॅक्टिकल्समध्ये जनरल मायक्रोबायॉलॉजी, मायकॉलॉजी, ॲनालिटिकल बायोकेमिस्ट्री, फिजिकल सायन्स, जेनेटिक इंजिनीअरिंग, मायक्रोबायल फिजिऑलॉजी आदी विषयांवर प्रात्यक्षिके घेतली जातात.

उच्च शिक्षणाच्या संधी

बीएससी मायक्रोबायोलॉजीनंतर एमएससी मायक्रोबायोलॉजी, एमएससी बायोटेक्नॉलॉजी, एमबीए बायोटेक्नॉलॉजी, एमएससी बॉटनी, एमएससी झूलॉजी, एमएससी जेनेटिक्स आदी कोर्सेस करता येतात. शक्यतो उच्च शिक्षण घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने जास्त संधी मिळतात.

नोकरीच्या संधी

आरोग्य, पॅथॉलॉजी, बायोसायन्स, औषध निर्माण, पर्यावरण, फूड इंडस्ट्री, जेनेटिक्स आदी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी आहेत. शक्यतो उच्च शिक्षणानंतर संशोधनातील संधी प्रामुख्याने असतात. प्रयोगशाळांमधील काम हे त्यात सर्वाधिक असते. संबंधित कार्यक्षेत्रांतील इंडस्ट्रियल प्रॉडक्शन प्रोसेसमध्ये पदवीधरांना संधी मिळते.

सरकारी विभागांमध्ये संशोधनाचे काम असते, परंतु संख्येवर मर्यादा आहे. परदेशात संधी अधिक असल्याने या करिअरला आपण ग्लोबल करिअर म्हणू शकतो. खासकरून क्लिनिकल रिसर्चमधील संधी महत्त्वाच्या आहेत. बॅक्टेरियावरील संशोधन करणारे बॅक्टेरिऑलॉजिस्ट चांगले करिअर करू शकतात.

इंडस्ट्रियल मायक्रोबायॉलॉजिस्ट, बायोकेमिस्ट, सेल बायोलॉजिस्ट, मेडिकल मायक्रोबायॉलॉजिस्ट आदी पदांवरून काम करण्यासाठी हा कोर्स उपयुक्त ठरतो. फॉरेन्सिक सायन्सेसमधील कार्यक्षेत्रातदेखील या पदवीधरांना संधी असतात. उच्च शिक्षण किंवा पीएचडी शिक्षण पूर्ण झाल्यावर अध्यापन क्षेत्रातसुद्धा संधी मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com