शाळा... चिमुकल्यांचे आरोग्य मंदिर

Intellectual brain
Intellectual brainsakal media
Updated on

शाळा... चिमुकल्यांचे आरोग्य मंदिर

- डॉ. समीर दलवाई

देशातील कारखाने आणि धरणे ही आधुनिक भारताची मंदिरे आहेत, असे पंडित नेहरू म्हणाले होते. या मंदिरांच्या दिशेने मुलांना घेऊन जाणारा मार्ग हा शाळेतूनच जात असतो. तिथे असलेला शिक्षक हा मुलांना धुळाक्षरे शिकवत भावी नागरिक घडवत असतो. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी ही देशाची खरी बौद्धिक संपदा आहे. आजघडीला ही संपदाच पणाला लागली आहे.

पालकांच्या चेहऱ्यावर हसू उमलेल अशी एक बातमी आहे. १२ वर्षांवरील मुलांसाठीच्या लशीच्या घोषणेची. या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी एका वाहिनीवरील चर्चेत मी सहभागी झालो होतो. यात एक वैद्यकीय चाचण्यांमधील महिला तज्ज्ञही सहभागी झाल्या होत्या. लशीच्या शोधामागची कहाणी अर्थात त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांविषयीचे बारीकसारीक तपशील तज्ज्ञ पुरवत होत्या. त्या तज्ज्ञ बाई एकेक करून माहिती आमच्यासमोर ठेवत होत्या आणि आम्ही थक्कच झालो. बाई शेवटी म्हणाल्या, की या घडीला मुलांसाठीची लस उपलब्ध झाली आहे, जी टोचून मुले पूर्वीसारखीच शाळेत जाऊ शकतील. त्याने माझे चित्त आकर्षून घेतले.

कोरोनाची तिसरी लाट आज ना उद्या धडकणार आहे. अशा स्थितीत मुलांवर उपचार करण्यासाठीची यंत्रणा योग्य पद्धतीने उभारण्यात आलेली नाही, हे अधोरेखित करणारा सरकारी समितीचा अहवाल दुसऱ्याच दिवशी माझ्या वाचनात आला आणि वाटलं, की पालकांसमोर पुन्हा तीच भीती उभी राहिली असेल, पण समितीचं ते विधान म्हणजे पूर्ण सत्य नव्हे. आनंदाची बाब ही, की अथक संशोधनाच्या आधारे तयार केलेली लस १२ वर्षांवरील वयाच्या मुलांना निःशंक देता येईल.

संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी अनेकांनी इशारे दिले आहेत. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा वेग अजूनही ठरलेल्‍या उद्दिष्टाच्या खालोखालच रेंगाळत आहे. त्यात कोरोना प्रतिबंधक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात लोक कमी पडत आहेत. आता ही स्थिती ताडल्यास १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्याने सर्व काही प्रश्न सुटतील असे म्हणणे आणि शाळा सुरू करण्याशी हा मुद्दा जोडणे योग्य वाटत नाही.

लसीकरण चांगलेच आहे. जगभरातील लाखो लोकांचे प्राण लशींनीच वाचवले आहेत. आता लस घेऊनही काहींना संसर्ग झाला आहे. याचा अर्थ, बघा लस घेऊनही झालंच ना, असं कोणी म्हणू नये. कारण लशीनंतरही संसर्ग टाळता येत नसला तरी कोरोनाची तीव्रता त्यामुळे नक्कीच कमी करता येईल. त्यामुळे औषधोपचार कमी लागतील आणि रुग्णालयातील काळही काम होईल. लस न घेतलेले मूल आजारी पडतेच. याचा परिणाम त्या मुलाच्या कार्यक्षमतेवर होतोच. त्याची वाढ खुंटते, पण यावर ही लस उतारा म्हणून कार्य करेलच.

म्हणजे त्याचे दिसून न येणारे फायदे म्हणजे, गोवर येण्याची ब्याद मिटेल. इतर संसर्ग होणार नाहीत. कुपोषणालाही पळवून लावता येईल. प्रतिकारक्षमता कमी करणाऱ्या रोगांचे निवारण होईल. शेवटी लशीचा सामाजिक-आर्थिक परिणाम मोठा असेल. कारण दरवेळी संसर्गाचा पहिला वार मुलांवर होतो. साऱ्या कुटुंबाची गती मंदावते. पालकांना ऑफिसला सुट्टी टाकावी लागते. कामावर न गेल्याने पगारावर परिणाम होतो. हे झालं एक. दुसरं औषधोपचार आणि रुग्णालयाचा खर्चही खिशाला ताण देतो. अनेकांचे आर्थिक गणित कोलमडते.

लॉकडाऊनमुळे बालमानस कसे बिघडले आहे याची चर्चा आपण याआधीच्या स्तंभात केलीच आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक हा मानसिक आधार वाटतो, अशांचे तर मोठे नुकसानच झाले. सध्या तरी शाळा सुरू करण्यावरून बराच गदारोळ माजला आहे. असो.

मुलांसाठी त्यांचे पालक, शिक्षणतज्ज्ञ आणि डॉक्टर हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. या तीनही घटकांचं काय म्हणणं आहे याकडे सरकारला लक्ष द्यावंच लागेल. मूल सुरक्षित आणि सुदृढ राहावं, याला वैद्यकीय क्षेत्राने सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील उत्पात त्यांनी अगदी जवळून पाहिलाय. त्यामुळे अशा स्थितीत वैद्यकीय तज्ज्ञ मुलांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचा आणि जेव्हा केव्हा लस उपलब्ध होईल ती देण्याचाच सल्ला देतील.

शिक्षणतज्ज्ञांना शाळा बंद ठेवाव्यात असे कधी वाटणारच नाही. कारण ज्या जागेत सरस्वतीची पूजा अक्षरांनी बांधली जाते, ती पूजा एक नागरिक घडवत असते. पंडित नेहरू म्हणाले होते, की या देशातील कारखाने आणि धरणे ही आधुनिक भारताची मंदिरे आहेत, पण या मंदिरांच्या दिशेने मुलांना घेऊन जाणारा मार्ग हा शाळेतूनच जात असतो. तिथे असलेला शिक्षक हा मुलांना धुळाक्षरे शिकवत भावी नागरिक घडवत असतो. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी ही देशाची खरी बौद्धिक संपदा आहे. आजघडीला ही संपदाच पणाला लागली आहे.

शेवटी निर्णय प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाचा घटक असलेला पालक द्विधा अवस्थेत आहे. काहींच्या हातांना काम नाही. काहींना कमी पगार मिळत आहे. काहींचे व्यवसाय बुडाले आहेत. घरून काम करण्याच्या सक्तीने खासगी आयुष्य आणि नातेसंबंधांवर मर्यादा आल्या आहेत. त्याचा सर्वांत मोठा परिणाम मुलांवर झाला आहे. शाळा सुरू झाली तरी कधी होईल, तिथे मुलांच्या आरोग्याचे काय, खर्चाचे काय, असे एक ना अनेक प्रश्न त्यांना सतावत आहेत.

मुलांच्या लसीकरणाचा मुद्दा पुन्हा मांडायचाच तर एक सांगता येईल, की या मोहिमेचे पाऊल तरी चांगल्या दिशेने पडले आहे, पण प्रत्येकालाच खूप मोठा प्रवास करावा लागणार आहे. लशीची गुणवत्ता आणि त्यांचा मुलांवरील परिणाम हा पुन्हा वेगळा विषय आहे. समूह प्रतिकारशक्ती ही त्यातील एक सकारात्मक बाजू. सिरो सर्वेक्षणात मुंबईतील ५० टक्के मुलांमध्ये नैसर्गिकरीत्या प्रतिपिंड तयार झाले आहेत. त्यामुळे इतर जणांनाही त्याचा लाभ झाला आहे.

शाळा सुरू करण्याबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. तरीही शाळा लगेच सुरू करण्याचाही निर्णय घेता येणार नाही. कारण लसीकरण हा शाळा सुरू करण्यासाठी पहिला निकष ठरवता आला पाहिजे. याखेरीज कोरोना नियमांची अंमलबजावणीही आलीच. तरीही लसीकरण आणि शाळा सुरू करण्याचा मुद्दा एकमेकांत गुंतवणे उपयोगाचे नाही. यासाठी काही वेळ अजून लागेल. कारण काय धोक्याचे आणि काय सुरक्षेचे, हे ठरवण्याचा निर्णय लोकांवरच सोपवणे योग्य होईल. ते अधिक सुज्ञ आहेत, याविषयी शंकेचं कारण नाही.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोग तज्ज्ञ असून, न्यू होरायजन चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरचे संस्थापक आहेत. दोन दशकांपासून मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com