पुणे विद्यापीठाची प्लेसमेंट घटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai phule pune university

विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्लेसमेंट सेलची स्थापना केली आहे.

पुणे विद्यापीठाची प्लेसमेंट घटली

पुणे - विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्लेसमेंट सेलची स्थापना केली आहे. मात्र आजवर ३४ लाख १० हजार ७४५ रुपये खर्च करून केवळ एक हजार ८८८ अर्जदारांना नोकरी मिळाली आहे. त्यात मागील चार वर्षांत ८९ टक्क्यांवर असलेली प्लेसमेंट ७ टक्क्यांवर घसरली आहे.

जानेवारी २०१७ मध्ये विद्यापीठात ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल कार्यान्वित झाला. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि नोकऱ्यांची उपलब्धता करणे हे या सेलचे कार्य. मात्र आजवर आलेल्या ६ हजार १२६ अर्जदारांपैकी फक्त एक हजार ८८८ विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहे. २०२२ या वर्षात आजपर्यंत फक्त १३० विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या असून, हीच संख्या २०१९ मध्ये एक हजार ३४ होती. कोरोनानंतर विद्यापीठाच्या प्लेसमेंटमध्ये झपाट्याने घट झाली आहे. प्लेसमेंट सेलच्या कार्यपद्धतीतच दोष असल्याचा आरोप स्टुडंट हेल्पिंग हॅंडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केला आहे.

माहितीचे निष्कर्ष

  • देखभाल-दुरुस्ती आणि कार्यालयीन खर्चासाठी संपूर्ण निधीचा वापर

  • दरवर्षी तरतुदीपेक्षा खर्च कमीच

  • डेटाबेस, प्रशिक्षण, कंपन्यांशी करारासंबंधी शून्य खर्च

  • नव्या रोजगार संधी, उपलब्ध जागा, आवश्यक कौशल्यांचा शोध आवश्यक

प्लेसमेंटची आकडेवारी

कोरोना जरी संपलेला असला तरी अद्यापही शिक्षणव्यवस्थेवर त्याचा परिणाम दिसत आहे. अगदी प्रवेशापासून ते प्लेसमेंटपर्यंतच्या प्रक्रिया प्रभावित झाल्या आहे. शेवटच्या वर्षाचे निकाल आल्यानंतर यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. प्लेसमेंट सेलचा आम्हीही आढावा घेतला असून, यासंबंधी आवश्यक उपाययोजना करत आहोत.

- डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

आजवर फक्त दुरुस्ती, देखभाल आणि कार्यालयीन खर्च वगळता इतर कोणत्याही उपक्रमावर एक रुपयाही खर्च झाला नाही. त्यामुळे प्लेसमेंटच्या नावाखाली विद्यापीठ लाखोंची उधळपट्टी करत आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये आजवर फक्त दोनच कंपन्या आल्या असून, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी कोणतेच प्रयत्न विद्यापीठाने केलेले नाहीत. खर्च लाखो रुपयांचा मात्र लाभार्थ्यांची संख्या फक्त शेकड्यात आहे. माहिती अधिकारामार्फत आम्ही ही माहिती मागवली होती.

- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हॅंड

Web Title: Placement Decrease In Pune University

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..