समृद्ध जीवनाचा ‘पोर्टफोलिओ’

आपल्याच विश्‍वात राहणाऱ्या काही अत्यंत प्रभावशाली आणि वेगळ्या व्यक्तींकडे पाहा.
Prosperous Life
Prosperous Lifesakal

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

आपल्याच विश्‍वात राहणाऱ्या काही अत्यंत प्रभावशाली आणि वेगळ्या व्यक्तींकडे पाहा. रिचर्ड ब्रँडसन हे ४०० हून अधिक कंपन्यांचा समावेश असलेल्या व्हर्जिन समूहाचे सह-संस्थापक आहेत आणि तरीदेखील ते उष्ण हवेच्या फुग्यातून अटलांटिक महासागर पार करण्यासारखे साहस करतात.

जगविख्यात उद्योगपती रतन टाटा आणि बिल गेट्स मोठ्या व्यावसायिक समूहांचे व्यवस्थापन करण्याबरोबरच अनेक मोठ्या सामाजिक प्रकल्पांवरही काम करतात. त्यामुळेच त्यांना जे एकमेवाद्वितीय आणि मोठ्या प्रमाणात लोकप्रिय करते, ते केवळ त्यांचे व्यावसायिक यश नसून, त्यांनी त्या पलीकडे केलेले अनोखे काम आहे.

जेसी इट्झलर यांनी जे म्हटले आहे, तेच मलाही वाटते की, आपण केवळ स्वतःच्या करिअरचा किंवा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार न करता त्याऐवजी जीवनाचा ‘पोर्टफोलिओ’ तयार करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीशी बोलावसं, तिच्यासोबत राहावं किंवा एकत्र काम करावसं का वाटतं? कारण, ते लोक अशा काही गोष्टी करत असतात, की ज्या इतर लोक सातत्याने करत नाहीत.

असे लोक केवळ व्यवसायात गुंतवणूक करत नाहीत, तर तो व्यवसाय उभारणाऱ्या लोकांमध्ये गुंतवणूक करतात. असे लोक तुम्हाला केवळ पदव्या बघून कामावर घेत नाहीत, तर तुमच्या अनुभवांसाठी घेतात. अगदी साधी गोष्ट पाहा, जेव्हा तुम्ही मित्रांना भेटता, तेव्हा त्यांना आवर्जून सांगावे, शेअर करावे किंवा त्यांना हसून लोटपोट व्हावे असे काही सांगण्यासाठी आहे का?

एखादा तरी हृदयस्पर्शी अनुभव तुमच्या गाठीशी आहे का? असं नसेल, तर या गोष्टीचा तुम्ही गांभीर्याने विचार करायला हवा. तुमच्याकडे जितके जास्त अनुभव असतील, तेवढ्याच जास्त प्रमाणात तुम्ही जगाला काही तरी सांगू शकाल. जगाने तुमचं ऐकावं असं काही तरी तुमच्याकडे असेल. ते ऐकण्यासाठी लोक तुमच्याकडे आपोआप येऊ लागतील आणि तुम्ही मानवी ऊर्जेचे चुंबक व्हाल.

‘लाइफ पोर्टफोलिओ’ कसा करावा?

आपल्यापैकी बहुतेकांकडे कोणत्या दिवशी काय करावे किंवा आपल्या करिअरमध्ये काय करावे? याची योजना तयार असते, परंतु आपल्या आयुष्याबाबत काही ठरलेले नसते.

आपण सुट्टीच्या दिवशी एखादा ‘ओटीटी शो’ बघतो किंवा सहलीला जातो. मात्र, तिथून आल्यावर एक आठवडा उलटल्यावर आपल्याला ते क्षण आठवतही नाहीत. कारण त्यामध्ये वेगळे असे काहीही नाही, हे आपल्या लक्षात येते. हे असे होऊ नये, यासाठीच आपण आपले जीवन भरभरून आणि जरा अविश्वसनीय पद्धतीने जगायला हवे.

याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण थोडे ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ करूया. आपण सरासरी ७० वर्षांचे आयुर्मान मानले आणि तुम्ही आता ३०-३५ च्या मध्यात असाल, तर तुमच्याकडे आणखी सुमारे ३५ उन्हाळे आहेत, असे समजून आयुष्याचा विचार करायला हवा.

नियोजन

समृद्ध जीवन जगण्यासाठी लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचे नियोजन करणे आणि ते आपल्या डोळ्यांसमोर ठेवणे. तुम्ही कोणतीही योजना न करता एखादी गोष्ट करता, तेव्हा खूप विचलित होता. त्यामुळे तुम्ही सहसा करत नसलेल्या, पण आवडणाऱ्या, आव्हानात्मक वाटणाऱ्या गोष्टींची यादी बनवा. त्यात मॅरेथॉनमध्ये धावणे, सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होणे, एखादा पॉडकास्ट होस्ट करणे, ध्यान करणे अशा अनेक गोष्टी असू शकतात.

या गोष्टी साध्य करण्यासाठी दोन महिन्यांतला किमान एक शनिवार किंवा रविवार राखून ठेवा. अशा प्रकारे तुमच्याकडे वर्षभरात सहा अविस्मरणीय आठवणी किंवा प्रसंग तयार होतील. याचाच अर्थ आयुष्यभरात सुमारे २१० अविस्मरणीय गोष्टी तुमच्याकडे असतील.

पूर्वतयारी

केवळ एखादे उद्दिष्ट पूर्ण करणे हेच दर वेळी अपेक्षित नसून तुम्ही त्या क्षणांचा अनुभव कसा घेता? त्यासाठी स्वतःला कसे तयार करता? हेही महत्त्वाचे असते. यानिमित्ताने स्वतःला आव्हान देणे, नवीन शक्यतांचा विचार करणे, नवीन काही तरी शिकणे हेही महत्त्वाचे ठरते. यासाठी स्वतःला तयार करा, गरज पडल्यास प्रशिक्षण घ्या.

समविचारी लोकांच्या गटात सामील व्हा, स्वतःची एक चेकलिस्ट तयार करा. त्या त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी स्वतःमध्ये उत्साह निर्माण करा आणि स्वतःला आवश्‍यक ती गती द्या. मग बघा तुमचं जगणं तुम्हाला ‘रिफ्रेश’ करत जाईल.

‘मेमरी मॅप’

एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही केलेले प्रयत्न असो किंवा साध्य केलेल्या ध्येयाचा प्रवास असो किंवा एखादा अत्यंत अविस्मरणीय क्षण असो, जे जे तुम्हाला वेगळं वाटतं, त्याबद्दल लिहा. शिकणं, चुका करणं आणि अनुभवणं हा सगळा प्रवास लिहून काढा. फोटो काढा. हे सर्व कुठे तरी नोंदवून ठेवा. त्यासाठी तुम्ही डायरीचा वापर करू शकता किंवा सोशल मीडियाची मदतही घेऊ शकता.

तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या आठवणी इंधन म्हणून काम करतील. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्याचा पोर्टफोलिओ अधिक जिवंत करत गेलात, तर हा पोर्टफोलिओ तुमच्या कामाच्या पोर्टफोलिओपेक्षा किती तरी पट समृद्ध आणि आनंददायी आहे असे तुम्हाला नक्कीच जाणवेल!

अशाच पद्धतीच्या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी pranjal_gundesha या इन्स्टाग्राम चॅनेलला आणि TheIntelligencePlus या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com