Education
EducationSakal

उत्तम शिक्षण यशाची गुरुकिल्ली

आपल्या मुलांना जगातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकवायचे असेल, तर आजपासूनच त्यासाठी बचत आणि गुंतवणूक करा.

आपल्या मुलांना जगातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकवायचे असेल, तर आजपासूनच त्यासाठी बचत आणि गुंतवणूक करा. आपल्या लहान लेकरांसाठी तरी आर्थिक साक्षर व्हा, त्यांचे भविष्य घडवायचेय तर आजपासूनच त्यांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करा. आधुनिक, विज्ञानवादी जगात उत्तम शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

माझ्या किंवा मागच्या एक-दोन पिढ्यातले अनुभवी लोक नेहमी म्हणायचे, ‘आमच्या आई-वडिलांनी आम्हाला चांगले शिक्षण व संस्कार दिले.’ आजच्या काळातही (कदाचित) आपण मुलांना चांगले संस्कार देऊ शकू; पण चांगले शिक्षण, उच्चशिक्षण तसेच त्या पुढील करिअरचे काय?

सृष्टीचा, मानवजातीचा हा अलिखित नियमच आहे की, प्रत्येकाला माझ्या मुलाने/मुलीने खूप मोठे व्हावे असे वाटते. जग जिंकावे. आपण मराठी लोक तर मुलाबाळांबाबत फार भावूक असतो. अगदी कोणताही त्याग करायला तयार असतो; पण हे सर्व ते लहान असतानाच. जेव्हा खरंच वेळ येते, तेव्हा बरेच मराठी ‘मध्यमवर्गीय’ पालक आपल्या मुलांना वास्तवाची जाणीव करून देतात. (अंथरुण पाहून पाय पसरावे, चित्ती असू द्यावे समाधान, बाबांना बीपीचा त्रास आहे, त्यांना ‘टेन्शन’ नको वगैरे वगैरे.) कधीकधी आई-वडिलांची आयुष्यभराची जमापुंजी, शेती-वाडी, घर बाजारात मांडावे लागते. आईचे दागिने, सोसायटीतून कर्ज, शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून उधारी किंवा बऱ्याचदा अंतःकरणातून दुःखी होऊन शेवटी प्रवास अर्धवटच सोडावा लागतो. काही जण शिक्षणासाठी कर्ज घेऊन कोवळ्या वयात स्वत:च्याच मुलांना प्रीमॅच्युअर करून टाकतात. बरं तेही काही वर्षांपूर्वीपर्यंत ठीक होते. कारण कर्जाची गरज मुलाला १७/१८ व्या वर्षी पडायची; पण आजची परिस्थिती काय आहे?

हल्ली मूल जन्माला घालण्याआधीच लाख-दोन लाख खर्च येतो... पुढे ते बाळ २/३ वर्षांचे होईपर्यंत अजून दोनेक लाख तर सहज खर्च होतात, बारसं, पहिला वाढदिवस, इतर सण सोहळे सोडून. लगेच पुढे पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे वाढलेल्या प्रीस्कूल्समध्ये दोन-अडीच वर्षाच्या लेकराला पाच-पन्नास हजार खर्चून त्या शाळेत कोंबतात. पुढे मुख्य शाळेची, (पहिलीच्या पण आधी) धावाधाव, मुंबई पुण्यासारख्या शहरात खासगी शाळेसाठी लाख-दोन लाख डोनेशन, बाकी फी वेगळी... हायस्कूल आणि फक्त दहावीपर्यंत मुलांना शिकवायचे म्हटले, तरी ५ ते १० लाख खर्च येतो.

याशिवाय या स्पर्धेच्या युगात रहायचे म्हणून ऑलिम्पियाड, विविध भाषा, पाचवीपासूनच Spellbee, IEO, IMO, IGKO, NSO, NCO, Ucmas आणि काय काय भानगडींची तयारी करून घेणारे क्लासेस. काही जण तर पाचवीपासूनच आयआयटीच्या प्रिपरेशन्सची तयारी करतात.

पुढे दहावी-बारावी यासाठीचे विविध क्लासेस, विविध प्रवेश परीक्षेची तयारी यासाठीचा खर्च, ते करिअर गाइडन्स आणि सिलेक्शनचा मनस्ताप मिळून त्यासाठी चार-पाच लाखांचा खर्च. त्यानंतर सुरू होणार असतो महाविद्यालय किंवा उच्च शिक्षणासाठीचा खर्च.

भारतातील सद्यस्थिती पाहता इथल्या शिक्षणाच्या दर्जावर न बोललेलेच बरे. काही नामांकित कॅालेजेस/ शिक्षण संस्था सोडल्या तर बाकी ठिकाणी आनंदी आनंदच आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या राज्यात तडीपार, दारूविक्या अशिक्षित, वाममार्गाने उद्योगधंदे करून राजकारणात आलेल्या क्षुल्लक राजकारण्याला पण आदराने? ‘साहेब’ म्हणतात आणि ज्ञानदानासारखं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना आणि गुरुजींना ‘सेवक’ म्हटले जाते. यापेक्षा वाईट म्हणजे ६००० रुपड्यांची पाने त्यांच्या तोंडाला पुसून इभ्रत काढतात. प्रत्येक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करण्याची गरज आहे. निदान भविष्यात तरी या शब्दात बदल करावा.

मुद्दा हा की अशा शाळांमध्ये आपण मुलांना टाकण्यापेक्षा बाहेरच्या देशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्याचा ट्रेंड मोठा होऊ शकतो. अगदी पदवीसाठीच पुढील काही वर्षांत मुले परदेशी जाऊ शकतात. त्यासाठी आजमितीसही २५ ते ५० लाखांचा खर्च तरी अपेक्षित असतोच. अगदी भारतात जरी आपली मुले शिकली तरी ५ ते १० लाख खर्च हा येणारच असतो. आता आपली प्रत्येकाचीच मुले मेरिटमध्ये येणार नाहीत. आली तरी खर्च चुकत नसतो. त्यामुळे या सर्व खर्चाचा जर एकत्रित विचार केला, तर तो साधारणपणे २५ ते ३० लाखांच्या आजूबाजूला जातो.

आर्थिकदृष्ट्या विचार केला, तर साधारणपणे १५ ते १८ वर्षांत व्यवस्थितपणे नियोजन केले, तर ही बाब फार कठीण जात नाही; पण जर आपल्याला जागच आली नाही, तर मात्र मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहायला लागू शकते. आपण कोणीही असा. आपल्यापैकी आपल्यासारखेच काम करणारे, तेवढाच पैसा कमविणारे त्यांच्या मुला-मुलींसाठी पाहिजे तो खर्च करू शकतात; मग आपण का नाही? याचे एकमेव उत्तर म्हणजे- त्यांचे याबाबतीतले आर्थिक नियोजन, जेवढे उत्पन्न येते त्याच्या खर्चाचे, बचतीचे आणि योग्य ठिकाणी पैसा गुंतवण्याची बुद्धी आणि कला.

पूर्वी घरात आलेला मुलगा/मुलगी घराचे भविष्य निश्चित करायचे. सरकारी शाळा आणि ‘डेडिकेटेड शिक्षकांच्या’ भरवशावर हे होत होते. (एकच डिसले गुरुजी चालणार नाहीत, ते त्यांच्या कर्तृत्वाने पुढे आले- त्यांचा अभिमान आहेच) यापुढे अगदी कितीही वेगाने देशात, राज्यात शिक्षणात बदल झाला, तरी बरीच वर्षं जातील. तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर भूतकाळ विसरा, तयारीला लागा. आर्थिक नियोजन आणि अर्थसाक्षरतेचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक रुपया शेवटचा आहे म्हणून खर्च करा. Assets आणि Liability मधला फरक समजून घ्या. प्रसिद्धी आणि तुलनेच्या नादात भरकटण्यात काही अर्थ नाही.

शिक्षण आणि वाचन ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. आपल्या मुलांना जगातील सर्वोच्च शिक्षण संस्थामध्ये शिकवायचे असेल, तर आजपासूनच त्यासाठी बचत आणि गुंतवणूक करा. आपल्या लहान लेकरांसाठी तरी आर्थिक साक्षर व्हा, त्यांचे भविष्य घडवायचे असेल, तर आजपासूनच त्यांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करा. आधुनिक, विज्ञानवादी जगात उत्तम शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

टीप - मायबाप सरकार तुम्हीपण घ्या की हो मनावर!

- प्रफुल्ल वानखेडे

(लेखक हे प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

wankhedeprafulla@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com