संवाद : आवडीचे करिअर, गाठू यशाचे शिखर

आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर करिअरची निवड करावी लागते. मग मित्रांनो, विचार करा. ती निवड, तुमच्या आवडीची असेल, तर ते किती आनंददायी असेल!
Career
Careersakal

- प्रणव मंत्री

आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर करिअरची निवड करावी लागते. मग मित्रांनो, विचार करा. ती निवड, तुमच्या आवडीची असेल, तर ते किती आनंददायी असेल! आपण करिअरचे क्षेत्र निवडतो. त्यामध्ये आपली आवड असणे फार गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती त्याला आनंद देणारे करिअर निवडते तेव्हा ते त्याला योग्यरीत्या प्रगतिपथावर नेते.

नोकरीतील करिअर

तुम्ही तुमच्या आवडींशी जुळणारे करिअर करता, तेव्हा तुम्ही अधिक समाधानी असता. तुम्हाला तुमचे काम आवडते, तेव्हा तुम्ही ते मन लावून करता आणि यश मिळवण्यासाठी अतिरिक्त कष्ट घेण्याचीही तयारी ठेवता. तुमच्या आवडींवर आधारित करिअर निवडल्याने तुम्ही यशस्वी होऊ शकता. यासाठी असे क्षेत्र निवडा की, ज्यामध्ये तुमचा वैयक्तिक विकास होईल. विकासाचा अर्थ केवळ आर्थिक वाढ नसून ज्ञानाची वाढदेखील आहे.

अशा प्रकारे, ही वाढ तुमच्यासाठी संधींची अधिक दारे उघडेल. हल्ली बहुतेक कंपन्यांमध्ये तुमची कार्यक्षमता हे तुमच्या प्रमोशनसाठी आणि पगारवाढीसाठी अतिशय महत्त्वाचे निकष मानले जातात. तुमची कार्यक्षमता तुमच्या कामावर अवलंबून असते. तुम्हाला तुमचे काम आवडते, तेव्हा तुम्ही तणावमुक्त असता.

त्यामुळे तुमची कार्यक्षमतादेखील वाढते. म्हणजेच काय तर नोकरीतील करिअरसाठी तुम्हाला व्यवस्थितरीत्या काम करणे फार गरजेचे आहे. नोकरीतही तुम्ही कनिष्ठ स्तरापासून व्यवस्थापकीय स्तरापर्यंत नक्कीच खूप प्रगती करू शकता.

व्यवसायातील करिअर

तुम्ही तुमच्या कामाबद्दल उत्साही असता, तेव्हा सकारात्मक प्रभाव पाडू शकता. तुमचे करिअर तुम्हाला सर्वांगीण विकासात मदत करते. तुम्ही तुमच्या आवडत्या विषयात करिअर करता, तेव्हा तुम्ही अधिक मेहनत घेता आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार करता. व्यवसाय करत असताना तुम्हाला बाजारातील ताज्या बातम्या, सरकारी योजनांबद्दल अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

व्यवसायात नफा होऊ शकतो किंवा तोटा देखील होऊ शकतो. परंतु व्यवस्थित लक्ष केंद्रित करून न खचता योग्य उपाययोजना आखणे हे एका व्यावसायिकाचे काम आहे. एक चांगला व्यावसायिक हा एक चांगला संवादक, योग्य वेळ व्यवस्थापक आणि एक चांगला नेता असावा.

निष्कर्ष

कित्येक वेळा असेही होऊ शकते की, गरज म्हणून सुरू केलेला एखादा छोटा व्यवसाय किंवा पत्करलेली एखादी छोटी नोकरी, केवळ तुमची बुद्धिमत्ता, कष्ट करण्याची तयारी आणि सचोटी या तिन्ही गोष्टींच्या जोरावर ते तुमचे आवडते करिअर होऊ शकते आणि तुम्ही त्यात पूर्ण यशस्वी होऊ शकता.

शेवटी, आवड आणि करिअर हे एखाद्याच्या नोकरीच्या शोधात किंवा व्यवसायातील महत्त्वाचे घटक असतात. तुमच्या आवडीशी जुळणारा करिअरचा मार्ग जीवनात समाधान, वैयक्तिक गरजांची पूर्तता आणि करिअरमध्ये यश मिळवण्यात मदत करतो.

(लेखक करिअर समुपदेशक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com