विशेष : बोर्ड परीक्षांनंतरचा वेळ प्रभावीपणे कसा वापरायचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

time management

बोर्ड परीक्षेचा शेवटचा दिवस हा साहजिकच सर्वात आरामदायी दिवस असतो, जिथे विद्यार्थी सहसा आनंदी आणि निवांत असतात.

विशेष : बोर्ड परीक्षांनंतरचा वेळ प्रभावीपणे कसा वापरायचा

- सीए प्रणव मंत्री

बोर्ड परीक्षेचा शेवटचा दिवस हा साहजिकच सर्वात आरामदायी दिवस असतो, जिथे विद्यार्थी सहसा आनंदी आणि निवांत असतात. परीक्षेनंतरच्या सुट्ट्यांमध्ये आणि निकालापूर्वी साधारणतः: काही महिन्यांचे अंतर असते, त्यामध्ये विद्यार्थी अनेक योजना आखतात. तुमचा वेळ हुशारीने वापरला पाहिजे, यासाठी काही टिप्स...

छंद जोपासा

परीक्षेच्या तयारीदरम्यान किंवा कदाचित त्याआधीही डान्स, पेंटिंग क्लासला किंवा गाण्याचे धडे, पोहणे इत्यादींसारख्या कोणत्याही गोष्टीला जाणे बंद केले असल्यास पुन्हा सुरू करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. सुट्टीच्या काळात छंद जोपासा कारण त्यानंतर अभ्यास, परीक्षा आणि नंतरच्या आयुष्यात नोकरी आणि करिअरमध्ये व्यग्र होऊ शकता. यामध्ये तुमची लपलेली प्रतिभा गायब होऊ शकते. म्हणून आपली आवड जीवनाच्या शर्यतीत कधीही गमावू देऊ नका. बऱ्याच वेळेला याचा उपयोग तुम्हाला ऑफबीट करिअर करण्यासाठी होऊ शकतो.

प्रमाण अभ्यासक्रम

अशा अनेक संस्था आहेत ज्या दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर तीन महिन्यांपासून सहा महिन्यांपर्यंतचा अल्पकालीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. तुम्ही कोणताही सर्टिफिकेशन कोर्स करू शकता तो करिअरच्या पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. तुम्ही नोकरीसाठी अर्ज करता तेव्हा हे तुमच्या बायोडाटामध्ये अतिरिक्त फायदा देईल. उदा : टॅली, एक्सेल, जावा, इत्यादी.

क्षमता वाढवा

योग्यता हा माणसाच्या जीवनातील महत्त्वाचा पैलू आहे. म्हणूनच स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला जवळजवळ प्रत्येक परीक्षेच्या पेपरमध्ये योग्यतेशी संबंधित प्रश्न सापडतील. जटिल परिस्थितीत विचार करणे आवश्यक आहे. योग्यता हेच तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष कामात कशी कामगिरी कराल याचा अंदाज लावते. तुम्ही काही सोप्या पुस्तकांनी सुरुवात करू शकता.

परदेशी भाषा शिका

परदेशी भाषेचा अभ्यास सरकार, व्यवसाय, वैद्यक, कायदा, तंत्रज्ञान, लष्कर, उद्योग, मार्केटिंग इत्यादी क्षेत्रातील संधी वाढवतो. दुसरी भाषा तुमच्यामधील कौशल्ये आणि गुणवत्ता सुधारते.तुम्ही तुमची परदेशी भाषा विकसित केली तर ती तुमच्या बहुभाषिक कौशल्यांमध्ये भर घालते.

वाचन करा

वाचनाची सवय ज्ञान वाढवण्यास मदत करते. वाचनाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तो तुम्हाला एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा सराव करण्यास मदत करतो.

विविध प्रवेश परीक्षा

वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरचे दरवाजे उघडण्यास मदत होईल. तुम्हाला भारताबाहेर जायचे असेल तर TOEFL ही महत्त्वाची परीक्षा आहे..

सामाजिक कार्य आणि स्वयंसेवा

तुम्ही कोणत्याही सामाजिक सेवा संस्थेमध्ये सामाजिक कार्यासाठी सामील होऊ शकता. हे कार्य तुम्हाला वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधण्यास मदत करते.

इतर काही टिप्स

बाहेर फिरायला, व्यायामासाठी जाणे, नवनवीन खाद्य पदार्थ बनवणे, नातेवाइकांना भेटणे, आजी-आजोबांबरोबर वेळ घालवणे, घरातल्या कामात मदत करणे, स्थानिक ठिकाणे तसेच नवीन ठिकाणांना भेट देणे आणि ते ब्लॉग आणि इतर सोशल मीडियाद्वारे शेअर करणे, इत्यादी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल नेटवर्किंग साइट्सवर वेळ वाया घालवू नका कारण त्याचे व्यसन लागू शकते.

(लेखक कॉपोरेट ट्रेनर व करिअर समुपदेशक आहेत.)