परदेशी शिकताना : इंग्रजीची परीक्षा अनिवार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

english test

मागच्या भागात आपण परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषा आणि त्याचे मानांकन कसे महत्त्वाचे आहे हे पहिले.

परदेशी शिकताना : इंग्रजीची परीक्षा अनिवार्य

- ॲड. प्रवीण निकम

मागच्या भागात आपण परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषा आणि त्याचे मानांकन कसे महत्त्वाचे आहे हे पहिले.

1) International English Language Test System

जगभरातील बहुतेक विद्यापीठांमध्ये ही स्वीकारली जाते. अमेरिकेतील जवळजवळ ३,४०० विद्यापीठांसह ब्रिटन, ऑस्ट्रेलियामध्ये, कॅनडा, आयर्लंड आणि युरोपमधील बहुतेक सर्वच विद्यापीठांमध्ये या चाचणीचे मानांकन स्वीकारले जाते. या परीक्षेत तुमचे इंग्रजी भाषा ऐकण्याबरोबर, बोलण्याचं, लेखन आणि वाचन कौशल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी एक परिक्षा स्वरूप तयार केले आहे. मूळ इंग्रजी वक्त्यांच्या माध्यमातून त्याची बोलली जाणारी भाषा ऐकवली जाते आणि नंतर चाचणीच्या शेवटी त्याबद्दल प्रश्न विचारले जातात. या परीक्षेला जास्तीत-जास्त १० मानांकन स्कोअर असतो. यापैकी आपल्याला परीक्षेत विद्यापीठाला अपेक्षित असलेले मानांकन गुण मिळवणे अपेक्षित असते. बहुतांश विद्यापीठांना किमान ५.५ किंवा त्याहून अधिक मानांकन गुण अपेक्षित असतात. ही चाचणी २ तास आणि ४५ मिनिटांचा असतो. ती दिल्यानंतर याचा निकाल परीक्षा दिलेल्या तारखेपासून १३ दिवसांनी दिला जातो.

2) Test of English as Foreign Language (TOEFL)

इंग्रजी भाषा कौशल्ये मोजणारी ही सर्वांत पसंतीची परीक्षा आहे. याला TOEFL iBT म्हणून देखील ओळखले जाते जेथे iBT म्हणजे इंटरनेट-आधारित चाचणी. अमेरिका आणि कॅनडामधील विद्यापीठे मोठ्या प्रमाणावर ही चाचणी स्वीकारतात आणि याचबरोबर १५० देशांमधील ११ हजार शैक्षणिक संस्थांमध्ये ही चाचणी लोकप्रिय आहे. या चाचणीमध्ये वाचन आणि ऐकण्याचे कौशल्य मोजण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या कालावधीसह IELTS चाचणी सारखीच असतात. या चाचणीसाठी स्कोअर ० ते १२० असा असतो. तुम्ही ९० ते १००च्या दरम्यान स्कोअर केल्यास तुम्ही पात्र समजले जाता. या चाचणीमध्ये उपश्रेणी आहेत आणि अनेक विद्यापीठांमध्ये प्रत्येक उपश्रेणीसाठी त्यांचे किमान मानक गुण मिळवणे अपेक्षित असते. ही चाचणी Education Testing Service (ETS) यांच्या माध्यमातून घेतली जाते. या चाचणीचा कालावधी ३ तास असतो. परीक्षा दिल्याच्या तारखेपासून ६ दिवसांनी या चाचणीचा निकाल येतो.

3) Pearson Test of English (PTE)

ही चाचणी देखील संगणक आधारित परीक्षा आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडसह अनेक देश या चाचणीचे मानांकन स्कोअर स्वीकारतात. तुमच्या ऐकण्याच्या कौशल्याचे मूल्यमापन करण्याची पद्धत IELTS आणि TOEFL चाचण्यांसारखेच असते. कथन कौशल्य, निबंध लेखन इत्यादी बाबींच्या आधारे बोलणे आणि लेखन कौशल्यांचे मूल्यांकन केले जाते. या चाचणीमध्ये १० ते ९० स्कोअर दिला जातो, यापैकी किमान ५८ किंवा त्यापेक्षा जास्त पीटीई स्कोअर तुम्हाला बहुतेक विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पात्र असेल. या चाचणीचा कालावधी हा ३ तास असतो. परीक्षा दिल्याच्या तारखेपासून २ दिवसांनी ऑनलाइन पद्धतीने निकाल घोषित केला जातो.

काही विद्यापीठांमध्ये तुम्हाला इंग्रजीची ही परीक्षा द्यावी लागत नाही, त्यासाठी तुमचं पदवीच किंवा पदवी उत्तर शिक्षण भारतात इंग्रजी मधून झाला आहे यासाठीच ‘मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन’चे सर्टिफिकेट सादर करावे लागते. वर नमूद केलेल्या तिन्ही चाचण्यांमधील मिळालेले गुण दोन वर्षांसाठी वैध असतात.

(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संघटनेचे संस्थापक आहेत.)

टॅग्स :educationtest