esakal | विद्यार्थ्यांनो, Vocational Courses ला ऍडमिशन घ्यायचंय? कागदपत्रे तयार ठेवा
sakal

बोलून बातमी शोधा

Vocational Courses ला ऍडमिशन घ्यायचंय? कागदपत्रे तयार ठेवा

Vocational Courses ला ऍडमिशन घ्यायचंय? कागदपत्रे तयार ठेवा

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : दहावीचा (SSC results) निकाल लावण्यासाठीची अंतर्गत मूल्यमापन आणि बारावीच्या परीक्षेबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. असे असताना तंत्रशिक्षण संचालनालयाने (Directorate of Technical Education, Maharashtra State) मात्र दहावीनंतरच्या पदविका आणि बारावीनंतरच्या पदविका, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे आधीच दहावीचा निकाल कसा लागणार, बारावीची परीक्षा कधी आणि कशी होणार या चिंतेत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा तणावात आणखी भर पडल्याचे चित्र आहे. (Prepare documents for admission to vocational courses Appeal of Directorate of Technical Education)

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यरीत येणाऱ्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस.एस.सी पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी औषधनिर्माणशास्त्र, एच.एम.सी.टी., सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नलॉजी पदवी, वास्तूशास्त्र, बी.प्लॅनिंग पदवी अभ्यासक्रम, तसेच एम.ई, एम.टेक, एम.फार्म, एम. आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे राबविले जातात.

हेही वाचा: 'जो म्हणायचा माँ गंगेने मला बोलावलंय, त्यानेच तिला रडवलंय'

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करताना सुविधा केंद्रावर कागदपत्रे पडताळणीच्या वेळी प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या आवश्यक ती कागदपत्रे सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी आतापासून सुरूवात करावी, असे तंत्रशिक्षण विभागाचे तंत्रशिक्षण विभागाने संचालक डॉ. अभय वाघ यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र पदवी अभ्यासक्रमासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अनुसूचित जाती-जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागसवर्गीय उमेदवरांसाठी नॉन क्रिमीलेअर आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सैन्य दलातील अथवा अल्पसंख्याक या संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे असणे महत्त्वाचे आहे. जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र योग्य वेळेत न मिळाल्यास खुल्या संवर्गातून प्रवेश निश्चित केले जातात. त्यामुळे आरक्षणाची कोणतेही लाभ घेता येणार नाही, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

वेगवेगळ्या वर्गवारी अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणपत्रांची आवश्यक ती माहिती प्रवेश पुस्तिकेत अंतर्भूत असते. त्याचा तपशील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या ‘http://www.dtemaharashtra.gov.in’, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या ‘http://www.mahacet.org’ आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या ‘http://maha-ara.org’ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याचेही डॉ. वाघ यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • - जात/जमात प्रमाणपत्र

  • - जात/जमात वैधता प्रमाणपत्र

  • -नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र

  • -अधिवास प्रमाणपत्र

  • - उत्पन्नाचे प्रमाणपत्र

  • - आधार क्रमांक व संलग्नित बॅंक खाते