प्राध्यापकांची पदे मंजूर, पदभरती कधी होणार!! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदभरती

प्राध्यापकांची पदे मंजूर, पदभरती कधी होणार!!

पुणे : अकृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदभरती सुरू न होणे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबतच्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी न होणे, विनाअनुदानित तुकड्यांना अनुदान देणे यांसह विविध मागण्यासाठी येत्या सोमवारी शिक्षण संचालक कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर आणि सचिव डॉ. मारोती देशमुख यांनी दिला आहे.

राज्यातील सुमारे एक हजार १७१ अनुदानित महाविद्यालयांमध्ये १ ऑक्टोबर २०१७च्या विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापक पदभरतीला ४० टक्के नुसार दोन हजार ८८ जागांची भरती करण्यात १२ नोव्हेंबर २०२१मध्ये मान्यता देण्यात आली. पदभरतीतील आरक्षणासंदर्भात २८ डिसेंबर २०२१ रोजी संवर्गनिहाय आरक्षण विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. परंतु याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. तसेच पद भरतीला परवानगी देताना शिक्षण संचालक, ग्रंथपाल तसेच विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता न दिल्याने पात्रता धारकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राध्यापक भरतीसह अन्य मागण्यांबाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, या संदर्भातील मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

प्रमुख मागण्या :

  • अकृषी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक पदभरती त्वरित सुरू करावी.

  • ऑक्टोबर २०१७च्या आकृतिबंधाला अंतिम मान्यता देऊन डिसेंबर २०२१पर्यतची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत.

  • तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या धोरणाबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल स्वीकारून अंमलबजावणी करावी.

  • विनाअनुदानित तुकड्यांना त्वरित अनुदान द्यावे.

  • २०१६ नंतरच्या सहाय्यक प्राध्यापकांना वेतनवाढ तत्काळ लागू करावी.

इन्फोबॉक्स :

‘‘तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या संदर्भात १४ नोव्हेंबर २०१८ आणि २२ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी न होणे, तसेच यामध्ये तासिका तत्त्वावरील अनुभव ग्राह्य धरावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबत धोरण निश्चितीसाठी डॉ. धनराज माने समितीने अहवाल देखील दिला आहे. तो शासन दफ्तरी धुळखात पडला आहे. अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.’’

- डॉ. संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना

Web Title: Professor Posts Approved

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..