

लाचारी की मानसिक आजार?; काय आहे 'डेपेन्डंट पर्सनालिटी डिसऑर्डर'? डॉ. विद्याधर बापट यांनी उलगडले परावलंबी व्यक्तिमत्त्वाचे मानसशास्त्र
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
काही व्यक्ती स्वभावानं खूप छान वाटतात. मृदू, मितभाषी. त्यांचा घरात आणि ऑफिसमध्येही कुणालाही तसा त्रास नसेल असं वाटतं. कुणाला मुद्दाम दुखवायला जात नाहीत. पण अशा व्यक्तींपैकीही, काहीजणांमध्येही त्रासदायक ठरणारे, असे व्यक्तिमत्त्वातील दुर्बलता किंवा अन्य दोष असतात.
आपण आसपास आत्मविश्वास नसलेल्या, जबाबदारी टाळणाऱ्या, सतत कुणाचीतरी मदत मागणाऱ्या, कधी कधी अगदी नेभळट वाटाव्या अशा व्यक्ती पहातो. त्या सतत कसल्यातरी तणावाखाली असतात असं वाटत रहातं. समोरच्याचं नको इतकं लांगूलचालनही त्यांच्याकडून घडत असतं. चेहेऱ्यावर सहज लक्षात यावी अशी लाचारी दिसते तर कधी उसनं अवसान किंवा उत्साह दाखवण्याचा प्रयत्न दिसतो. त्यांचं एकूणच वागणं अस्वस्थ, भीतीच्या छायेखाली असल्यासारखं, कधी चंचल जाणवू शकतं. गुणवत्ता असूनही या व्यक्ती आयुष्यात विशेष काही करू शकत नाहीत. अशा व्यक्ती ‘डेपेन्डंट पसर्नोलिटी डिसऑर्डर’च्या (डीपीडी) शिकार असू शकतात. याची सुरवात साधारण पौगंडावस्थेत होते. या व्यक्तींना स्वत:ला आतून चांगलाच त्रास होत असतो.