Pune : बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

12th students

Pune : बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसवरून ऑनलाइन पद्धतीने नियमित शुल्काने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज ५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत.

राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. तसेच व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेचा अर्ज (आवेदनपत्रे) ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २१ ऑक्टोबर रोजी संपत आहे. आता या विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाइन अर्ज उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरण्यात येतील. तसेच नियमित व एमसीव्हीसीचे विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, तुरळक विषय, आयटीआय विषय घेणारे, श्रेणीसुधार व खासगी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर बँकेत शुल्क भरण्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट जमा करावयाचा कालावधीही राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे.

त्यानुसार शाळा-महाविद्यालयांना चलन डाऊनलोड करून शुल्क भरण्यासाठी १९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तर परीक्षा शुल्क आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणा केल्याची पावती किंवा चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट जमा करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी नमूद केले आहे.