
इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४ आधारित प्रशिक्षणासाठी पुणे विद्यापीठाचा पुढाकार
पुणे - आधुनिक डिजिटल फॅक्टरीमध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४’ हे अविभाज्य भाग बनत आहेत. त्यातील नवीन संधींची ओळख आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आघाडीच्या उद्योगांबरोबर विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ एज्युटेक फौंडेशन आणि क्लाऊड क्यू टेकनॉलॉजिज् यांच्यात नुकताच सहकार्य करार करण्यात आला.
या सामंजस्य करार प्रसंगी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, मिलिंद पंडितराव, दीपक हर्डीकर, विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, आदित्य परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. या करारानुसार ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४’ विषयांवर तीन ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये आता शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मिळविण्यासाठी आणि नोकरी करीत असताना अत्याधुनिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी असे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत.
तंत्रज्ञानाची आणि आंतरविद्याशाखीय ओळख, डिजिटल फॅक्टरीमधील विविध घटकांची ओळख हा भाग शिकविला जाईल. शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ‘शॉप फ्लोअर’वर असलेली विविध कामे आणि त्यांचे डिजिटल स्वरूप, निर्मितीचा प्राधान्यक्रम याचे प्रशिक्षण दिले जाईल. उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या शॉप फ्लोअर ऑपरेटर, मॅनेजर, कॉस्ट कंट्रोलर यांच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्षमता, परिणाम आणि प्रभाव उन्नत करण्यासाठी कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले जाईल. सर्टिफाईड असोसिएट, सर्टिफाइड इंजिनिअर, सर्टिफाईड प्रोफेशनल हे तीनही अभ्यासक्रम आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे असून या प्रशिक्षणाचा वापर अगदी पुरवठादार ते ग्राहक या साखळीतील विविध तंत्रज्ञानावर आधारित रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावण्यासाठी होऊ शकणार आहे. हे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या डिग्री प्लस या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.