आता विद्यार्थ्यांची नव्हे, विद्यापीठाचीच ‘परीक्षा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

उशिरा सुरू झालेली सत्रे, कोलमडलेले शैक्षणिक वेळापत्रक आणि विविध मागण्यांमुळे विद्यापीठ प्रशासनासमोर सत्र परीक्षा वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे.

Pune University : आता विद्यार्थ्यांची नव्हे, विद्यापीठाचीच ‘परीक्षा’

पुणे - उशिरा सुरू झालेली सत्रे, कोलमडलेले शैक्षणिक वेळापत्रक आणि विविध मागण्यांमुळे विद्यापीठ प्रशासनासमोर सत्र परीक्षा वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. कोरोनानंतर अजूनही शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत झाले नसून, गेल्या सत्रातील परीक्षांना धोरण लकव्यामुळे उशीर झाला होता. परीक्षेशी संबंधित सर्व घटकांच्या समन्वयाच्या अभावाचा फटका थेट सर्वसामान्य विद्यार्थ्याला बसतो.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विषम सत्रांची परीक्षा ६ जानेवारीपासून पार पडत आहे. सुरुवातीला ‘बॅकलॉग’च्या विषयांनंतर नियमितच्या विषयांची परीक्षा घेणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आता परीक्षांचे वेळापत्रक घोषित करण्यात सुरुवात केली आहे.

मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, ‘‘सर्व विद्याशाखांतील परीक्षांचे सुयोग्य नियोजन योग्य वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. मागील सत्राची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेऊनही, आपण इतर विद्यापीठांच्या बरोबरीने नियोजन केले आहे. काही वेळा निवडक अभ्यासक्रमांच्या परीक्षेत एक दिवसाचा गॅप देता येणार नाही.’’ पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी परीक्षा नियोजित पद्धतीने पार पडतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

अभियांत्रिकीचे वेळापत्रक बदलले

अभियांत्रिकीच्या दोन पेपरमध्ये गॅप नसल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो. विद्यापीठाने तत्काळ वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी युवक क्रांती दलाने केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने गुरुवारी आवश्यक बदल केले आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन पांडुळे यांनी दिली.

विद्यार्थ्यांसमोरील अडचणी

 • काही महाविद्यालयांनी प्रचंड गडबडीत अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिके संपविली

 • अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घाईने घेण्यात आली

 • वेळापत्रकातील बदलामुळे नियोजन बिघडते

 • अध्ययन पूर्ण करण्याचे आव्हान

सत्र पूर्ततेनंतरच परीक्षा

अनेक अभ्यासक्रमांचे सत्र उशिरा सुरू झाले आहे. अशा विद्यार्थ्यांनी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. ९० दिवसांची सत्र पूर्तता झाल्यानंतरच त्यांची परीक्षा घेण्यात येईल, असे डॉ. काकडे यांनी सांगितले. अधिष्ठात्यांनी आढावा घेतल्यानंतरच परीक्षेचे नियोजन जाहीर होते.

मागील सत्रातील गोंधळ...

 • परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन, यासंबंधीच्या निर्णयाला उशीर

 • दोन पेपरमध्ये गॅपमुळे परीक्षा लांबल्या

 • वेळापत्रकातील बदलांचा विद्यार्थ्यांना फटका

 • उशिरा निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी अडचणींचा सामना करावा लागला

 • विद्यापीठ प्रशासनाबरोबरच विद्यार्थी संघटना, महाविद्यालयांच्या धोरण लकव्याचा फटका

 • अंतर्गत मूल्यमापन आणि गुणदान वेळेत पूर्ण न केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक अडकले

आकडे बोलतात

 • ६,५०,००० - एकूण परीक्षार्थी

 • २३९ - अभ्यासक्रम

 • १०६६ - संलग्न महाविद्यालये

 • ४५ दिवस - परीक्षेचा सरासरी कालावधी

 • १४२ - मागील सत्रातील कॅपची केंद्रसंख्या

कोरोनानंतर विद्यार्थ्यांना वर्गात बसविण्यापासून ते द्वितीय आणि तृतीय वर्षाचे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यापर्यंतचे आव्हान प्राध्यापकांसमोर आहे. हा सर्व कालावधी वार्षिक कार्यक्रमांचा असतानाही या काळात परीक्षा घेणे आणि मूल्यमापन करण्याची मोठी जबाबदारी महाविद्यालयांसमोर आहे.

- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, टी. जे. महाविद्यालय, खडकी

तुमचे मत काय?

परीक्षेशी संबंधित सर्व घटकांच्या समन्वयाच्या अभावाचा फटका थेट सर्वसामान्य विद्यार्थ्याला बसतो आहे. याबाबत आपल्या सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.