पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार मेलबर्नची ‘डीग्री’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai Phule Pune University
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार मेलबर्नची ‘डीग्री’

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार मेलबर्नची ‘डीग्री’

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठ (Melbourne University) यांनी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी एकत्रितपणे 'युओएम-एसपीपीयू अकॅडमी' ची स्थापना केली आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून या दोन्ही विद्यापीठांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांना एकमेकांच्या विद्यापीठात जाऊन प्रशिक्षण व अध्यापन करता येणार आहे. तसेच संयुक्त प्रकल्पही हाती घेण्यात येतील.

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठाने अशा प्रकारे स्थापन केलेली ही पहिलीच अकॅडमी आहे. या अकॅडमीची स्थापना आभासी पध्दतीने एक वर्षभरपूर्वीच झाली असून, आज याचे प्रत्यक्ष उद्घाटन 'इंटरडिसीप्लिनरी स्कुल ऑफ सायन्स' येथे करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, इंटरडिसीप्लिनरी स्कुल ऑफ सायन्स चे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार, मेलबर्न विद्यापीठाचे उपकुलगुरू मिशेल वेसले, सहायक उपकुलगुरू प्रा. मुथुपंडियन अशोककुमार, विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता प्रा. मोयरा ओब्रँन आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मेलबर्नच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर आता भारतीय विद्यार्थ्यांना सोप्या पध्दतीने जगभरांतील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये नोंदणी करणे शक्य होईल.

मेलबर्न विद्यापीठ हे ऑस्ट्रेलियातील पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ असून त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएस्सी(ब्लेंडेड) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र अशा चार विषयांचे मूलभूत शिक्षण दिले जाते. विद्यापीठाने बीएस्सी (ब्लेंडेड) पर्यावरणशास्त्र, रसायनशास्त्र, भूशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांसाठी हे अभ्यासक्रमही सुरू केलेले आहेत.

मेलबर्न विद्यापीठाबरोबर झालेल्या कारारातून सध्या आपण विज्ञान शाखेत अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ही केवळ सुरुवात असून भविष्यात सामाजिक शास्त्र, शिक्षणशास्त्र, डिजाईन थिंकिंग आदीही विषयात अभ्यासक्रम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

दोन नवीन अभ्यासक्रमांची निर्मिती

नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने 'मेलबर्न ग्रॅज्युएट स्कुल ऑफ एज्युकेशन' आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 'फॅकल्टी ऑफ एज्युकेशन' यांनी एकत्रित येत सामंजस्य करार केला. या करारानुसार वय वर्ष ३ ते १८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शिक्षकांसाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पदविका व पदवी अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात संशोधन, प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतील.

Web Title: Pune University Students To Get Melbourne Degree Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..