- अथर्व सुदामे, सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर
सोशल मीडियामुळे अनेक जणांना आपल्यातील कला जगासमोर मांडण्याचे विविध ‘फ्लॅटफॉर्म्स’ मिळाले. लेखन, गायन, चित्र, अभिनय, नृत्य यांसह कलेच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना नवी दिशा मिळाली. काही मिनिटांच्या व्हिडिओतून विविध विषयांवर विनोदाच्या माध्यमातून मार्मिक भाष्य करणारा कलाकार अथर्व सुदामे याचाही प्रवास असाच काहीसा. आपल्या अंगभूत कलागुणांमुळे, स्वतंत्र शैलीमुळे त्याने यशाचे शिखर गाठले आहे.
या क्षेत्रात काम करावं असं तुला कधी वाटलं?
- मी लहानपणापासूनच विविध प्रकारच्या क्षेत्रात काम करतो आहे. सुरुवातीला मला कला आणि क्रिकेट या दोघांमध्ये रस होता. डेक्कन जिमखाना क्लब, माझी शाळा, कॉलेजकडून मी बारावीपर्यंत क्रिकेट खेळलो. त्यानंतर गिटार शिकलो, थोडं फार गाणंही शिकलो. मग कॉर्पोरेट शोज, मोठी हॉटेल्स, बार यांच्यामध्ये मी गायचो, शोज करायचो. तिथे लोकांची दाद मिळत गेली. याच काळात मी नाटकात कामही केलं. तिथे अभिनयाचे धडे मिळाले.
दरम्यान, २०१७-१८च्या काळात सोशल मीडिया आणि त्यावरील व्हिडिओ यात खूप मोठा कंटेन्ट तयार होऊ लागला. मीदेखील माझे काही व्हिडिओ गंमत किंवा हौस म्हणून केले. पुढे जाऊन याच क्षेत्रात काम करावं असं मला तेव्हा वाटतही नव्हतं. मी अगदी सहजपणे व्हिडिओ करत गेलो. हळूहळू लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे माझा हुरूप वाढला आणि मला माझा मार्ग सापडला.
या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणती गुणवैशिष्ट्ये हवीत?
- या क्षेत्रात कोणीही ठरवून येऊ शकत नाही, हे सर्वप्रथम ध्यानात घ्या! यासाठी लागणाऱ्या खुबी तुमच्यात असाव्या लागतात आणि त्या ओळखाव्याही लागतात. आपण व्यासपीठावर किंवा रंगमंचावर कला सादर करतो, तसाच हाही प्रकार आहे. त्यामुळे हे सर्व गुण तुमच्यात असल्याशिवाय इथेही यश मिळत नाही.
तरुणांनी काय लक्षात ठेवावं?
- हातात मोबाईल आहे म्हणून मी व्हिडिओ करून पोस्ट करतो अशा प्रकारे काम केल्यास त्यातून फार काही साध्य होणार नाही. लोकांनी तुमच्या व्हिडिओवर थांबावं, तुमच्या चॅनेलला सबस्क्राइब करावं असं वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला सतत आपण नवीन काय देऊ शकतो? याचा विचार करायला हवा. स्वतःला सूचलेल्या कल्पनांवर काम करायला हवं आणि त्यात सातत्यही ठेवायला हवं.
कॅमेरा ‘ऑन’ होताना...
या क्षेत्रात कशाचीही गॅरंटी नाही. कोणाच्याही प्रभावाखाली न येता काम करा.
तुमच्यातील कला, बलस्थान ओळखा. त्यावर काम करा आणि मग व्हिडिओ करा.
लाइक, कमेंट, व्ह्यूजच्या मागे धावत जाऊ नका.
व्हिडिओ करून भरपूर पैसे मिळतात हा विचार डोक्यात ठेवून काम करू नका.
तुम्हाला एखादी कला अवगत असेल, तर त्याचे प्रशिक्षण घ्या, गुणवत्तेवर भर द्या.
(शब्दांकन : मयूर भावे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.