जाहीर-अती:

आर. जे. संग्राम 
Thursday, 16 January 2020

रेडिओचे उत्पन्न गाण्याभोवती वाजणाऱ्या जाहिरातीतून येतं. जाहिराती विकणाऱ्या या सेल्सपर्सनचं टिपिकल क्वॉलिफिकेशन म्हणजे एमबीए (सेल्स/मार्केटिंग).

रेडिओमध्ये सगळ्यात जास्त नोकऱ्या, जागा या जाहिराती विकणाऱ्या सेल्स टीममध्ये असतात. कुठल्याही व्यवसायाप्रमाणं उत्पन्न असल्यासच प्रॉडक्ट टिकतं. रेडिओचे उत्पन्न गाण्याभोवती वाजणाऱ्या जाहिरातीतून येतं. जाहिराती विकणाऱ्या या सेल्सपर्सनचं टिपिकल क्वॉलिफिकेशन म्हणजे एमबीए (सेल्स/मार्केटिंग). अर्थात अनुभव असल्यास शैक्षणिक पदव्यांची गरज नाही, मात्र हे माध्यम समजून घेतल्यानंतरच. आधी दुसऱ्या माध्यमात (प्रिंट/डिजिटल/दूरचित्रवाणी वाहिनी इत्यादी) काम केलं असल्यास उत्तमच. आपला प्रॉडक्ट म्हणजे रेडिओ स्टेशनचं वेगळेपण, श्रोता वर्ग, आर.जे., वाजणारी गाणी, इतर गमती जमती, उपक्रम वगैरे स्पॉन्सरला समजावून सांगायचं. त्याचा धंदा, प्रॉडक्ट, मार्केटिंग प्लॅन, अपेक्षा वगैरे समजून घ्यायचं, पैशाचं बोलायचं आणि मग रणनीती आखायची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपला ब्रँड आणि प्रॉडक्टचा सखोल अभ्यास आणि दृढ विश्‍वास असला पाहिजे. 
रणनीती आखताना कधी कधी ॲड एजन्सी मध्यस्थीला असते. नसल्यास स्टेशनमधली ‘क्लाइंट सोल्युशन’ किंवा ‘कॉपी रायटर’ नामक व्यक्ती जाहिराती लिहिण्याचं काम करते. 
मास कम्युनिकेशनची डिग्री हा एन्ट्री पॉइंट ठरू शकतो. 
भाषा, क्रिएटीव्हिटी, विनोदबुद्धी असल्यास चांगलं करिअर. हा, त्यासाठी किमान शब्दांत कमाल कमाल करता आली पाहिजे! 
प्रचंड वाचन, दूरचित्रवाहिन्या, रेडिओ, प्रिंट, चित्रपट या विषयांचा अभ्यास महत्त्वाचा. 
लोकांना पैसे खर्च करायला भाग पाडायचं म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास हवा.

हे क्षेत्र निवडायचं असल्यास कृपा करा आणि भरपूर अभ्यास करून नवीन दृष्टिकोन घेऊन या. रेडिओवरच्या काही जाहिराती ऐकून हसावं की रडावं कळत नाही. जाहिराती ऐकण्यालायक असल्यास रेडिओची मजा दसपट होते, असं ९५ टक्के डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

पुढचा टप्पा म्हणजे लिहिलेली जाहिरात ऑडिओ फॉर्ममध्ये बनवायची. हे काम साउंड इंजिनिअर किंवा प्रोमो प्रोड्यूसर नामक प्राण्याचं असतं. यासाठी अनेक कोर्सेस आहेत. मात्र, ते करण्याआधी तुम्ही इंटरनेटवर फुकटही अनेक गोष्टी शिकू शकता. ‘ऑडासिटी’सारखे ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर निःशुल्क डाउनलोड करून त्यावर सराव करता येतो. 

पुढच्या वेळी- मला माहीत आहे की हे सदर तुम्ही वाचताय, कारण तुम्हाला ‘आरजे’ बनायचं आहे. बरोबर आहे. कार्यकर्ता कोणाला बनायचं असतं- मंत्रिपद महत्त्वाचं. काही हरकत नाही. मी पुढच्या वेळी पुन्हा येईन...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R J Sangram