चांगले श्रोते व्हा...

आर. जे. संग्राम, 95 बिग एफएम
Thursday, 20 February 2020

संवादाशिवाय ते जागृत होऊ शकत नाही. यावर उपाय एकच, वैश्‍विक वाङ्मयाचं वाचन वाढवा! आणि चांगलं ऐकाल तर उत्तम बोलाल. रेडिओच नाही तर कुठेही!

ऑन एअर : 
रेडिओ जॉकी होण्यासाठी नेमके कोणते उपजत गुण आपल्यात असले पाहिजेत, कोणते जोपासले पाहिजेत, कसं ओळखायचं की मी एक चांगला रेडिओ जॉकी बनू शकतो किंवा शकते?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुमच्या आसपासच्या लोकांना तुमच्याशी मैत्री करावीशी वाटते का? अर्थात तुम्ही दिसायला बरे असाल, तर पोरं आपसूकच तुमची ‘फ्रेंडशिप’ मागायला येतात. मैत्रीचं आकर्षण आपल्या रेडिओसाठी उपयोगाचं नाही. मैत्री म्हणजे लोकांना तुमचा सहवास आवडतो का?

एखाद्याची कंपनी आवडणं म्हणजे नेमकं काय? विनोदबुद्धी आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलं की, तुम्ही लोकं जिंकू शकता. पण हा वरचा थर झाला, यामुळं दोस्तीची सुरुवात होते. दीर्घकाळ टिकणारं नातं हवं असल्यास त्याला सगळ्यात महत्त्वाचा गुण काय आहे माहितीये? एक चांगला श्रोता असणं! समोरच्या व्यक्तीला नेमकं काय म्हणायचंय, त्याची भूमिका काय आहे, ती अप्रत्यक्षपणे काय म्हणायचा प्रयत्न करतेय, या संभाषणाचा संदर्भ काय आहे एकंदरीत पार्श्‍वभूमी काय आहे, हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न - खरंतर कष्ट - जो घेतो तो चांगला श्रोता.

हे खूप अवघड काम आहे. आपल्यातले काही, नंतर नीट ऐकायला शिकतात, पण ते ऐकणं म्हणजे ‘याला प्रत्युत्तर कसा देता येईल,’ यापुरतेच मर्यादित राहतं. पिक्चरमधला हिरो व्हीलनला बुक्के द्यायला लागला किंवा हिरोईनला मुके द्यायला लागला की आपण त्याच्या जागी असतो तर हेच किती मस्त केलं असतं अशी स्वप्न रंगवतो. संवाद साधतानादेखील आपला अनुभव आणि एकंदरीत आपला आवाका समोरच्या व्यक्तीच्या स्टोरीमध्ये घुसवतो. हिअरिंग आणि लिसनिंगमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असू शकतो.

अर्थात, तुम्हाला समोरची व्यक्ती किंवा स्वतःपलीकडच्या जगामध्ये रस असेल, खरीखुरी उत्सुकता असेल तरच तुम्ही चांगला श्रोता बनू शकता. उगाच तोंडदेखलं किंवा कामापुरता इंटरेस्ट दाखवायचा म्हणजे मोठीच कसरत. हे ढोंग फार वेळ करता येत नाही. माझा धर्म, जात, वर्ग, पंथ, प्रांत, आवडीनिवडी याच्या पलीकडं असणाऱ्या लोकांशी संवाद साधायचा असल्यास माणसावरचं प्रेम जागृत झालं पाहिजे. संवादाशिवाय ते जागृत होऊ शकत नाही. यावर उपाय एकच, वैश्‍विक वाङ्मयाचं वाचन वाढवा! आणि चांगलं ऐकाल तर उत्तम बोलाल. रेडिओच नाही तर कुठेही!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R J Sangram article Be good listeners