मराठीत बोलायचं, म्हणजे नेमकं कसं?

मराठीत बोलायचं, म्हणजे नेमकं कसं?

आजच्या पिढीवरसुद्धा ‘इंग्रजाळलेले किंवा बॉलिवूडी’ अशी टीका खूप होते. एखादे काका जेव्हा, ‘अरे तुम्हा तरुणींना एक सिंगल वाक्य, इंग्लिश वर्ड्स न वापरता बोलण इक्त डिफीकल्ट का जातं?’ असं म्हणतात तेव्हा ते ‘स्वतःचं ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्याचं बघायचं RTI टाकून’ या विचारसरणीचे असण्याची दाट शक्यता असते. रेडियोवर मराठी कार्यक्रम सादर करताना हा प्रश्‍न मला अनेक वेळा विचारला जातो. मराठीत बोलायचं म्हणजे नेमकं कसं?

फोन (दूरध्वनी नाही!) उचल्यावर मला नमस्कार ठोकायला आवडतं, पण ‘G’ Morning!’ ऐवजी सुप्रभात म्हटलं, की समोरचा मुद्दाम खवचटपणे आपला दिवस वाईट जावा असेच म्हटल्यासारखं वाटतं. त्यानं wish केलंय का विष दिलंय, हेच कळत नाही. पण त्यात त्याचा दोष नाही. जात, गाव, संस्कृतीनुसार आपल्याकडं प्रत्येक बाबतीत विविधता आहे. शंभर टक्के मराठी बोलणं अवघडच आणि तसं बोलणं खरंतर क्लिष्ट आणि अनैसर्गिक. त्यामुळं काही हिंदी, इंग्रजी शब्द यायला हरकत नाही. आता काही म्हणजे नेमके किती, हे जरा चर्चा करून (व्याकरणाचे नियम करून नाही!) ठरवलं पाहिजे. पण ते तसं ठरवताही येत नाही. वाहत्या नदीला वळण देणं महाकठीण, पण त्या त्या भाषेच्या लेखक, कवी, रंग आणि माध्यमकर्मी, सगळ्याच कलाकारांनी ठिकठिकाणी बांध बांधले, की हळूहळू प्रवाह बदलतो.

कुठलीही भाषा समाजाच्या कुठल्याही एका घटकाच्या मालकीची नसते. तिचं रक्षण करू पाहणारे लोक सहसा तिला आपल्या जातीय किंवा राजकीय फायद्यासाठी विशिष्ट चौकटीत काबीज करून ठेवायचा प्रयत्न करतात. भाषा जिवंत असावी, नाहीतर इतिहासात जमा होते. एकेकाळी जगासमोर बुद्धिप्रामाण्यवादाची मांडणी सॉक्रटीसनं ज्या ग्रीक भाषेत केली, वर्जील आणि सिसेरो यांनी भोवतालचं विश्‍व समजून घेण्यासाठी श्रेष्ठ वाङ्‌मय ज्या लॅटिन भाषेत लिहिलं, त्या भाषांचा उल्लेख आज, एखादी गोष्ट समजली नाही की हे ‘ग्रीक आणि लॅटिन आहे बाबा,’ अशा वाक्प्रचारापुरताच मर्यादित राहिला आहे. संस्कृत भाषा तर स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारी मंडळीसुद्धा वापरात नाहीत.

अर्थात, या माझ्या लेखावर काही लोक आक्षेप घेतील. ‘रेडिओच्या साहेबानं आर. जे. संग्रामचा राजीनामा घ्यावा. तो गरीब नाही आणि त्याला नोकर, शिपाई, मजूर, चौकीदार, सरदार म्हणून कुठंही काम मिळेल. पण तुमच्या इमारतीतच काय, पुणे तालुका शहर जिल्ह्यातही फिरकू देऊ नका, बाहेरचा दरवाजा किंवा रस्ता दाखवा. मैदानात किंवा बाजारात उभा करून एक हजार टपल्या द्या. या दरम्यान, असा कायदा बनवा व अमल करा. असं केल्यास तुम्हाला सरकारतर्फे बक्षीस मिळेल आणि जाहिरातीही. आम्ही शिफारस करू. दुसऱ्या भाषेची नक्कल करून मराठीची कत्तल करू पाहणाऱ्याला फाशी नाही, तर कमीतकमी त्याची फजिती झालीच पाहिजे.’

असं म्हणणाऱ्या लोकांना इतर भाषेबद्दल फारशी माहिती नसते, म्हणून सांगतो : हे ठळक शब्द फारशी भाषेतून मराठीत आलेले आहेत. 
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com