करिअरच्या वाटेवर... : ‘न्याय’ मिळवून देणारे करिअर

पूर्वी कायदा शिक्षणाच्या पदवीधरांना एकतर न्यायसंस्थेत न्यायाधीश म्हणून, नाही तर वकिली म्हणून व्यवसाय हे मुख्य पर्याय उपलब्ध असत.
Lawyer
LawyerSakal
Summary

पूर्वी कायदा शिक्षणाच्या पदवीधरांना एकतर न्यायसंस्थेत न्यायाधीश म्हणून, नाही तर वकिली म्हणून व्यवसाय हे मुख्य पर्याय उपलब्ध असत.

- राजेश ओहोळ

पूर्वी कायदा शिक्षणाच्या पदवीधरांना एकतर न्यायसंस्थेत न्यायाधीश म्हणून, नाही तर वकिली म्हणून व्यवसाय हे मुख्य पर्याय उपलब्ध असत. जागतिकीकरण व उदारीकरण धोरणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे कायदा शिक्षणाची विस्तृतता अधिक वाढली. स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेतील सर्व स्तरांवर कायदेशीर सुरक्षिततेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

समाजातील प्रत्येक घडामोडींशी किंवा घटनेशी वकिलांची भूमिका ही निर्णयात्मक होऊ पाहत आहे. आधुनिक काळातील वकील सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. बारावी किंवा पदवी शिक्षणानंतर विधी शिक्षणाकडे वळता येते. विशेष म्हणजे, हे व्यावसायिक शिक्षण कोणत्याही विद्या शाखेतील बारावी आणि पदवी शिक्षणाधारकांना घेता येते.

पदवी शिक्षणानंतर विद्यापीठाचा तीन वर्षांचा बॅचलर ऑफ लॉ (एलएल.बी.), तर बारावीनंतर पाच वर्षांचा एकत्रित पदवी (बीएसएल एलएल.बी.) अभ्यासक्रम विविध विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमधून पूर्ण करता येतात. विधी शिक्षण पदवीधरांना खालील क्षेत्रांत करिअर करता येऊ शकते -

  • न्यायालय

  • कायदा व्यावसायिक कंपनी

  • भारतीय सशस्त्र सेना

  • वित्त संस्था

  • सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यातील नोकरी

  • कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी

  • अशासकीय संस्था

  • विधी महाविद्यालयांमध्ये अध्यापन

  • वकिली व्यवसाय

  • लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग

  • पत्रकारिता

अल्प कालावधीचे विधी शिक्षणातील विशेष पदविका अभ्यासक्रम कायदा क्षेत्रातील नवीन घडामोडींची ओळख करून देतात. असे अभ्यासक्रम उमेदवारांना त्या-त्या क्षेत्रातील विशेष ज्ञान देणारे आहेत. पेटंट लॉ, मीडिया लॉ, सायबर लॉ, इन्टलेक्‍चुअल प्रॉपर्टी लॉ, बॅंकिंग लॉ, ह्यूमन राइट्‌स लॉ, एन्व्हॉयन्‌र्मेंट लॉ, मेडिकल लॉ ॲण्ड एथिक्स, लेबर लॉ ॲण्ड लेबर वेल्फेअर सेक्‍युरिटीज लॉ, टॅक्‍सेशन लॉ आणि क्राइमिनॉलॉजी ॲण्ड पिनॉलॉजी या विषयांतील पदविका अभ्यासक्रम पदवी शिक्षणानंतर करता येण्याजोगे आहेत.

विधी व्यवसाय

ॲडव्होकेट ॲक्‍ट 1961 आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया या वैधानिक संस्थेने तयार केलेले नियम यांना अनुसरून विधी व्यवसाय सुरू करता येतो. ऍडव्होकेट ऍक्‍ट 1961 अन्वये ॲडव्होकेट म्हणून नोंदणी झालेले उमेदवार देशभरात विधी व्यवसाय करू शकतो. एका राज्यातील स्टेट बार कौन्सिलच्या पटावर (Roll) नाव असलेले वकील दुसऱ्या राज्यातील स्टेट बार कौन्सिलच्या पटावर नाव विहित अर्जाद्वारे हस्तांतर करू शकतात; परंतु एकापेक्षा जास्त राज्यांतील स्टेट बार कौन्सिलमध्ये नाव नोंदवू शकत नाहीत. स्टेट बार कौन्सिल पटावर असणाऱ्या वकिलांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करू शकते.

उत्कृष्ट मसुदा लिखाण, सादरीकरण आणि संवाद कौशल्य हे वकिलाचे वैशिष्ट्य समजले जाते. चातुर्य, आत्मविश्‍वास, कष्ट करण्याची आवड, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता, शीघ्र आकलन क्षमता आदी गुण विधी व्यावसायिकांकडे असावे लागतात. वकिलांची कामातील सत्यनिष्ठता ही दोषरहित असावी लागते, कारण अशिलांची गोपनीय माहिती त्यांच्याकडे असते.

गुन्हेगार, अवैध व्यवहार, कृती अथवा गोष्टी यांच्यावर जरब ठेवण्याकरिता कायद्याचा जसा प्रभावशाली उपयोग होऊ शकतो, तसा त्याच्या दुरुपयोगाने परस्परांतील नातेसंबंध, मैत्री यांच्यात तेढ, तणाव किंवा शत्रुत्व निर्माण होऊ शकते. याची संवेदनशीलता वकिलाकडे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वस्तुस्थितीचा अभ्यास करून कायद्याचा सदुपयोग कसा करता येईल ही सामाजिक जबाबदारी वकिलांनी स्वीकारणे अपेक्षित असते. व्यावसायिक नीतिमत्ता जोपासणे व समाजातील स्वतःचा आदर कायम ठेवणे ही वकिली व्यवसायाची काळाची गरज आहे, असा सूर सर्व थरांतून व्यक्त होत आहे. विधी शिक्षण घेऊन सामान्य जनतेस न्याय मिळवून देण्याचे आव्हानात्मक काम वकिलांचे असते, हे मात्र खरे!

(लेखक करिअर समुपदेशक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com