करिअरच्या वाटेवर : अपारंपरिक मशिनिंग उत्पादनाचे क्षेत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Production Field

उत्पादित होणाऱ्या अभियांत्रिकी घटक, उपघटक किंवा अंतिम पदार्थ यांची अचूकता किंवा दर्जा या बाबी उत्पादन करणाऱ्या मशिनवर अवलंबून राहते.

करिअरच्या वाटेवर : अपारंपरिक मशिनिंग उत्पादनाचे क्षेत्र

- राजेश ओहोळ

उत्पादित होणाऱ्या अभियांत्रिकी घटक, उपघटक किंवा अंतिम पदार्थ यांची अचूकता किंवा दर्जा या बाबी उत्पादन करणाऱ्या मशिनवर अवलंबून राहते. साहजिकच उत्पादन करणाऱ्या मशिनची अचूकता पातळी ही उत्पादित होणाऱ्या घटक, उपघटक किंवा पदार्थांपेक्षा जास्त असावी लागते. अशा मशिन टूलची अचूकता पडताळणी किंवा चाचणी घेणाऱ्या मोजमाप साधनांची अचूकता पातळी ही तर सर्वोच्च राहणे स्वाभाविक आहे.

उत्पादन अभियांत्रिकी निगडित सर्व छोटे-मोठे उद्योग मशिन टूल टेस्टिंगची प्रक्रिया वेळोवेळी हातात घेतात. मशिन टूल टेस्टिंग हे नाजूक काम मोठ्या कसोशीने करावे लागते. सर्व बाजूंनी पुन्हा-पुन्हा पडताळणी व शेवटी अंतिम अचूकतेचा निर्णय घेणे हे कसोटीचे काम कसबी तंत्रज्ञ, अभियंते किंवा आयटीआय/एनसीव्हीटी प्रमाणपत्रधारकांना करावे लागते. यासाठी पूर्वप्रशिक्षण व त्या क्षेत्रातील कार्यानुभव असणे अपेक्षित आहे.

मशिन टूलचे प्रकार विविध असले तरी ‘मशिन टूल टेस्टिंग’मध्ये वापरण्यात येणारी काही मोजमाप व तुलना करणारी साधने मात्र ठराविक असतात. यामध्ये डायल इंडिकेटर, टेस्ट मॉन्ड्रेल, स्ट्रेट एजेस, स्पिरीट लेव्हल इत्यादींचा वापर मात्र सर्वांत जास्त होतो. उत्पादन अभियांत्रिकी कारखाने, कंपन्या, लघुउद्योग खालील प्रमुख चाचण्या मशिन टूल टेस्टिंगमध्ये कटाक्षाने समाविष्ट करतात -

 • मशिन टूलची स्लाईडवेज व लोकेटिंग सरपेसेसचे टेस्टिंग.

 • मशिन टूलचे स्पिंडल अचूकता आणि त्याचे इतर मशिन घटकांशी असलेले अपेक्षित भौमितिक नाते पडताळणे.

 • उत्पादित होणाऱ्या घटकांची अचूकता मोजणे.

प्रत्येक मोठ्या अभियांत्रिकी उद्योगाचे स्वतःचे सुसज्ज दुरुस्ती व देखभाल विभाग असतो. यामध्ये आयटीआय/एनसीव्हीटी प्रमाणपत्रधारक व अभियंते हे विविध मशिन टूल यांची दुरुस्ती व देखभाल करतात. प्रत्येक मशिनचे आरोग्यपत्रक राखण्यात येते. मशिनच्या दुरुस्तीचे व पुरविलेल्या सेवा यांचा तक्ता यांना अद्ययावत ठेवावा लागतो. बहुतांश उद्योगांमध्ये दुरुस्ती व देखभाल विभागामार्फत मशिन टूलचे टेस्टिंग केले जातात. दुरुस्ती व देखभाल विभागातील काम हे एकाच प्रकारचे नसून समस्यानुरुप तोडगा किंवा उपाय काढून मशिन टूल सुस्थितीत ठेवावे लागते.

बहुसंख्य अभियांत्रिकी पदार्थ हे मुख्यतः फेरस किंवा नॉनफेरस धातूंचे बनलेले असतात. उच्च शक्ती व वजन यांचे गुणोत्तर अधिक असणाऱ्या अभियांत्रिकी धातूंचे पारंपरिक मशिन टूलच्या साह्याने प्रक्रिया अवघड ठरते, तसेच क्‍लिष्ट आकार किंवा उच्च अचूकता मिळविण्याकरिता पारंपरिक मशिन टूलचा पर्याय निष्प्रभ ठरतो. अशा वेळेस अपारंपरिक मशिनिंगची मदत घेणे अपरिहार्य ठरते.

अपारंपरिक मशिनिंग प्रक्रियांमार्फत अतिकठिण व उष्णता विरोधक धातू हवे त्या आकारात व अचूकतेत मशिनिंग करता येतात. उत्पादन अभियांत्रिकीतील या अपारंपरिक मशिनिंगने तयार झालेले भौमितिकदृष्ट्या अत्यंत अवघड व अत्युच्च अचूकता असलेल्या फेरस आणि नॉनफेरस धातूंचा अंतिम पदार्थातील मुख्य घटक किंवा उपघटक अशा स्वरूपात वापर होतो.

मोठमोठे अभियांत्रिकी उद्योग, कारखाने किंवा कंपनी यांच्या मशिन किंवा शॉपफ्लोअरवर अपारंपरिक मशिनिंग मशिन टूल यांचा पूरक मशिन टूल म्हणून वापर होतो. प्रत्येक कारखाना, उद्योग किंवा कंपनी यामध्ये अशा अपारंपरिक मशिन टूलचा वापर आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसतो. अपारंपरिक मशिनिंगची स्वतंत्र सेवा देणारे पुष्कळशा लघुउद्योगांनी स्वतःचे उत्पादन क्षेत्रात अस्तित्व दाखविले आहे. अशा लघुउद्योगांकडे अपारंपरिक मशिनिंगचे वेगवेगळे प्रकार पाहावयास मिळतात. यामध्ये खालील अपारंपरिक मशिनिंगची सेवा उत्पादन क्षेत्रात सर्वश्रुत आहे.

 • इलेक्‍ट्रो डिस्चार्ज मशिनिंग

 • इलेक्‍ट्रो केमिकल मशिनिंग

 • इलेक्‍ट्रो केमिकल ग्राइंडिंग

 • अल्ट्रासॉनिक मशिनिंग

 • लेसर बिम मशिनिंग

 • केमिकल मशिनिंग

 • अब्रॅझिव्ह जेट मशिनिंग

 • वॉटर जेट मशिनिंग

 • प्लास्मा आर्क मशिनिंग

यामध्ये अल्ट्रासॉनिक मशिनिंग, इलेक्‍ट्रो डिस्चार्ज मशिनिंग, लेसर बिम मशिनिंग यामार्फत उच्चतम अचूकता मिळते. वरील अपारंपरिक मशिन टूलचे इंजिनिअरिंग ड्राईंगनुसार मशिनिंग करण्यासाठी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वापरले जातात. तेव्हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग समजून त्यानुसार टुलिंग, मशिन सेटअप, प्रोग्रॅमिंग आदी गोष्टी अंतिम पदार्थ दर्जात्मक मिळविण्याकरिता गरजेच्या असतात. प्रशिक्षित आयटीआय/एनसीव्हीटी प्रमाणपत्रधारक अथवा मेकॅनिकल किंवा प्रॉडक्‍शन अभियांत्रिकी पदविकाधारक यांना येथे विशेष महत्त्व प्राप्त होते. तेव्हा अपारंपरिक मशिनिंग प्रक्रिया संबंधित ज्ञान रोजगार व स्वयंरोजगारासाठी फायदेशीर आहे.

Web Title: Rajesh Ovol Writes Career Area Of Unconventional Machining Production

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CareerMachine Engineering
go to top