
समस्या, प्रसंग, स्थिती व अटी यांचे गणितात रूपांतर करून मूलभूत शास्त्रांच्या आधारे गणिती मांडणी केली जाते व नंतर गणिती उत्तरे मिळविली जातात.
करिअरच्या वाटेवर : तर्कशास्त्र : रोजगारातील गरज
- राजेश ओहोळ
गणित व शास्त्र विषय शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वांना दहशत निर्माण करणारे वाटतात. साध्या भागाकारापासून ते शून्यलब्धीमधील गणिती सिद्धान्ताचा वापर मूलभूत शास्त्र आणि उपयोजित शास्त्रांमध्ये भौतिक राशीचे सूत्र, संबंध व अट आदी गोष्टी प्रस्थापित करण्यासाठी अपरिहार्यरित्या करावा लागतो. क्लिष्ट व प्रचंड मोठी आकडेमोड अशा सिद्धांताद्वारे सोपी होते. गणित व शास्त्र विषयांचा प्रत्यक्ष जीवनात काय उपयोग, हा प्रश्न या विषयांना घाबरणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना पडतो.
समस्या, प्रसंग, स्थिती व अटी यांचे गणितात रूपांतर करून मूलभूत शास्त्रांच्या आधारे गणिती मांडणी केली जाते व नंतर गणिती उत्तरे मिळविली जातात. याच तंत्राचा जीवनातील अनेक समस्यांवर उपयोग होत आहे. व्यवस्थापनशास्त्रात माल, मनुष्य, मशिन अर्थात साधनसामग्रीचा काळ-काम-वेग सूत्राचा समतोल ठेवून आर्थिकदृष्ट्या किफायतशीरपणे वापर कसा होईल, याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. शाब्दिक माहिती, चर्चा, संवाद यांचे तर्कशास्त्रीय माहितीत भाषांतरामार्फत गणितीय विश्लेषण म्हणजेच गणितीय समस्या निरसन होय.
तर्कशास्त्रीय विचार किंवा त्यांचा आधार हा सर्वच समस्यांवर किंवा प्रसंगावर रामबाण उपाय ठरतो असे नाही, परंतु अनेक समस्या किंवा प्रसंगावर उत्तर किंवा मार्ग मिळविण्यासाठी तर्कशास्त्र हे प्रभावी अस्त्र ठरते. तर्कशास्त्राचे फायदे व उपयोग शिकण्याबरोबर समस्यांनुसार तर्कशास्त्र विचारांचा विकास व पोषण कसे करावयाचे, याचा सराव व सवय स्पर्धायुगात प्रयत्नशील असणाऱ्यांनी अंगीकारली पाहिजे. ताण-तणावामध्ये काम करणारे तंत्रज्ञ, अभियंते, नियोजनकर्ते, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक, एक्झिक्युटिव्ह, व्यवस्थापन तज्ज्ञ, प्रकल्प अधिकारी यांना तर्कशास्त्राचा वापर अटळ ठरतो.
संग्रहित विविध क्षेत्रातील परिस्थितीजनक तर्कशास्त्रीय उपाय, उत्तरे व मार्ग संदर्भासाठी नेहमीच उपयुक्त ठरतात. वैयक्तिक व बिनवैयक्तिक स्तरावरील तर्कशास्त्रीय माहिती, संकलनाचा योग्यवेळी अचूक वापर अनेक समस्यांवरचा तोडगा असू शकतो.
सर्व व्यावसायिक शिक्षण प्रवेश परीक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग यांच्या स्पर्धा परीक्षा, केंद्र सरकार नोकरभरती प्रवेशपरीक्षा या व्यतिरिक्त खासगी उद्योग, कंपन्या, माहिती तंत्रज्ञान व संबंधित उद्योग/कंपन्यांमध्ये नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश चाचणी अशा सर्व ठिकाणी सर्व प्रकारच्या शैक्षणिक पात्रताधारकांना तर्कशास्त्र निगडित प्रश्नांना सामोरे जावे लागते. कमीत कमी वेळेत तथाकथित अवघड आकडेमोड, संख्याक्रम, चित्र जुळवणी/क्रम, शब्द किंवा अक्षर जुळवणी/क्रम संभाव्यता अशा तार्किक प्रश्नांना अचूक उत्तरे द्यावी लागतात. विद्यापीठ, तंत्रशिक्षण परिषद किंवा शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमांवर आधारित अशा प्रश्नांची रचना असते. स्वरूपनिहाय सोडविण्याचे तंत्र हे त्या-त्या अभ्यासाने व सरावाने अवगत होते.
इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून सर्वत्र वापरली जात आहे. इंग्रजी भाषेत स्वतःला प्रकट करणे, विचार मांडणे याचबरोबर स्वतःच्या विचारांना तर्कशास्त्राचे अधिष्ठान असणे, यास विशेष महत्त्व दिले जाते. नोकरीसाठी अर्ज करण्याकरिता पदविका/पदवी पदव्युत्तर शिक्षण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, तसे समूहचर्चा व मुलाखतीमध्ये इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाबरोबर तर्कशुद्ध विचारांचे व्यक्तिमत्त्व सादर होणे तेवढेच गरजेचे ठरते.
Web Title: Rajesh Ovol Writes Career Employment Need
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..