करिअरच्या वाटेवर : मूलभूत अभियांत्रिकी शाखा : रोजगाराचे सोपान

अभियांत्रिकी शाखा निवडताना मूलभूत अभियांत्रिकी शाखा कोणत्या आहेत हे जाणून घेतल्यास पुष्कळशा गोष्टी स्पष्ट होतील.
Engineering
Engineeringsakal
Summary

अभियांत्रिकी शाखा निवडताना मूलभूत अभियांत्रिकी शाखा कोणत्या आहेत हे जाणून घेतल्यास पुष्कळशा गोष्टी स्पष्ट होतील.

- राजेश ओहोळ

विशिष्ट उद्दिष्टासाठी किंवा प्रयोजनासाठी एखादी रचना, वस्तू, यंत्र, उपकरण, उत्पादन, प्रक्रिया किंवा पद्धत आदींची नवनिर्मिती शास्त्रीय सिद्धांत, प्रमेय अथवा तत्त्वे यांच्या उपयोजनाद्वारे करणे म्हणजे अभियांत्रिकी होय. शास्त्र शिक्षण जसे विस्तृत आहे, तसेच अभियांत्रिकी शिक्षणही. एखाद्या विशिष्ट अभियांत्रिकी शाखेत तेवढ्याच ज्ञानाचा वापर असे वस्तुस्थितीत नसते.

विविध शाखांची माहिती

यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engg.) अभियंता रोजगार किंवा व्यवसायामध्ये विद्युत (Electrical), स्थापत्य (Civil), संगणक (Computer) अभियांत्रिकीबद्दल मला काहीच माहिती नाही, असे म्हणू शकत नाही. कारण अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रम हा सर्व शाखांसाठी समान असतो. त्याचबरोबर व्यवस्थापनशास्त्रसंबंधित विषय अंतिम वर्षात जवळजवळ सर्वांना मूलभूत व्यवहार्यता शिकवतात. तात्पर्य काय, अभियंत्याला कल्पकतेबरोबर व्यवहार्यता यांची योग्य शास्त्रशुद्ध सांगड घालता आली पाहिजे हे अपेक्षित असते.

अभियांत्रिकी शाखा निवडताना मूलभूत अभियांत्रिकी शाखा कोणत्या आहेत हे जाणून घेतल्यास पुष्कळशा गोष्टी स्पष्ट होतील. विद्यार्थी व पालक शाखा निवडताना या माहितीद्वारे निर्णयक्षम बनतील. सर्व प्रकारच्या सरकारी आणि खासगी नोकऱ्यांकरिता मूलभूत अभियांत्रिकी शाखांचे अभियंते जास्त प्रमाणात पात्र ठरतात. त्याचबरोबर मूलभूत अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेतले असता, उच्चशिक्षण कुठल्याही त्या-त्या शाखेतील अतिविशेष शाखेत किंवा समांतर/ पूरक शाखेत घेता येते. कोणत्या आहेत मूलभूत अभियांत्रिकी शाखा याची माहिती या लेखात बघू.

स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engg.)

पायाभूत सोयी-सुविधा निर्मितीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचा सिंहाचा वाटा आहे. वास्तू, घर, इमारत, रस्ते, पूल, रेल्वे, धरण, तलाव, बंधारा, बंदर आदी असंख्य गोष्टींची बांधकाम रचना व निर्मिती याचे ज्ञान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत मिळते. अगदी मूलभूत शाखा असल्याने या शाखेचे सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. वाढत्या शहरीकरण व औद्योगिकीकरणाने या शाखेतील अभियंत्यांची गरज वाढत आहे. स्वयंरोजगाराच्या दृष्टीने ही शाखा शक्तिशाली ठरली आहे.

यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engg.)

प्राचीन काळापासून मनुष्यास नैसर्गिक अदृश्‍य ऊर्जा व शक्तीची विविध रूपे माहिती आहेत. नैसर्गिक अदृश्‍य स्वरूपातील ऊर्जा व शक्ती ही मनुष्याच्या दैनंदिन जीवनात अविभाज्य ठरली आहे. शास्त्र-तंत्रज्ञान विकासाबरोबर ऊर्जा व शक्ती यांचा अधिकाधिक पद्धतशीररीत्या वापर सुरू झाला. तंत्रज्ञानाची प्रत्येक शाखा ऊर्जेवर अवलंबून आहे. ऊर्जेचे शक्तीत रूपांतर हे मूलभूत तत्त्व यंत्र अभियांत्रिकीचा आत्मा म्हणता येईल. नैसर्गिक अदृश्‍य ऊर्जेच्या विविध रूपांचे शक्तीत रूपांतर हा संपूर्ण जगाचा संशोधनाचा विषय ठरला आहे. वस्तुमान, गती, बल, शक्ती, रचना, उत्पादन आणि गुणवत्ता व्यवस्थापन यांचा अभ्यास म्हणजे यंत्र अभियांत्रिकी होय.

यंत्र अभियांत्रिकीचे उपयोजन शास्त्र-तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रांमध्ये असल्याने या शाखेतील अभियंत्यांना रोजगाराचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. यंत्र अभियांत्रिकीची व्यापकता मोठी आहे. त्या-त्या क्षेत्राला उपयुक्त ठरावेत या दृष्टीने प्रॉडक्‍शन, ऑटोमोबाईल, इंडस्ट्रिअल, मेकॅनिकल, सॅन्डविच, प्रॉडक्‍शन सॅन्डविच अशा सहाय्यकारी/पूरक अभियांत्रिकी शाखांचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. एरोनॉटिकल/एरोस्पेस अशा अतिविशेष शाखाही मेकॅनिकल अभियांत्रिकीचा भाग आहे. बी.ई. (मेकॅनिकल) अभ्यासक्रम पूर्ण करून जीएटीई (GATE) प्रवेश परीक्षांमार्फत एरोनॉटिकल/एरोस्पेस यातील पदव्युत्तर (M.Tech.) शिक्षणास वळता येते.

विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engg.)

विद्युत अभियांत्रिकी शाखेचे स्वरूपही व्यापक आहे. सर्व अभियांत्रिकी शाखांना या शाखेची मदत घ्यावी लागते. इलेक्‍ट्रिकल सर्किट, जनरेटर, मोटर, इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक/इलेक्‍टोमेकॅनिकल डिव्हायसेस, इलेक्‍ट्रॉनिक सर्किट, ऑप्टिकल फायबर्स, ऑप्टोइलेक्‍ट्रॉनिक डिव्हासेस, कॉम्प्युटर सिस्टिम, टेलिकम्युनिकेशन आदी गोष्टींचा अभ्यास विद्युत अभियांत्रिकीमध्ये केला जातो. सरकारी व खासगी क्षेत्रातील मुबलक संधी विद्युत अभियंत्यांना उपलब्ध आहेत. विद्युत अभियांत्रिकीमधील उच्चशिक्षणाचे अभ्यासक्रम भारतीय विद्यापीठे, आयआयटी, एनआयटी यामध्ये शिकविले जातात.

रसायन अभियांत्रिकी (Chemical Engg.)

एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीमध्ये रसायन अभियांत्रिकीचा जन्म झाला. केमिकल प्रकल्प आणि प्रक्रिया निगडित सर्व बाबींचा या शाखेत समावेश होतो. संशोधन व विकास संस्था, प्रक्रिया उद्योग, खनिज तेल प्रकल्प, नैसर्गिक वायू प्रकल्प, रसायन उद्योग आदी क्षेत्रांमध्ये रसायन अभियंता याची मागणी असते. पेट्रोकेमिकल, पेट्रोलियम या अभियांत्रिकी विशेष शाखा केमिकल इंजिनिअरिंगचाच भाग आहे. आयआयटी/आयआयएस्सी/एनआयटीसारख्या राष्ट्रीय संस्थांमध्ये रसायन अभियांत्रिकीचे एम.टेक./पीएच.डी. उच्चशिक्षण घेता येते. शास्त्र-तंत्रज्ञानातील मूलभूत शाखा सर्वसाधारणरीत्या सर्व क्षेत्रांतील करिअरसाठी संधी निर्माण करतात. नुसत्या ठराविक उपयोजनासाठी रचना केलेली अभियांत्रिकी शाखा करिअर विकासाला मर्यादा आणू शकते. तेव्हा शाखा निवडताना मूलभूत अभियांत्रिकी शाखेचा विचार होणे गरजेचे आहे. मूलभूत शाखांधिष्ठित पूरक अभियांत्रिकी शाखांची माहिती पुढील भागात बघू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com