esakal | परदेशात शिकताना... : आव्हानात्मक वातावरणात तग धरताना...
sakal

बोलून बातमी शोधा

Abroad Education

परदेशात शिकताना... : आव्हानात्मक वातावरणात तग धरताना...

sakal_logo
By
राजीव बोस

विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर अनेक प्रश्न पडतात व त्यातील सर्वाधिक वेळा विचारला जाणारा प्रश्न असतो, आम्ही एमएस अभ्यासक्रमासाठीची तयार कशी करावी. विद्यार्थ्यांनी त्यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मोठे कष्ट घेतलेले असतात, त्यानंतर प्राथमिक पातळीवर त्यांनी कामाचा चांगला अनुभवही घेतलेले असतो. असे असले तरीही विद्यार्थी आपण आंतरराष्ट्रीय संस्थांमधील आव्हानात्मक वातावरणात तग धरू शकू अथवा नाही, यासंबंधात काही प्रमाणात साशंक असतात. याचे मुख्य कारण शिक्षण पद्धतीमध्ये असलेला मोठा फरक व त्याप्रमाणे संस्कृतीमध्येही जाणवणारा मोठा फरक. जे विद्यार्थी होस्टेलला व आपल्या घरापासून मोठ्या कालावधीसाठी लांब राहिले आहेत त्यांना या परिस्थितीशी सहज जुळवून घेता येते. मात्र, जे आपल्या घरापासून प्रथमच दूर जात आहेत, त्यांनी ही परिस्थिती सांभाळणे अवघड जाऊ शकते.

विविध कौशल्ये मिळवा

तुम्ही परदेशी भूमीवर पोचण्याआधी विविध कौशल्ये मिळवली असतील व तुमचे अनेक संपर्क तयार झालेले असतील, तर खूप मोठा फरक पडू शकतो. आम्ही विद्यार्थ्यांना कायमच परदेशात शिक्षणासाठी जाण्याआधी विविध विषयांतील मूलभूत संकल्पना स्पष्ट करून घेणे व त्याचबरोबर सॉफ्टवेअरमधील नैपुण्य अधिक विकसित करण्याचा सल्ला देतो. अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी काही किमान अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट घातलेली असते. हा अभ्यासक्रम आधीच पूर्ण केलेला असल्यास त्यांना पहिली सेमिस्टर सुरू होण्याआधीच चांगला उपयोग होतो.

विद्यार्थी नवे वातावरणाचे आव्हान स्वीकारत असतात, अनेक नव्या गोष्टींशी जुळवून घेत असतात, अनोळखी ठिकाणी बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात असतात, अशा वेळी अभ्यासक्रम सुरू होण्याआधीच एका विषयाचा अभ्यास पूर्ण करणे विद्यार्थ्यांसाठी खूपच अवघड काम ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित अभ्यासक्रम आधीच पूर्ण करून घेणे आवश्यकच आहे आणि ते खूप फायद्याचे ठरते.

वातावरण आणि घराच्या आठवणींशी (होमसिकनेस) जुळून घेणे अपरिहार्य असते आणि ते कितीही कठीण असले, तरी आमच्या अनुभवानुसार विद्यार्थी पहिल्या सेमिस्टरच्या शेवटापर्यंत या सर्वांशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतात.