संवाद : संधी आर्किटेक्ट क्षेत्रातील

भारतात मागील दोन दशकांपासून झपाट्याने शहरीकरण होत आहे. ते होत असताना खूप मोठ्या प्रमाणात भौतिक सोयी सुविधा निर्माण होत आहेत.
architecture field
architecture fieldsakal
Summary

भारतात मागील दोन दशकांपासून झपाट्याने शहरीकरण होत आहे. ते होत असताना खूप मोठ्या प्रमाणात भौतिक सोयी सुविधा निर्माण होत आहेत.

- ऋषिकेश हुली

भारतात मागील दोन दशकांपासून झपाट्याने शहरीकरण होत आहे. ते होत असताना खूप मोठ्या प्रमाणात भौतिक सोयी सुविधा निर्माण होत आहेत. यामुळे बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होताना दिसते. बांधकाम क्षेत्रात अगदी अकुशल कामगारांपासून तज्ज्ञांपर्यंत वेगवेगळ्या स्तरातील करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. बांधकाम व्यवसायात महत्त्वाची भूमिका वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेकची असते. एखाद्या प्रकल्पाच्या फिजिबिलिटी स्टडीपासून, संकल्पना, डिझाईन, नियोजन, सरकारी परवानग्या, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इत्यादी गोष्टींमध्ये वास्तुविशारदांची भूमिका महत्त्वाची असते.

देशात आजही वास्तुविशारदांची संख्या काही ठराविक ठिकाण वगळता पुरेशी नाही. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, आंध्र प्रदेश आदी शहरीकरण झालेल्या राज्यांमध्येच वास्तूकला महाविद्यालयांची व वास्तुविशारदांची संख्या पुरेशी दिसते. आर्किटेक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे हे नक्कीच. प्रामुख्याने वास्तुविशारद नक्की काय काम करतात, त्यांची बांधकाम व्यवसायात भूमिका काय असते, वास्तुविशारद होण्यासाठी शिक्षण काय घ्यावं लागतं, त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात तसेच कोणत्या आवडीनिवडीची, स्किलसेटची आवश्यकता असते याचा आढावा घेणार आहोत.

वास्तूकला ही प्राचीन कलांपैकी एक आहे. यामध्ये कलात्मकते बरोबरीने तंत्रज्ञानालाही महत्त्व आहे. प्राचीन काळात इमारत बांधणीतील तंत्रज्ञानाचा विकास हा मनुष्यवस्तीच्या परिसरातील साधन संपत्तीवर अवलंबून होता व आजच्या दृष्टीने किमान गरजा भागवण्यावर भर होता. हळूहळू यामध्ये किमान गरजांबरोबरच मनुष्याच्या बदलत्या संस्कृती, व्यापार, व्यवसाय, धर्म, कुटुंबपद्धती, राजकारण, अर्थकारण आणि हवामान यांच्या परिणामातून विकास होत गेला. वास्तूकला ही नेहमी एखाद्या प्रदेशातील सामाजिक परिस्थिती, अर्थकारण, व्यापार आणि राजकीय परिस्थिती (कधी राजाश्रय) यांच्या परिणामातून विकसित झाली आहे. औद्योगिक क्रांती पासून आजच्या जागतिकीकरणापर्यंत झालेल्या वास्तुकलेच्या विकासातूनही हेच दिसून येतं.

कोणती कौशल्य असावीत?

वास्तुकलेचा करिअर म्हणून विचार करत असताना चित्रकला चांगली असेल विचार करा असा समज प्रचलित आहे. फक्त चित्रकला चांगली असणं हा निकष असू शकत नाही. तसेच चित्रकला चांगली नसेल तर आर्किटेक्ट होता येणार नाही असाही समज पूर्णपणे चुकीचा आहे. शालेय जीवनातील चित्रकलेच्या परीक्षा देणारे विद्यार्थी आर्किटेक्चरला करिअर म्हणून निवडताना इतरांपेक्षा वरचढ ठरतात हा मोठा गैरसमज आहे. चित्रकला चांगली असण्याचा उपयोग हा संकल्पना मांडण्यामध्ये होऊ शकतो हे मात्र नक्की. चांगला आर्किटेक्ट होण्यासाठी गरजेचे असलेले स्किलसेट्स महाविद्यालयीन जीवनात थोड्या मेहनतीने अगदी सहज मिळवता येऊ शकतात. वास्तूकला शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे कुतूहल व जिज्ञासा आणि त्याच बरोबरीने अखंड मेहनत घ्यायची शारीरिक आणि मानसिक तयारी.

कुतूहल आणि जिज्ञासा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करायला आणि गोष्टींकडे बघण्याची विशिष्ट नजर तयार करायला मदत करून तुमची क्रिएटिव्हिटी वाढू शकते. क्रिएटिव्ह होण्यासाठी विशिष्ट प्रकारे मेंदूला प्रशिक्षित करता येत आणि सतत करतही राहावं लागते. तुम्हाला इतिहास, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान सारख्या विषयांमध्ये रस असल्यास त्याचा उपयोग वास्तूकला शिकताना आणि प्रॅक्टिस करताना नक्कीच होऊ शकतो. आर्किटेक्चर शिकताना कला आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी शिकाव्या लागतात आणि त्याची योग्य सांगड घालावी लागते, त्यामुळे विज्ञानाचे शिक्षण आणि कलेची जाण व आवड असणारी व्यक्ती वास्तुकलेचा करिअर म्हणून विचार करू शकते.

डिझाईन प्रोसेस पुरते काही छोटे प्रकल्प सोडले तर इतर सर्व प्रकल्पांमध्ये आर्किटेक्चर ही टीम ॲक्टिव्हिटी म्हणून गृहीत धरली पाहिजे. आर्किटेक्चरल स्टुडिओपासून ते अगदी साइटवर काम करताना आर्किटेक्टने कधी टीमचा एक भाग तर कधी टीम लीडर म्हणून काम करणं अपेक्षित असते. यासाठी उत्तम लोक कौशल्याची गरज असते. वास्तुकलेचा अभ्यास हा तितकाचा सोपा नाही. प्रचंड मेहनत आणि तासनतास काम करण्याची सवय लावायची तयारी, इच्छाशक्ती आणि संयम असायला हवा. जे विद्यार्थी या गोष्टींसाठी तयार होतात त्यांच्यासाठी आर्किटेक्चर एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते हे मात्र नक्की. पुढील लेखात आपण वास्तुविशारदांच्या बांधकाम व्यवसायातील रोल बद्दल जाणून घेऊयात.‌

(लेखक आर्किटेक्चर, इंटिरियर आणि लॅंडस्केप डिझाईन क्षेत्रात कार्यरत असून आर्किटेक्चर महाविद्यालयात अध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com