
‘डिजि’साक्षर : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने मार्गक्रमण...
- समीर आठल्ये
न्यूझीलंड देशातल्या ख्राईस्टचर्च शहरातल्या ‘द प्रेस’ या वृत्तपत्राने १३ जून १८६३मध्ये एक लेख छापला होता. लेखाचं नाव होतं ‘डार्विन अमंग द मशिन्स’ आणि तो लेख लिहिला होता सुप्रसिद्ध लेखक सॕम्युअल बटलर यांनी. त्या लेखात त्यांनी यंत्रांच्या उत्क्रांती बद्दल लिहिलं होतं. त्यांच्या मते यंत्रांची उत्क्रांती माणसापेक्षा जलदगतीने होत आहे आणि एक दिवस असा येईल की यंत्र माणसापेक्षा हुशार असतील अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यांनी जवळपास १६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखातल्या गोष्टी आज खऱ्या होत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हा विषय आपल्याला फार नवीन नाही. कित्येक काल्पनिक कथांमध्ये निर्जीव वस्तूंना बुद्धी असल्याचं किंवा विचार करता येत असल्याचं आपण वाचलं किंवा ऐकलं आहेच.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात विशेषतः अमेरिकेत तंत्रज्ञानात खूप संशोधन आणि घडामोड होऊ लागली. १९५० च्या आसपास संगणकावर काम करणे शक्य होऊ लागले तसं तसं कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय जोर पकडू लागला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर १९५६मध्ये संशोधन सुरू झालं. परंतु संगणकांचा वापर करून बाकी करण्यासारख्या अनेक गोष्टी असल्यामुळे सरकार किंवा इतर कुणी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर पैसे खर्च करायला तयार होईना. त्यामुळे पुढे जाऊन वैयक्तिक वापराचे संगणक तयार होऊ लागेपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय तसा मागे पडला. परंतु गेल्या काही वर्षात त्यावर पुन्हा काम सुरू झालंय.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणारी हजारो सॉफ्टवेअर आज आहेत. आपण मोबाईल फोन, सोशल मीडिया अॕप्स वापरतो. पत्ता शोधताना गूगल मॕप्स वापरतो, काहीही शोधायचं झाल्यास आपण गूगलवर शोधतो आणि आपल्याला बऱ्यापैकी वेळा अगदी अचूक रिझल्ट्सही मिळतात. सोशल मीडियावर आपल्या आवडत्या, जवळच्या व्यक्तीने पोस्ट केलेला फोटो आपल्याला पटकन दिसतो. काही वेळा तर त्याचं नोटिफिकेशनही येतं.
अॕमेझॉन, फ्लिपकार्ट आपल्याला हवी असणारी गोष्ट, आपण न शोधता दाखवतात आणि आपल्याला आश्चर्यचकित करतात. आपल्यापैकी बरेच जण अलेक्सा, सिरी किंवा गूगल असिस्टंटला वेगवेगळी कामं सांगतात. जसं की अलेक्सा जुनी गाणी लाव किंवा सिरी मला जोक सांग आणि हे सगळे असिस्टंट आपलं ऐकतात.
आता आवाजी आज्ञा ऐकून त्या पाळणे यात काही विशेष नाही. बरीच सॉफ्टवेअर हे करू शकतात.
परंतु आपण अलेक्साला जेव्हा जुनं गाणं लावायला सांगतो आणि ती जुनं म्हणजे तुमच्या आवडीच्या लता मंगेशकर किंवा किशोर कुमारचं लावते हे यातलं सगळ्यात साधं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. उद्या समजा आपण स्वयंपाक करायला रोबो घेतला तर तो आपण जो सांगू तो पदार्थ करेलच परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तो दिवाळी आहे लक्षात आलं की न सांगता फराळाची तयारीही सुरू करेल. बाकी सर्व सॉफ्टवेअर दिलेल्या सूचना पाळतात आणि त्यावरून जमा केलेल्या माहितीवरून आपल्याला वेगवेगळे रिपोर्ट्स देतात. कृत्रिम बुद्धिमत्ता मात्र तेवढ्यावर न थांबता विचार करून निर्णय घेऊ शकेल. आधी म्हटल्याप्रमाणे न सांगता दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू करेल. आपण हो म्हणालो तर कदाचित फराळ तयारही करेल. तांत्रिक परंतु सोप्या भाषेत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मनुष्य ज्या क्षमतेने काम करू शकतो किंवा विचार करू शकतो, त्या किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने संगणक किंवा कुठल्याही यंत्राला विचार करायला लावणे. अजून तरी ते शक्य झालं नाहीये. कदाचित तशी परिस्थिती निर्माण व्हायला अजून काही वर्ष लागतील. परंतु आपण त्या दिशेने नक्कीच चाललो आहोत.
(क्रमशः)
Web Title: Samir Aathalye Writes Artificial Intelligence
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..