esakal | वाया काहीच गेलं नाही... | Online School
sakal

बोलून बातमी शोधा

Online School
वाया काहीच गेलं नाही...

वाया काहीच गेलं नाही...

sakal_logo
By
संजीव लाटकर

आपण शिकलेली कोणतीच गोष्ट वाया जात नाही, असं म्हणतात. हे जर खरं असेल तर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेल्या दीड वर्षाचा विचार त्याच प्रकारे करायला काय हरकत आहे?

गेल्या वर्षी कोरोनाची जीवघेणी साथ आली आणि त्यात लाखो माणसं मृत्युमुखी पडली. सर्वांचीच आयुष्य ढवळून निघाली. रोजगार बुडाले. अर्थचक्र थांबलं. मुलांचं शिक्षण थांबलं. क्रियाशील आयुष्य जवळपास संपुष्टात आलं. समाजजीवन थिजलं. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला. प्रशासकीय यंत्रणेच्या तोंडचं पाणी पळालं. साथ नवी होती. त्यामुळे सर्वच जण अननुभवी होते. स्वाभाविकच गोंधळाचं वातावरण होतं. भेदरलेल्या अवस्थेत समाज कसाबसा जगत होता. लहान मुलांची अवस्था तर त्याहून बिकट होती. त्यांच्यासाठी सगळीच परिस्थिती आव्हानात्मक होती. खेळ थांबले. रूटीन थांबलं. त्यांच्या सर्व ॲक्टिव्हिटीज थांबल्या. शाळा थांबली. मित्र-मैत्रिणींना भेटणं, गप्पा मारणं थांबलं आणि त्यांच्या आयुष्यात काही काळाने अचानक ऑनलाईन शिक्षण अवतरलं. या ऑनलाईन शिक्षणाची कल्पना पूर्वी त्यांना तितकीशी नव्हती. म्हणजे मोबाईल माहीत होता, संगणक माहीत होता... पण त्याचा वापर करून शिकता येतं, याची पुरेशी कल्पना नव्हती. परिस्थितीला सामोरे जात जेव्हा ऑनलाईन शिक्षणाचा निर्णय झाला, तेव्हा मुलांनी स्वतःमधल्या लवचिकतेमुळे ती नवीन शिक्षण पद्धती स्वीकारली आणि ते ऑनलाईन अभ्यास करू लागले. त्यामुळे ऑनलाईन शाळा भरू लागल्या.

कोरोना साथीने खूप काही नेलं, हे सत्य आहे; पण खूप काही शिकवलं, हेही तेवढंच सत्य आहे. प्रत्येक संकट हे बरोबर एक संधी घेऊन येतं, असं म्हणतात. हे वचन कोरोनालाही लागू होतं. मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं का? तर पाठ्यपुस्तकांवर आधारित प्रचलित आणि प्रस्थापित शिक्षण घेण्यापासून मुलं वंचित राहिली, हे सत्य आहे. त्यावर आधारित त्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत, त्यामुळे त्यावर निकाल लागले नाहीत, हेही सत्य आहे. पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण पुढे आले आणि त्यावरच आधारित परीक्षा झाल्या. त्यात बहुसंख्य मुलं भरभरून मार्कांनी पास झाली. या भरभरून मिळणाऱ्या मार्कांबद्दलसुद्धा खूप उलटसुलट चर्चा झाली. इतकेच नव्हे, तर कोरोना काळातून पुढे गेलेल्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल भविष्यात प्रश्नचिन्ह निर्माण होईल का, अशी शंकाही उपस्थित झाली.

मुलांचा पारंपरिक शिक्षणाचा ठरलेला साचेबद्ध अभ्यासक्रम कोरोनाच्या काळात समाधानकारकरीत्या पूर्ण झाला नाही, हे वास्तव असले तरी याच काळाने मुलांना जे जगण्याचे प्रत्यक्ष शिक्षण दिले, तेही आपल्याला दुर्लक्षिता येणार नाही. प्रश्न आहे, आपण शिक्षण म्हणजे काय समजतो? शिक्षणाची संकल्पना काय? याचा मुळातून विचार करणार आहोत की नाही याचा! शिक्षणाचा अर्थच जीवनकौशल्य आत्मसात करणे असा आहे. तुम्ही तुमचं जीवन यशस्वीपणे जगू लागलात की शिक्षणाचा हेतू सफल होतो. तुमचा व्यक्तिमत्त्वविकास, तुमचं आकलन, परिस्थितीला तुम्ही देत असलेला प्रतिसाद, तुमचं विशिष्ट विषयातलं कौशल्य, तुमची अभिव्यक्ती, तुम्ही समाजासाठी काही करू शकता याची क्षमता, तुम्ही स्वतःचे पैसे स्वतः कमवू शकता... समाजात मिसळू शकता... परस्पर संबंध प्रस्थापित करू शकता... ते नीट हाताळू शकता... सुदृढ मानसिकता जोपासू शकता... या सर्वांची क्षमता शिक्षणातून तयार होते. शिक्षण हे तुम्हाला जीवनाचं कौशल्य शिकवते. शिक्षणाच्या अनेक बाजू आहेत आणि अनेक बुद्धिमत्ता आहेत. केवळ गणित आलं म्हणजे शिक्षण आलं, असं होत नाही. मुलं सतत शिकत असतात. ती काय शिकतात, याकडे आपलं लक्ष हवं.

वाया काहीच गेलं नाही, असं आपण का म्हणतोय?

कारण कोरोनाच्या संकटातही अनेक संधी चालून आल्या, ज्या आपल्या मुलांच्या भावी आयुष्याचा पाया म्हणूनही उपयुक्त ठरल्या आहेत.

१) कोरोनाची निर्मिती ही मानवनिर्मित होती की तो एक अपघात होता की निसर्गाचा आघात... याबद्दल यापुढेही चर्चा होत राहील. मात्र अशी संकटं ही भविष्य काळात वारंवार येऊ शकतात, असं तज्ज्ञ बजावत आहेत. ते जर खरं असेल, तर अशा स्वरूपाच्या महामारीच्या काळात काय करायला हवं आणि काय करायला नको, हे मुलं नक्की शिकली. कारण हा संपूर्ण अनुभव त्यांनी जवळून पाहिला आणि आत्मसात केला. विलगीकरण, साथीची पूर्वलक्षणं, मास्क घालण्याचे बंधन, गर्दी टाळणे, औषध उपचार वेळेत घेणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा वापर, आहार, जीवनसत्त्वाचं महत्त्व, अशा प्रकारच्या आजारांमध्ये दडलेला धोका आणि जोखीम, अशाही काळात कशा पद्धतीने तग धरायचा, शिक्षण सुरू ठेवायचं, घरात थांबून राहायचं, आपल्या आवडी-निवडीना मुरड घालायची... हे आणि अशा कितीतरी गोष्टीही मुलं शिकलीच ना?

२) अनेक कुटुंबांवर आर्थिक आघात झाले. खाण्यापिण्याची आबाळ झाली. उपासमार झाली. मुलांसाठी हा एक मोठा धडा होता. या काळात त्यांना रोजगाराचे महत्त्व, पैशांचं महत्त्व, कामाचं महत्त्व... हे खूप जवळून अनुभवायला मिळालं. अनेकदा पालक आपली वास्तव आर्थिक परिस्थिती मुलांना कळू देत नाहीत. हेतू असा असतो, की मुलांच्या सुंदर आयुष्यावर आर्थिक संकटाची पडछाया पडू नये; परंतु मुलांना नेहमीच आपल्या कुटुंबाच्या आर्थिक वास्तवाची जाण असलेली चांगलीच असते. या काळात मुलांना आपल्या कौटुंबिक वास्तवाची जाण प्रकर्षाने झाली हीसुद्धा जमेची बाजू म्हणावी लागेल.

३) महामारी किंवा महासाथ आल्यानंतर कशा पद्धतीने तिला तोंड द्यायचं याचं प्रशिक्षण मुलांना मिळालं. इतकेच नव्हे, तर ती एकटे राहायला शिकली. त्यांना स्वतःच्या कुटुंबाबरोबर राहण्यासाठी खास वेळ मिळाला. त्यांना कुटुंबव्यवस्थेचे महत्त्वसुद्धा कळालं. कदाचित याच काळात त्यांना आई-बाबा, भावंडं यांच्या स्वभाववैशिष्ट्यांची पुरेशी सखोल ओळखही झाली.

४) मुलांना कदाचित स्वतःवरील वाढलेल्या जबाबदारीची जाणीवसुद्धा या काळात झाली. कारण आजूबाजूला मुलं जे पाहत होती, जे घडत होतं, त्याचा एक पॉझिटिव्ह परिणामसुद्धा मुलांवरती झालेला असू शकतो. आजुबाजूला काही मृत्यू घडल्यास किंवा माणसं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यास मुलांच्या मनामध्ये त्याचे पडसाद उमटतात; परंतु आपण त्यापासून कसा बचाव करायला पाहिजे, याचे प्रशिक्षण घेण्याचा मुलांचा ओढाही वाढतो. म्हणजेच मुलांमधला सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम या निमित्ताने जागा झाला.

५) मुलांना स्वतःसोबत राहण्यासाठी उत्तम वेळ मिळाला. कारण असं म्हणतात की स्वतःची कंपनी ही सर्वात बेस्ट कंपनी... तर अशी स्वतःची बेस्ट कंपनी कोरोना महासाथीच्या काळात त्यांना अनुभवायला मिळाली. या काळात अनेक मुलं ही अंतर्मुख झालेली असू शकतात. आजूबाजूच्या परिस्थितीवर स्वतःचा म्हणून त्यांनी विचार केलेला असू शकतो. यातल्या अनेक गोष्टी या मुलांच्या वाढीसाठी उपकारक ठरू शकतात.

६) शालेय स्तरावरच्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण हे याच काळात सुकर झाले. संकटातून मिळालेली संधी म्हणून असेल, पण मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. ज्या प्रमाणात ते गेल्या दीड वर्षात घेतले गेले, तसे ऑनलाईन शिक्षण नॉर्मल परिस्थितीत घेतलेच गेले नसते. ऑनलाईन शिक्षणाच्या काही मर्यादा असतीलही; परंतु मुलांच्या भविष्यातल्या वाटचालीमध्ये ऑनलाईन शिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. त्याची महत्त्वाची अशी रंगीत तालीम गेल्या दीड वर्षात अपरिहार्य परिस्थितीत पार पडली आणि आपली मुलं ऑनलाईन शिक्षणासाठी तयार झाली. हीसुद्धा महत्त्वाची गोष्ट होय.

कोरोना महासाथीने घालून दिलेल्या धड्यापासून आपण बरंच काही शिकलो. मुख्य म्हणजे संकटाच्या काळात जगायला शिकलो. स्वतःचं रक्षण करायला शिकलो आणि सामाजिक निर्बंध हे कशाप्रकारे पाळायचे असतात, हेही शिकलो. याचेही मार्क मुलांना आपण द्यायलाच पाहिजेत. कारण हेही एक महत्त्वाचं शिक्षण आहे, हीसुद्धा एक परीक्षाच आहे, जी जीवनाशी थेट संबंधित आहे! त्यामुळे मुलं काहीच शिकली नाही, असं म्हणणं हे मुलांवर अन्याय करणारं ठरेल.म्हणून लेखाच्या सुरुवातीलाच मी आपल्याला म्हटलं, वाया काहीच गेलं नाही! कोरोनाच्या काळातली सक्तीची दीड वर्षाची रजाही वाया गेली नाही...

sanjeevlatkar@hotmail.com

loading image
go to top