मुलं अनुत्तीर्ण का होतात?

परीक्षा जवळ आल्या की कुठल्याही शाखेच्या, कुठल्याही परीक्षेच्या खडबडून जाग्या झालेल्या विद्यार्थ्यांची धडपड वाढते. त्यांची घड्याळाशी स्पर्धा सुरू होते.
Education
EducationSakal
Summary

परीक्षा जवळ आल्या की कुठल्याही शाखेच्या, कुठल्याही परीक्षेच्या खडबडून जाग्या झालेल्या विद्यार्थ्यांची धडपड वाढते. त्यांची घड्याळाशी स्पर्धा सुरू होते.

काही पालक तर अभिमानाने सांगतात, की वर्षभर आमच्या मुलांनी काही केलं नाही; पण शेवटच्या एक महिन्यात अभ्यास करून त्यांनी इतके घसघशीत मार्क मिळवले... असं म्हणून पाल्याच्या हुशारीचं ते तोंड भरून कौतुक करतात. परीक्षेच्या आधी एक महिना रट्टा मारला, की आपण चांगले मार्क मिळवू शकतो... हा मुलांमधला फाजील आत्मविश्वास भविष्यासाठी खूपच घातक ठरतो. आयत्या वेळेस काम करून वेळ मारून नेणे, ही घातक प्रवृत्ती एकदा आपल्या मनात घट्ट रुजली, की त्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागतो. ही प्रवृत्ती आपल्या करिअरमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये मोठं नुकसान करते.

परीक्षा जवळ आल्या की कुठल्याही शाखेच्या, कुठल्याही परीक्षेच्या खडबडून जाग्या झालेल्या विद्यार्थ्यांची धडपड वाढते. त्यांची घड्याळाशी स्पर्धा सुरू होते. अभ्यासाचं ओझं खूप जड भासत असतं आणि तो अभ्यास पूर्ण करण्याचा कालावधी मात्र कमी असतो. म्हणजे त्यांना आयत्या वेळेला जाग आलेली असते. बहुतेक मुलं ही परीक्षेच्या वेळेला जागी होतात. अभ्यासाला एक शिस्त लागते. चौकट लागते. सराव लागतो. उजळणी लागते. धड्यावरचे नवे नवे प्रश्न पडावे लागतात. सुचावे लागतात. त्याची उत्तरं स्वतःहून शोधावी लागतात. या सगळ्याचा आयत्या वेळेला धावपळ करणाऱ्या मुलांच्या प्रयत्नांमध्ये अभाव असतो. ते धड सगळे धडे पूर्णपणे वाचूही शकत नाहीत. त्या धड्यांचा सर्व बाजूंनी नीट विचारही करू शकत नाहीत. मग केवळ परीक्षेपुरता अभ्यास होतो. मोस्ट इम्पॉर्टन्ट म्हणून जे काही सांगितलं जातं, तेवढ्यापुरता ते अभ्यास करतात. हे मोस्ट इम्पॉर्टन्ट प्रश्न परीक्षेला आलेच नाहीत किंवा त्याची उत्तरं आठवलीच नाहीत, की अशा विद्यार्थ्यांची कामगिरी ही सुमार होते. हा प्रकार केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसतो. हा प्रकार सातत्याने घडत जातो आणि मुलांची शैक्षणिक कामगिरी ही प्रचंड प्रमाणात खालावते. त्यांच्या करिअरचा पाया खचत जातो, पोखरला जातो. परीक्षेच्या तोंडावर आयत्या वेळेस अभ्यासाला बसणारी मुलं उत्तम स्तरावरील एकाग्रता साधण्यात कमी पडण्याची शक्यता असते. आपल्या अभ्यासावर अल्पावधीत फोकस साधणे, एका जागी बैठक मारणे, न कंटाळता अभ्यास करणे हे कौशल्य अभ्यासात पुढे असलेल्या मुलांना साध्य झालेलं मी पाहात आलो आहे!

मी दहावी आणि बारावीमधल्या अतिशय उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोललो. त्यांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा माझ्या लक्षात असं आलं, की उत्तम कामगिरी करणारी मुलं ही सेल्फ मोटीवेटेड असतात. ती केवळ दोन-तीन महिने आधी नव्हे, तर वर्षभर सातत्याने आणि नियमित अभ्यास करत असतात. त्यांना आपण नेमका किती अभ्यास करायला पाहिजे, तो कसा करायला पाहिजे, त्यासाठी किती वेळ दिला पाहिजे, या सर्वांची उत्तम कल्पना असते. अजून एक गंमत अशी, की ही मुलं समजा सकाळी लवकर उठून अभ्यास करत असतील, तर ती स्वतःहून सकाळी उठतात. त्यांना त्यांचे पालक उठवत नाहीत. त्यांची आतली ऊर्मी त्यांना जागं करते आणि ही ऊर्मी त्यांना अभ्यासाला बसायला भाग पडते. इतकंच नव्हे, तर ही ऊर्मी त्यांच्यातली चिकाटी आणि सातत्य टिकवून ठेवते. या ऊर्मीमुळेच ही मुलं चटकन एकाग्रता साधू शकतात. ही ऊर्मी फार महत्त्वाची आहे. मी जेव्हा यशस्वी मुलांशी किंवा करिअरमध्ये उत्तुंग काम केलेल्या यशस्वी उमेदवारांशी आणि व्यक्तींशी बोललो, तेव्हा ही मला जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची ऊर्मी अबाधित असते आणि ती प्रचंड असते. अशा विद्यार्थ्यांची ऊर्जा ही खरोखरच नेत्रदीपक असते. ते खूप हुशार नसतीलही; पण ते त्यांच्या प्रयत्नांच्या बाबतीत प्रामाणिक असतात आणि प्रामाणिक प्रयत्नांना नेहमीच फळ मिळत आलं आहे.

दुसरीकडे मी परीक्षेच्या काही महिने आधी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतो, तेव्हा महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे अनेक मुलांनी अभ्यास सिरियस घेतलेला नसतो! तुम्ही अभ्यासाकडे, म्हणजे भविष्यातल्या तुमच्या कामाकडे किती गांभीर्याने बघत आहात, यावर तुमचे करिअर असते. आपल्या कामाकडे आपण गांभीर्याने बघणं, त्याचा सतत सकारात्मक विचार करणं, अभ्यासाचा कंटाळा न करता आपली अभ्यासातली उत्सुकता टिकवून ठेवायला शिकणं, शिकण्याची ही प्रोसेस आवडणं, समजून घेण्यात आनंद मिळणं या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. अभ्यास हा जसा परीक्षेसाठी करायचा असतो तसाच तो स्वतःसाठीसुद्धा करायचा असतो. स्वतःची वाढ व्हावी म्हणूनही करायचा असतो. आपली बौद्धिक, मानसिक वाढ ही आपल्या अभ्यासावर अवलंबून असते; परंतु परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करणारी मुलं या महत्त्वाच्या प्रोसेसला मुकतात आणि याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. आयत्या वेळेला काम पडल्यावर धावपळ करायची म्हटल्यानंतर अशा कामांमध्ये धांदल उडते आणि अशी कामं ही उत्तम पद्धतीने पार पडू शकत नाहीत. खूप धावपळ केल्यावर धाप लागते. थकायला होतं. टेन्शन येतं आणि परीक्षा देण्यातला आनंद निघून जातो. परीक्षेचा निकाल येईपर्यंत छातीचे ठोके चुकत असतात. काही मुलं ही अतिशय वाईट कामगिरी करतात. काही घोकंपट्टी करणारी मुलं परीक्षेत बऱ्यापैकी मार्क मिळवतात. मग अशा मुलांच्या मनात पक्कं बसतं, की परीक्षेचा अभ्यास हा आयत्या वेळेला केला तरी चालतो! आपण काय एक महिन्यात रट्टा मारला, की चांगले मार्क मिळवू शकतो... हा मुलांमधला फाजील आत्मविश्वास भविष्यासाठी खूपच घातक ठरतो! आयत्या वेळेस काम करून वेळ मारून नेणे ही घातक प्रवृत्ती एकदा आपल्या मनात घट्ट रुजली की ती निघायला खूप वेळ लागतो. ही प्रवृत्ती आपल्या करिअरमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं नुकसान करते.

काही पालक तर अभिमानाने सांगतात, की वर्षभर आमच्या मुलांनी काही केलं नाही; पण शेवटच्या एक महिन्यात अभ्यास करून त्यांनी इतके घसघशीत मार्क्स मिळवले... असं म्हणून आपल्या पाल्याचं आणि त्याच्या हुशारीचं ते तोंड भरून कौतुक करतात. अशा वेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये पाल्याबद्दल खूप अभिमान डोकावत असतो! हे कौतुक मुलं मनोमन स्वीकारतात आणि तशाच पद्धतीने अभ्यास करू लागतात. त्याचा फटका पुढच्या काळात त्यांना बसतोच बसतो. कारण अभ्यासाचा आकार, विस्तार, अभ्यासाची गुंतागुंत, अभ्यासातली क्लिष्टता ही दिवसेंदिवस वाढत जाते. एका टप्प्यावर घोकंपट्टी फेल होते. साहजिकच अशी मुलं ही फेल होतात. मग जागे झालेले पालक धावपळ करतात. अशा काही पालकांचा मला जेव्हा फोन येतो, तेव्हा त्यांना मी मूळ कारण सांगितलं की, धक्का बसतो आणि वाईटही वाटतं! पालकच जर मुलांना पास होण्यापुरते मार्क मिळवण्यासाठी प्रोत्साहन देत असतील आणि पालकांचाच जर मुलांच्या अथक आणि सातत्याने होणाऱ्या प्रयत्नांवर विश्वास नसेल, तर अशा मुलांच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय हे सांगायला कोणाही भविष्यवेत्त्याची गरज नाही...

मुलं ही शेवटी लहान आहेत. त्यांना उत्तीर्ण होण्याचा आनंद जास्तच असणार; पण पालक हे जाणते आणि मोठे आहेत. त्यांना अथक प्रयत्नातलं महत्त्व हे कळायला हवं. पालकांना स्वतःच्या आणि मुलांच्या प्रयत्नातील सातत्य, चिकाटी, प्रामाणिकपणा याचं महत्त्व कळलं तर ते मुलांवर आपोआप ठसेल. आपल्याला योग्य प्रयत्नांवरचा भर वाढवायला हवा, मग निकाल काहीही लागो! (निकाल चांगलाच लागतो!!)

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com