Saraswati-Vishwa-Vidyalay
Saraswati-Vishwa-Vidyalay

बालशिक्षणातून शैक्षणिक संस्कार

सरस्वती विश्‍व विद्यालय नॅशनल स्कूल
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्या मूलभूत अधिकारांसाठी महत्त्वाची असते. शिक्षकाला बरेचदा मूर्तिकार किंवा मातीला आकार देणारी व्यक्ती, असे म्हणतात. तो आपल्याकडील सर्व कौशल्य पणाला लावून मूर्ती घडवत असतो. पण, हाडामांसाचे विद्यार्थी घडवताना त्यांचा कल, त्यांना काय करायचे आहे, याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे. विद्यार्थ्याला काय करायचे आहे हे त्याला ठरविता यावे. शारीरिकदृष्ट्या स्वतंत्र होतानाच आपले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्या विद्यार्थाला यावे, यासाठी असंख्य शाळांनी कात टाकली आहे. अभ्यासक्रमांची नव्याने आखणी, प्रायोगातून शिक्षण, कार्यशाळा, ई-लर्निंग, शारीरिक शिक्षण व वर्गाबाहेरील शिक्षण यांसारख्या अनेक आधुनिक पर्यायांचा अवलंब शाळा करीत आहेत. 
याच उद्देशाने सरस्वती विश्‍व विद्यालय नॅशनल स्कूल बालशिक्षणापासूनच याकडे 
लक्ष देत आहे. 

शिक्षण म्हणजे समजणे, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणे, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणे, शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणे, शिक्षण म्हणजे चांगले माणूस होणे, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणे. हेच लक्षात घेऊन ज्ञानदानाचे कार्य शाळा करीत असतात. खरेतर बालशिक्षणापासूनच योग्य शैक्षणिक संस्कार मुलांवर होणे गरजेचे असते. 

तणावमुक्त बालशिक्षण
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया बालशिक्षणातच रचला जातो. शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या, संस्कार आणि मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. मानवतेच्या पुस्तकापेक्षा जास्त चांगले पुस्तक कोठे असू शकते? असे महात्मा गांधी म्हणाले होते. याच शिक्षणाची खरी गरज येणाऱ्या पिढीला आहे. पहिली सहा वर्षे ही मोकळ्या वातावरणात मनसोक्त बागडण्याची, निरीक्षण करण्याची व गोष्टी आत्मसात करण्याची असतात. याच बाल्यावस्थेत नैतिक मूल्यांची जडणघडण झाली, की भावी काळात मुले कुठेही कमी पडत नाहीत. म्हणूनच, सरस्वती विश्‍वविद्यालय याच काळात मुलांकडे विशेष लक्ष देते. विविध शालाबाह्य उपक्रम, खेळ, प्रयोगातून शिक्षण, वास्तविक शिक्षण यांतून मुलांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होण्यास मदत होते. 

वास्तविक शिक्षण 
देशाचे उत्तम नागरिक घडविण्याचे कार्य ही संस्था अव्याहतपणे करीत आहे. चर्चासत्र, कार्यशाळा, परिसंवाद, गटचर्चा, पालक-मुले संवाद, उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, औद्योगिक व सेवा क्षेत्रातील गरज ओळखून त्यावर आधारित उपक्रम व संवाद स्पर्धांचे आयोजन ही या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. प्रयोगात्मक व वास्तविक शिक्षण देत असताना पालक, शिक्षक, सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका बहुमोलाची आहे. ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत विद्यार्थ्याला केवळ माहिती मिळवून भागणार नाही. तिचा उपयोग करण्याची कौशल्ये आणि मार्ग त्याला अनुभवातून आत्मसात करता येणे, ही खरी आवश्‍यकता आहे.

पालकांचा सहभाग 
बरेचदा आपले मूल शाळेत काय करते, याबाबत काहीच माहीत नसते. अभ्यासाची प्रगती रिपोर्ट कार्डवरून लक्षात येते. पण, इतर कार्यशाळा, खेळ, चर्चासत्रे याचे मोजमाप कसे करणार? पालकांपर्यंत ते कसे पोहोचणार? यासाठी शाळेमार्फत विविध उपक्रमांमध्ये पालकांना सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे मुलांना आपल्या पालकांसोबत वेळ मिळतो. त्यांच्यासोबत खेळायला मिळते व पालकही आनंदी होतात. पालक आणि मुलांमधील सुसंवाद ही काळाची गरज आहे. हाच संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. त्यासाठी शाळा विविध समुपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक पालकत्वाचे धडे देते.

केवळ पुस्तकी शिक्षणाने मुले घडत नसून, त्यासाठी नीतिमूल्यांचे व सामाजिक शिक्षण देणे काळाची गरज आहे. त्यासाठी योग्य त्या मार्गांनी ते मुलांपर्यंत पोचविणे महत्त्वाचे आहे. बालशिक्षणापासूनच हे शैक्षणिक संस्कार मुलांवर करण्याचा प्रयत्न शाळेकडून केला जातो.
- क्षमा गर्गे, मुख्याध्यापिका, सरस्वती विश्‍व विद्यालय नॅशनल स्कूल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com