इंग्रजी शिका :  Hey!…DEAR

इंग्रजी शिका :  Hey!…DEAR

वाचनाची रुची निर्माण होऊन तिचे सवयीत रूपांतर होण्यासाठी काही उपाय आपण पाहिले. आपण आज आणखी एक महत्त्वाचा उपाय पाहून पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पाणी पिणे खूप महत्त्वाचे असले, तरी अनेकदा आपण कामात व्यग्र असल्याने पाणी प्यायचे विसरून जातो. त्यासाठी अलीकडच्या काळात आपण WATER BELL ही संकल्पना पाहिली आहे. अगदी त्याचप्रमाणे इंग्लिश पुस्तके वाचण्यासाठी एक क्लृप्ती, एक योजना करता येईल. काही शाळा-कॉलेजांमध्ये, काही क्लब्समध्ये, इतकेच काय काही कुटुंबामध्येसुद्धा ही योजना वापरली जाते. इंग्लिश पुस्तके वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे त्यांनी या युक्तीचा वापर केल्यास खात्रीपूर्वक परिणाम मिळतात. 

योजनेचे नाव आहे DEAR- Drop Everything And Read. 
दिवसातील एखाद्या विशिष्ट वेळी DEAR हा शब्द मोठ्याने पुकारला जातो आणि मग सर्वांनी हातातील इतर सर्व कामे बाजूला ठेवून आपापल्या आवडीचे पुस्तक वाचन सुरू करायचे असते. सुरुवातीला कमी वेळ ठेवून हळूहळू वेळ वाढवणे योग्य ठरते. सर्वांनी आपापल्या सोयीप्रमाणे वेळ ठरवून DEAR कृती करणे निश्‍चितच फायदेशीर ठरते. वाचन करण्याच्या पद्धती व त्यांचे फायदे आता आपण पाहूया. शाळेत वाचनाच्या काही पद्धती आपण पाहिलेल्या आहेतच. पण त्या वेळी त्याचे फायदे काय आहेत हे आपणास समजून घेण्याची गरज भासत नव्हती. 

Loud Reading
या प्रकारचे वाचन प्रकटपणे (मोठ्याने) स्वतःसाठी, तसेच इतरांसाठी केले जाते. प्रकट वाचनाने उच्चार तपासता येतात तसेच चुकीचे उच्चार दुरुस्त करता येतात. त्याचप्रमाणे INTONATION (आवाजातील चढउतार), स्वराघात आदींचा अभ्यास करून योग्य ती सुधारणा करता येते. नाटके, कवितांचे विविध प्रकार, भाषणे इत्यादींसाठीच्या वाचनात प्रकट वाचन केले जाऊ शकते. Loud reading मुळे इंग्लिश भाषेतून बोलताना एक प्रकारचा आत्मविश्‍वास येतो आणि बोलणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षेतील interview, group discussion इत्यादींसाठी प्रकट वाचन करणे फायद्याचे ठरते.

Silent Reading  
या प्रकारचे वाचन बहुधा स्वतःसाठी केले जाते. या प्रकारच्या वाचनात ओठांची हालचाल, पुटपुटणे अपेक्षित नसते. या प्रकारचे वाचन समजून घेण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी व परिच्छेदाच्या आकलनासाठी केले जाते. यामध्ये नवीन शब्दांचे अर्थ आजूबाजूच्या शब्दांच्या मदतीने लावले जातात. याला इंग्लिशमध्ये Contextual Meaning असे म्हटले जाते. मोठे ग्रंथ, कथानके वाचताना बहुधा silent reading केले जाते. या प्रकारच्या वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते. अर्थपूर्ण वाचन होते. जलदगतीने वाचता येते. स्पर्धा परीक्षेतील Comprehension, Summary Writing इ. प्रश्‍नप्रकार सोडवणे सोपे जाते.

वाचन कशासाठी करायचे, 
म्हणजेच वाचनाच्या उद्दिष्टावरून 
वाचनाचे पडलेले काही प्रकार पाहूया. 

(क्रमश:)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com