'आयटी’चा बोलबाला..!

डॉ. श्रीराम गीत
Saturday, 23 November 2019

गेल्या सात-आठ वर्षांतील स्पर्धेचे वास्तव चक्रावून टाकणारे आहे. ७० ते ८० टक्के कोणत्याही कॉम्प्युटर पदवीधराला मिळणारी नोकरी ही हळूहळू कमी होत गेली. कामाच्या स्वरूपात खूप बदल होत गेले.

साऱ्याच जगात १९८०ला कॉम्प्युटरचे युग सुरू झाले. टाइम मॅगेझिनने ‘मॅन ऑफ द इयर’चा किताब पीसीला दिला होता त्याच वर्षी. त्यानंतरच्या दोन दशकात या क्षेत्रात स्पर्धा अशी नव्हती. अक्षरशः कोणताही कोर्स करा अन्‌ नोकरी मिळवा, ती करता-करता शिका आणि प्रगती करा असे ते दिवस २००३च्या सुमाराला संपले. तरीसुद्धा २००३ ते २०१३ दरम्यान याआधी लिहिलेल्या कोर्स केलेल्या सुमारे ७० ते ८० टक्के पदवीधरांना त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे निदान नोकरी मिळत होती. अर्थातच आयटीची क्रेझ अगदी बॉलिवूडचा हिरो बनण्याचे स्वप्न पडण्यासारपखे वाढत गेली. सारे कधीच हिरो बनत नसतात हे त्या दशकातच कळू लागले होते. पण तरीही हिरोच्या मित्राची, भावाची, खलनायकाची भूमिका २००३ ते २०१३ या दरम्यान मिळू शकत होती इतपत बरी परिस्थिती होती. नवीन पदवीधरांनासुद्धा काम मिळत होते, कारण तोवर १५-२० वर्षे आयटीचा छान अनुभव घेऊन छोटी कंपनी काढणारे अनेक जण प्रत्येक गल्लीत दिसू लागले होते. कस्टमायझेशन हा शब्द त्याच काळातला होता. तीन-चार वर्षे छोट्या कंपनीत व नंतर मोठी कंपनी असा प्रवास सुकर होता. अशी यशस्वी अनेक उदाहरणे आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मात्र गेल्या सात-आठ वर्षांतील स्पर्धेचे वास्तव चक्रावून टाकणारे आहे. ७० ते ८० टक्के कोणत्याही कॉम्प्युटर पदवीधराला मिळणारी नोकरी ही हळूहळू कमी होत गेली. कामाच्या स्वरूपात खूप बदल होत गेले. ही टक्केवारी २०१८ व २०१९मध्ये जेमतेम दहा टक्‍क्‍यांवर घसरलेली आहे. त्यातही नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अट अगदी सुटसुटीत आहे. दरवर्षी किमान फर्स्ट क्‍लास आता गरजेचा झाला आहे. इथेच मुळात इंजिनिअरिंगचे पन्नास टक्के विद्यार्थी गळतात. तसेच आयटी वा कॉम्प्युटर सायन्सचाच इंजिनिअर हवा हा आग्रह गेली ५/६ वर्षे साऱ्याच कंपन्यांनी पूर्णपणे सोडून दिलेला आहे. कोणत्याही शाखेतील म्हणजे अगदी मेटॅलर्जी, केमिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकलमधला फर्स्टक्‍लास पदवीधर त्यांना चालतो. कारण बव्हंशी मोठ्या कंपन्यांना कळून चुकले आहे की यापैकी कोणालाही ९-१० महिन्यात ट्रेनिंग देऊन तयार करता येते. त्याची व्यवस्था पूर्वीपण होती, सध्या ती कार्यक्षमतेने वापरली जाते.  एवढीच किमान माहिती जर मुला-मुलींनी व त्यांच्या आई-वडिलांनी समजून घेतली, एवढेच कशाला पारखून घेतली तर कॉम्प्युटर शाखेचा हट्ट धरून भलत्या-सलत्या मिळेल त्या कोर्सला जायचे का याचे उत्तर त्यांना मिळू शकते. अर्थात उत्तर मिळाले तरी ते मान्य करणे अनेकांना जड वाटते. कारण एकच, आमच्या मुलांना ना कॉम्प्युटर खूप आवडत असतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shreeram geet article on IT craze