टेक करिअर : संगणक क्षेत्रात करिअरच्या संधी

सध्याच्या संगणक, माहिती तंत्रज्ञान व माहिती दळणवळण तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
Computer Field Career Opportunity
Computer Field Career OpportunitySakal
Summary

सध्याच्या संगणक, माहिती तंत्रज्ञान व माहिती दळणवळण तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

- प्रा. श्यामकांत देशमुख

सध्याच्या संगणक, माहिती तंत्रज्ञान व माहिती दळणवळण तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. आपला पाल्य घरातील संगणक व मोबाईल सहजगत्या हाताळतो, त्यावरील विविध गेम्स, अप्लिकेशन्सचा वापर करतो म्हणजे तो भविष्यात निश्चितच संगणक क्षेत्रात चांगले करिअर करेल व त्या पाल्याचा या क्षेत्राकडे जाण्याचा कल आहे, असे आराखडे बांधले जातात. संगणक व संगणकावरील विविध प्रणाली वापरणे किंवा हाताळणे याचा अर्थ संगणक क्षेत्रात उत्तम करिअर करता येईल असा होत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. संगणक, माहितीतंत्रज्ञान व माहिती दळणवळण तंत्रज्ञानाच्या युगात संगणक वापरण्याचे व हाताळण्याचे ज्ञान सर्वांनी घेणे हे क्रमप्राप्त झाले आहे. दहावीनंतर संगणक क्षेत्रात कल असणाऱ्या पाल्यांपुढे कोणते पर्याय असू शकतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊ.

दहावीनंतर डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन अभ्यासक्रमांचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतो. हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा असतो व त्याचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ‘डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन’मार्फत केले जातात. अनेक पालक विद्यार्थ्यांना दहावीला जास्त गुण मिळाल्यास तसेच इतरांच्या अनुभवावरून अकरावी-बारावी (सायन्स) जेईई/एमएच-सीईटी प्रवेश परीक्षा त्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर डिप्लोमा, इंजिनिअरिंगचा पर्याय निवडतात. डिप्लोमानंतर मात्र बीई अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो. त्यासाठी डिप्लोमा अभ्यासक्रमास ७० टक्क्यांहून अधिक गुण असल्यास चांगल्या महाविद्यालयाचा पर्याय मिळतो. तुलनेने द्वितीय वर्षाच्या जागा अभियांत्रिकी महाविद्यालयात कमी उपलब्ध असतात व त्या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचा निकालांवरून ठरतात. त्यामुळे काही वेळेस डिप्लोमाला चांगले गुण मिळूनही पसंतीचे/आवडीचे महाविद्यालय मिळणे अवघड जाते. अशा प्रसंगी काही विद्यार्थी बी.ई.च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश न घेता प्रथम वर्षाच्या पर्यायाचा विचार करतात. त्यामध्ये त्यांचे एक वर्ष वाया जाते वा जास्तीचे लागते. डिप्लोमानंतर बी.एस्सी. कॉम्प्युटर, ''बीसीए''चा पर्याय देखील पदवीधर होण्याच्या दृष्टीने उपलब्ध असतात.

दहावीनंतर परंपरागत अकरावी, बारावी करण्याचा पर्याय निवडल्यास विज्ञान शाखेअंतर्गत कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी द्विलक्षी अभ्यासक्रमाचे पर्याय असतात. वाणिज्य शाखे अंतर्गत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा एक विषय निवडता येतो. बारावी विज्ञान शाखेतील संगणक, इलेक्ट्रॉनिक शास्त्र हे पर्याय विषय निवडल्यास बारावी नंतर डिप्लोमा, डिग्रीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेता येतो. अकरावी व बारावी करत असताना वरील पर्याय निवडल्यास वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व पर्याय बंद होतात.

संगणक क्षेत्रात करिअर करताना अकरावी व बारावी विज्ञान शाखेतूनच करावे असे नाही. बारावी विज्ञान, वाणिज्य व कला यानंतरचे पर्याय आपण जाणून घेऊ.

बारावी विज्ञान शाखेअंतर्गत पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्राशी संबंधित बी.ई (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग), बी.ई (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), बी. एस्सी (ॲनिमेशन), बीसीए (सायन्स) या अभ्यासक्रमांचे पर्याय असतात. संगणकशास्त्र व गणित या दोन्ही विषयांचा अतिशय जवळचा संबंध असतो. पाल्यांचा कल लक्षात घेऊन वरीलपैकी अभ्यासक्रम निवडणे योग्य ठरते. बी.एस्सी. (ॲनिमेशन) या अभ्यासक्रमातून जाहिरात, मोबाईल गेम्स, मोबाईल ॲप्स, ई-लर्निंग, ग्राफिकल डिझाईन या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत. चित्रकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना हा चांगला पर्याय उपलब्ध असू शकतो. वरील सर्व अभ्यासक्रम हे पुणे विभागाचा विचार करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असतात. आपल्यात असलेले कौशल्यगुण, क्षेत्रातील ज्ञान या गोष्टी नोकरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. बारावी वाणिज्य व कला या शाखेअंतर्गत पूर्ण केल्यानंतर बीबीए या अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुला असतो.

संगणक क्षेत्राशी संबंधित बी. ई. (कॉम्प्युटर/आयटी) हे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम.ई., एम.एस., एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स), एम.सी.ए, एम.बी.ए (सिस्टिम) हे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध असतात. बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स), बी.एस्सी. (ॲनिमेशन), बीसीए (सायन्स) हे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एमएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), एमसीए (इंजिनिअरिंग, मार्केटिंग), एम.बी.ए. (सिस्टिम), एम.एस्सी. (ॲनिमेशन) हे पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असतात. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संशोधनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. पूर्ण करून संशोधनाच्या संधीदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

विविध क्षेत्रांतील संगणकीकरण, भ्रमणध्वनीमुळे झालेली क्रांती, जागतिकीकरणामुळे झालेले बदल, कालानुरूप बदल, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, समाजातील आव्हाने, व सेवा क्षेत्रात तसेच यासंबंधीच्या गरजेप्रमाणे लागणाऱ्या संगणक प्रणाली विकसित करणे व त्याचे व्यवस्थापन क्षेत्रात तसेच यासंबंधीच्या गरजेप्रमाणे लागणाऱ्या संगणक प्रणाली विकसित करणे व त्याचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे व दिवसेंदिवस ती वाढतच जाणार आहे.

(मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com