esakal | ग्रॅज्युएशननंतर पुढे काय? जाणून घ्या चांगल्या करिअरसाठी उच्च शिक्षण व नोकरीचे अनेक पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

Career

आपण कुठल्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएट असल्यास, आपल्या कारकिर्दीत अनेक आश्‍चर्यकारक आणि आकर्षक पर्याय आहेत. आपण उच्च शिक्षण किंवा नोकरीमधून कोणताही पर्याय निवडू शकता. पदवीनंतर आपण डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सद्वारे एक उत्तम करिअर देखील निवडू शकता... 

ग्रॅज्युएशननंतर पुढे काय? जाणून घ्या चांगल्या करिअरसाठी उच्च शिक्षण व नोकरीचे अनेक पर्याय

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : आपण पदवीधर विद्यार्थी असल्यास किंवा आपण नुकतेच पदवी संपादन केले असेल तर आपल्या मनात पहिला प्रश्न येईल की पुढे काय? पदवीनंतर करिअर निवडताना आणि त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीबद्दल अनेकदा विद्यार्थी संभ्रमित असतात. 

आजकाल विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय आहेत. तथापि, बऱ्याच पर्यायांमधून एक आणि योग्य कारकीर्द निवडणे खूप आव्हानात्मक आहे. जर आपण काही विशेष गोष्टी लक्षात ठेवून पुढे सरसावलात तर आपल्या उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी कोणता पर्याय चांगला आहे, हे आपल्याला समजू शकेल. 

ग्रॅज्युएशननंतर काय करावे? 
पदवी (ग्रॅज्युएशन) नंतर काय करावे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण, आपण शैक्षणिक क्षेत्रात पुढे गेलेला आहात आणि आपल्यासाठी योग्य कारकीर्द निवडण्याचा निर्णय करण्याची योग्य वेळ आता आली आहे. भविष्यात आपल्यासाठी उत्तम कारकिर्दीचा मार्ग उघडला जाईल की नाही हे या वेळी घेतलेल्या निर्णयाने सिद्ध होईल. हा निर्णय घेणे इतके सोपे नसले तरी रोजगाराची बाजारपेठ झेप घेऊन वाढत आहे आणि बऱ्याच ऑफ बीट नोकऱ्या सध्या लोकप्रिय होत आहेत. म्हणूनच बीकॉम किंवा बीटेक केल्यावर तुम्ही अभियंता किंवा एमबीए करणे आवश्‍यक नाही. जर आपली आवड, कौशल्य आणि योग्यता इतर कोणत्याही क्षेत्रात असेल तर आपण आपल्या करिअरला योग्य ती दिशा देऊ शकता. हे केवळ आपले उच्च शिक्षण चालू ठेवण्यासच मदत करणार नाही तर आपण आपल्या इच्छित क्षेत्रात एक उत्तम करिअर आणि भविष्य तयार करण्यास सक्षम असाल. 

करिअरचा योग्य पर्याय निवडणे कठीण 
हे खरे आहे, की जेव्हा योग्य करिअरची निवड करण्याची वेळ येते तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण होतात. मी अजून उच्च शिक्षण घेतले पाहिजे, की मला पदवीनंतरच चांगली नोकरी मिळेल? यासाठी तुम्हाला प्रथम तुमची आवड माहीत असायला हवी. आपल्यासाठी काय चांगले आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. जर ही पद्धत आपल्यासाठी प्रभावी ठरली नाही तर तुम्ही करिअर काउन्सलरचा सल्ला घेऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या क्षेत्रात इंटर्नशिप घेऊन त्या क्षेत्रात आपली आवड आणि शक्‍यता किती आहे हे जाणून घ्या. 

पदवी आणि नोकरीमधून काय निवडायचे? 
सर्वप्रथम तुम्ही घेतलेली पदवी तुम्हाला एक चांगली आणि आवडती नोकरी मिळविण्यासाठी पुरेसे आहे की नाही, हे समजून घेणे आवश्‍यक आहे. चांगली नोकरी मिळवण्यासाठी पुरेसे नाही असे आपल्याला वाटत असल्यास आपण उच्च शिक्षणाचा विचार केला पाहिजे. आपली कौशल्ये वाढविण्यासाठी व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा केला पाहिजे. जर तुम्ही प्रोफेशनल कोर्समध्ये पदवी घेतली असेल तर तुम्हाला जॉबचा पर्यायदेखील आहे, जसे की तुम्ही बीटेक केले असेल तर तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्रात सहज नोकरी मिळेल. आजकाल नोकरीमधील शक्‍यता सतत बदलत असतात. स्वत:ला अपडेट ठेवण्यासाठी तुम्हाला लेटेस्ट मार्केट ट्रेंड्‌सबद्दल चांगली माहिती असणे आवश्‍यक आहे. आपल्या करिअरला चालना देण्यासाठी आपण नवीन कौशल्ये शिकत राहायला पाहिजे. यासाठी उच्च शिक्षणाचा पर्यायही खुला ठेवावा. 

आर्टस्‌ पदवीधरांसाठी योग्य करिअर पर्याय कसा निवडायचा? 
तुम्ही बीए पदवीधर असल्यास तुमच्या करिअरसाठी बरेच नावीन्यपूर्ण पर्याय आहेत. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाऊ शकता, याशिवाय नोकरीसाठीही उत्तम पर्याय आहेत. पारंपरिक अभ्यासक्रम आणि नोकरी व्यतिरिक्त आजकाल आर्टस् ग्रॅज्युएट्‌ससाठी अनेक नवीन परंतु फायदेशीर करिअरचे पर्याय आहेत. तर उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये आपल्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे जाणून घ्या... 

आपण आर्टस् ग्रॅज्युएट असल्यास आणि उच्च शिक्षणात पुढे जायचे असल्यास तुमच्या आवडत्या विषयांमध्ये इंग्रजी, अर्थशास्त्र आणि इतिहासात एमए करू शकता. एमफिल आणि पीएचडीद्वारे अभ्यास सुरू ठेवत एमए करणे योग्य आहे. याव्यतिरिक्त ज्या उमेदवारांना शिक्षकी पेशा हा व्यवसाय निवडायचा आहे अशा उमेदवारांसाठी एमए डिग्री खूप चांगली आहे. 

जर तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्ही बीएड अर्थात बॅचलर ऑफ एज्युकेशनचा अभ्यास करू शकता. यात विद्यार्थ्यांना अध्यापनाचे प्रशिक्षण दिले जाते. ग्रॅज्युएशननंतर तुम्ही बीएड डिग्री घेतल्यानंतर कोणत्याही सरकारी शाळेत शिक्षक होऊ शकता. तथापि, यासाठी आपल्याला टेट म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट पास करणे आवश्‍यक आहे. 

याशिवाय आपल्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. हे डिप्लोमा प्रोग्राम्स अल्प मुदतीचे प्रोग्राम्स आहेत, जे विविध क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण देतात. या डिप्लोमाच्या आधारे आपणास सहज रोजगार मिळू शकेल. तुम्हाला पत्रकारितेत आवड असल्यास आपण एक वर्षाचा पीजी डिप्लोमा करू शकता. याशिवाय अभिनय, ऍनिमेशन, चित्रपट निर्मिती, संगणक तंत्रज्ञान आणि चित्रकला अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात आपण डिप्लोमा मिळवून करिअर बनवू शकता. जर आपल्याला व्यवस्थापन क्षेत्रात रस असेल तर आपण पदवीनंतर एमबीए देखील करू शकता. पदवीनंतर एमबीए हा आजकालचा ट्रेंड आहे. आपण मानव संसाधन, विपणन, विक्री किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात करिअर बनवू शकता. 

आर्टस् पदवीधरांसाठी नोकरीचे पर्याय 
पदवीनंतर आजकाल बाजारात बरेच पर्याय आहेत. सर्वप्रथम बॅंकिंग, कृषी, केंद्रीय सचिवालय, रेल्वे आणि इतर सरकारी नोकऱ्यांसाठी पर्याय आहेत. यासाठी तुम्हाला आयबीपीएस आणि एसएससी यांसारख्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतील. नंतर पदवीनंतर तुम्ही नागरी सेवेसाठी तयारी करू शकता. यूपीएससीमार्फत दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते, ती उत्तीर्ण झाल्यावर आयएएस, पीसीएस, डिफेन्स सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस अशा अनेक विभागांत आपण एक उत्तम सरकारी नोकरी करू शकता. परंतु ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. 

जर आपले संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व चांगले असेल तर आपण बीपीओमध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट किंवा रिलेशनशिप एक्‍झिक्‍युटिव्ह म्हणून काम करू शकता. चांगल्या व्यक्तिमत्त्वासह आर्टस् पदवीधरांसाठी जनसंपर्क क्षेत्रात नोकरीचे चांगले पर्याय देखील आहेत. या क्षेत्रातही बऱ्याच चांगल्या पगारासह नोकरीच्या उत्तम संधी आहेत. 

जर तुमचे लेखन कौशल्य खूप चांगले असेल व तुम्हाला बातम्यांमध्ये इंटरेस्ट असल्यास आणि तुमच्याकडे कोणत्याही विषयावर खूप चांगले लिहिण्याची कला असेल तर आपण कोणत्याही मीडिया हाउसमध्ये उपसंपादक किंवा कोणत्याही जाहिरात एजन्सीमध्ये कॉपी-रायटर म्हणूनही काम करू शकता.

loading image