राज्यात आजपासून दहावीची परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC HSC Board exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे.

SSC Exam : राज्यात आजपासून दहावीची परीक्षा

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल ६१ हजार ७०८ ने कमी झाली आहे.

राज्यातील पाच हजार ३३ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी उपस्थित होते.

बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर नेताना जीपीएस ट्रॅकिंग केले जाईल, परीरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोचेपर्यंत आणि वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. परीक्षेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोचण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत केंद्रांवर पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त असणार आहे. पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून दिली आहेत, अशी माहिती गोसावी यांनी दिली.

‘पालक, विद्यार्थ्यांनी विविध माध्यमातून येणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. मंडळाने प्रसिद्ध केलेले  अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावे. परीक्षा महत्त्वाची असली, तरी ती सर्वस्व नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नैराश्य येऊ नये, म्हणून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.

परीक्षेसाठी असे आहे नियोजन -

- राज्यात २७१ भरारी पथके नेमली

- प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत

- विभागीय मंडळात विशेष भरारी पथके

- परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी

- २२ प्रकारातील जवळपास ८,१८९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी

२०२३ मध्ये विभागनिहाय विद्यार्थ्यांनी केलेली नोंदणी -

विभागीय मंडळ : विद्यार्थी संख्या

पुणे : २,६८,२००

नागपूर : १,५३,५१९

औरंगाबाद : १,८०,५३८

मुंबई : ३,५२,४८०

कोल्हापूर : १,३०,६५३

अमरावती : १,६०,३७०

नाशिक : १,९७,२०६

लातूर : १,०५,८३४

कोकण : २८,४५६

टॅग्स :educationstudentSSC Exam