विद्यार्थ्यांचा संगणक अभियांत्रिकीकडे कल; आयटी क्षेत्रातील नोकरीचे आकर्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IT Company

परदेशात नोकरीची अपेक्षा आणि भारतात वाढत जाणाऱ्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचा संगणक अभियांत्रिकीकडे कल वाढला आहे.

विद्यार्थ्यांचा संगणक अभियांत्रिकीकडे कल; आयटी क्षेत्रातील नोकरीचे आकर्षण

पुणे - परदेशात नोकरीची अपेक्षा आणि भारतात वाढत जाणाऱ्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचा संगणक अभियांत्रिकीकडे कल वाढला आहे. मात्र, हा एकांगी कल दीर्घकालीन अभियांत्रिकीच्या भविष्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट मत तज्ज्ञ व्यक्त करत आहे.

सीईटी सेलच्या आकडेवारीवरून दिसून येते की विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश घेण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्राला पसंती दिलेली आहे. या मध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा संगणक म्हणजेच कॉम्प्युटर इंजिनियरिंगकडे असल्याचे आढळून येते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आयटी उद्योग क्षेत्रात मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याची इच्छा. अभियांत्रिकीचे प्राध्यापक सागर चव्हाण सांगतात, ‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले तरच आयटी क्षेत्रात नोकरी मिळते हा मात्र विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे. अभियांत्रिकी आणि त्यासोबत निगडित उद्योग क्षेत्रात काही काळानंतर एखादी शाखा याची संधी वाढतो. हे एक चक्र आहे.

कोरोनामुळे मेकॅनिकल, सिव्हिल यासारख्या क्षेत्रांमध्ये संधी कमी आहे, असे वाटत असले तरी आता सगळे सुरळीत सुरू झाल्यानंतर या क्षेत्राला परत गती येऊन याचा संधी नक्कीच वाढणार आहे. आयटी क्षेत्र हे फक्त कॉम्प्युटर किंवा आयटी इंजिनिअरिंगसाठी मर्यादित नसून ते इतर शाखांच्या विद्यार्थ्यांसाठीही खुले असते.’ त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज कोणत्या गोष्टीला मागणी आहे हे न बघता, आपले शिक्षण २०२६ मध्ये पूर्ण झाल्यानंतर कोणत्या क्षेत्राला मागणी वाढेल आणि कोणत्या क्षेत्रात नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील. याचा विचार करून अभियांत्रिकीमध्ये विद्याशाखेची निवड करावी, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

अभियांत्रिकीच्या प्रवेशामध्ये संगणकाशी निगडित विद्याशाखेला पसंती दिसते. त्यातही कृत्रीम बुद्धिमत्ता, एआयएमएल हे शब्द परवलीचे झाले आहे. मात्र हे सर्व टूल्स असून, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आदी मूलभूत विद्याशाखेंतही याचा समावेश आहे. आता सर्वच विद्याशाखांमध्ये संगणकाधारीत अभ्यासक्रमांचा समावेश झाले असून, विद्यार्थ्यांनी एकांगी विचार न करता क्षमतांच्या आधारे विद्याशाखांची निवड करावी.

- डॉ. गणेश काकंडीकर, संकुल प्रमुख, यंत्र अभियांत्रिकी विभाग, एमआयटी कोथरूड